शिवलिंग सापडलेली जागा सुरक्षित ठेवा

0
27

>> न्यायालयाचे आदेश; वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण

१४ मेपासून सुरू असलेले वारासणीतील ज्ञानवापी मशिदीचे चित्रीकरणाद्वारे सर्वेक्षणाचे काम काल पूर्ण झाले. रविवारपर्यंत ६५ टक्के आणि उर्वरित सर्वेक्षण काल म्हणजेच सोमवारी पूर्ण झाले. आता बुधवार, १७ मे रोजी या सर्वेक्षणाचा अहवाल न्यायालयात सादर केला जाणार आहे. विशेष म्हणजे या सर्वेक्षणादरम्यान १२ फूट ८ इंच शिवलिंग सापडल्याचा दावा न्यायालयामध्ये हिंदू पक्षाची बाजू मांडणार्‍या वकिलांनी केला आहे. या दाव्यानंतर आता वाराणसी न्यायालयाने शिवलिंग सापडलेली जागा सील व सुरक्षित ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

ज्ञानव्यापी मशिदीच्या सर्वेक्षणाचा काल शेवटचा दिवस होता. यावेळी हिंदू पक्षाच्या वकिलांनी सर्वेक्षणादरम्यान शिवलिंग सापडल्याचा मोठा दावा केला आहे; मात्र हा दावा कितपत खरा आहे, याबाबत अद्यापही प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया समोर आली नाही. त्यानंतर मशिदीत सापडलेले शिवलिंग सुरक्षित ठेवण्यासाठी हिंदू पक्षाच्या वकिलांनी वाराणसी न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकेतील मुद्यांवर अभ्यास केल्यानंतर खंडपीठाच्या मुख्य न्यायाधीशांनी याचिका स्वीकारली आहे. त्याचबरोबर प्रशासनाला शिवलिंग सापडलेली जागा त्वरित सील व संरक्षित करण्याचा आदेश दिला आहे.

न्यायालयाने याचिका दाखल करुन घेतल्यानंतर वाराणसीच्या जिल्हा दंडाधिकार्‍यांना आदेश दिले आहेत. ज्या ठिकाणी शिवलिंग सापडले आहे, ते ठिकाण तातडीने सील करा. तसेच, सील करण्यात आल्यानंतर तिथे कोणत्याही व्यक्तीला प्रवेश देण्यात येऊ नये. त्याचबरोबर, वाराणसीचे जिल्हाधिकारी, पोलीस कमिश्नर, सीआरपीएफ कमांडेंट यांनी ते स्थान संरक्षित व सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी घ्यावी, असेही आपल्या आदेशात न्यायालयाने म्हटले आहे.
दरम्यान, शिवलिंग सापडल्याचा दावा मुस्लिम पक्षाने फेटाळला आहे.