शिवरायांचा आठवावा प्रताप!

0
721

– भाग्यश्री केदार कुलकर्णी
(पर्वरी)

‘निश्चयाचा महामेरू… बहुत जनांसी आधारू …
अखंड स्थितीचा निर्धारू… श्रीमंतयोगी…!!’
जो श्रीमंत आहे, सर्व ऐहिक सुखांचा मालक आहे. तरीही एखाद्या योग्याप्रमाणे दैदिप्यमान अशा ध्येयासाठी बद्ध आहे. ज्याचा निर्धार अखंड आहे. ज्याचा निश्चय मेरू पर्वताइतकाच विराट आहे आणि म्हणूनच त्याच्या या भव्य अस्तित्वाचा सगळ्यांना आधार वाटत होता.

उदे गं अंबे उदे, हे चंडमुंडभंडासुरखंडिनी, जगदंबे, महिषासुरमर्दिनी दुर्गे, महाराष्ट्ररक्षिके- तुळजाभवानी एकवार ये…!!! असं आवाहन करून यापुढील शब्दांचे बिल्व श्रींचरणी समर्पित करते.
आजवर आपण पाठ्यपुस्तके, आजीच्या गोष्टीतून, सिनेमातून अशा अनेक माध्यमातून शिवाजी महाराजांचा प्रताप.. त्यांचे कर्तृत्व हे पाहिलेले आहेच. पण हे फार वरवर आहे हो …!! मुळात हा मराठी बाणा.. हे ‘मी मराठी’ -पणाचे बीज कुठून, कसे, का व केव्हा… रोवले गेले याचा विचार आज आपण करणार आहोत. गेली कित्येक शतकं मराठी मनावर अविरत गारूड करणार्‍या आपल्या शिवबाचं साम्राज्य अबाधित आहे. मराठी मनाची नाळ जितकी हिंदवी स्वराज्याशी जोडली गेली तितकी इतर कुठल्याही सत्तेशी जोडली गेली नाही. शिवबाच्या या अलौकिक कारकिर्दीवर अनेक मान्यवर लेखकांनी, इतिहासकारांनी, शाहीरांनी कथा, कादंबरी, पोवाडे लिहून त्यांची महती गायली आहे.

– शिवपूर्वकालीन देशस्थिती –

महाराजांच्या कर्तृत्वाचे मुल्यमापन पाहण्याअगोदर शिवपूर्वकालीन देशस्थिती काय होती हे जाणून घेणे गरजेचे वाटते. कारण, सतत आपल्या देशावर कोणाचे न कोणाचे तरी सावट, आक्रमण होतंच होते. तेही इथे बसून राज्य करण्यासाठी, सत्तेसाठी..!! या भारतवर्षाचा प्राप्त इतिहास पाहिला तर सिकंदर-अलेक्झांडरापासून, शकांची, हुणांची अनेक विदेशी राजकीय आक्रमणे झाली ज्यांच्या साम्राज्याचा सूर्य कधी मावळू शकत नव्हता.. तेही लयास गेले कारण त्यांना मुहतोड जवाब देण्यासाठीही चाणक्य, राजा विक्रमादित्य, राणा प्रताप,.. इ. असे अनेक वीरयोद्धे जन्माला घातले या भारतमातेनी आणि ही आक्रमणं पचवलीही..!! आपले वीर योद्धे शौर्यत्वाला नाही कमी पडले, वीरत्वाला नाही कमी पडले पण भारताला पहिली किळस आली ती क्रौर्यत्वाची..!! कारण ही आक्रमणे सैनिकांपुरती कधीच मर्यादित राहत नव्हती. ती कशी ते पुढे बघुयात.

७-८च्या शतकामधे आलेली यावनी राजवट..!! ही राजवट स्वतःला इस्लाम धर्म अनुयायी म्हणवून घेत होती. हा इस्लाम धर्म मूळचा अरबस्थानातला… त्या काळात अरब लोकांनी गणित, भूगोल, वैद्यकशास्त्र, खगोलशास्त्र यांमधे अतोनात प्रावीण्य मिळवले. पण पुढे अरब-तुर्क संघर्षात तुर्कांकडे नेतृत्व गेले. अरबांच्या तुलनेत तुर्क हे जास्त रानटी व असंस्कृत होते. पुढे तुर्कांच्या जोडीला ९व्या शतकात मध्यआशियातील मोंगल, तार्तार या धनगरी लोकांनी मुसलमान धर्म स्वीकारला. टोळ्या करून भटकणे, लूटमार करणे या उद्योगाने ते अतिशय क्रूर व रानटी मुसलमान पुढे बदनाम झाले. इस्लामचा भारताशी संबंध आला तो महंमद बिन कासीमची सिंधच्या बाजूने झालेली स्वारी इ.स.७११ मधे. यामधे बाटवाबाटवीचा जो हैदोस उसळला तो स्वभावगत क्रौर्य, खूनशीपणा, स्वार्थलोलूपता या दुर्गुणांनीयुक्त होता. असे हे लोक मंदिरांचा विध्वंस करणे, हजारो लोकांच्या कत्तली करणे, हजारोंना गुलाम म्हणून कैद करणे, स्त्रीयांचा उपभोगार्थ उपयोग करणे, प्रजेवर जिझिया कर बसवणे, जनावरांची कत्तल करणे, शांतीची नासधूस, गुलाम म्हणून स्त्रियांची विक्री करणे..,धर्मांतर करण्यास भाग पाडणे…वगैरे. यामुळे इस्लामविषयी एक घृणा भारतात निर्माण झाली. या अशा अत्याचारामुळे मोठ्या प्रमाणात आपल्या लोकांची संख्या परधर्मात सामील होते ही अत्यंत दुर्दैवी घटना होती.
त्यानंतर महंमद घोरी पठाण व त्यानंतर, महमम्द गझनवीने १७ स्वार्‍या केल्या व निव्वळ लूट नाही केली तर अगणित मनुष्यसंहार केला.

त्याच्या या भारतावरच्या स्वारीने इस्लामी वृत्तीची ओळख झाली आणि यात दुर्दैवी योग असा की, घुरीची अर्धी सेना ही पूर्वीची हिंदू लोक होती जी नंतर आपणचं नाकारलेली होती. अशा अनेक स्वार्‍या येत राहिल्या. आपण तोंड देत राहिलो आणि मग पुढे हजार/ दीड हजार वर्ष मुघलांचं राज्य प्रस्थापित झालं..!!
त्यातंही त्यावेळी तुंगभद्रेच्यातीरी विद्यारण्यस्वामींच्या प्रेरणेने हरिहर व बुक्कराय या दोघा बंधूंनी इ.स. १३३६ मधे विजयनगर साम्राज्य स्थापन केले. ह्या साम्राज्याचा शेजारच्या महाराष्ट्राला वेदनेवर फुंकर घातल्यासारखा, बळकट आधार वाटत होता. पण इथेही आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही व बरीदशाही यांच्या संयुक्त फौजांनी विजयनगरवर चढाई करून रामरायाला चोहींकडून कोंडले .. इथेही चुकीच्या युद्धनीतीचा वापर …!! रामराय म्हणजे, हरिहर-बुक्करायाचा शेवटचा वंशज.. त्याचेही मुंडके उडवून भाल्याला लटकून हत्तीवर चढवण्यात आले. आणि ५ लाख हिंदू सैन्याने आपल्या राजाला अशा अवस्थेत पाहताच माघार घेतली व पळ काढला. पुन्हा एकदा युद्धात चुकीच्या भावनांचा इथे प्रादुर्भाव दिसतो तो म्हणजे, युद्ध हे राजासाठी नसते तर ते ध्वजासाठी असते आणि हे साम्राज्य संपुष्टात आणले.

खरोखर हा इतिहास वाचतांनाच असे वाटते की, शिवाजीराजे जन्माला आले नसते तर काय झाले असते..?? खरं तर आपल्यातही खूप उणीवा होत्या.. ही आक्रमणं न पेलण्यासाठी..!! खूप आजारांनी ग्रासलेला होता भारतवर्ष ते म्हणजे.. संकटांचा अभ्यासंच पुरेसा नाही शिवाय परिणामतः त्या संकटावर काय योजना करावी हेही डोक्यात नाही .., सत्तेसाठी/बदल्याची भावना/ किंवा जगण्यासाठी आपल्याच लोकांनी केलेली सततची फितुरी आणि सर्वात महत्वाचे म्हणाल तर, एकराष्ट्रीयत्वाचा सातत्याने अभाव..!! हे आपल्यातले दुर्गुण शत्रूंनी चांगलेच ओळखले होते. परिणामी फक्त हार वाट्याला आलेली होती. याचे अगदी पुरावेही इतिहासकारांनी लिहून ठेवलेले आहेत.

परिणामी स्वधर्म, स्वराष्ट्र, स्वसंस्कृती, स्वाभिमान, स्वत्व या सर्वांना तिलांजली देऊन, अंधत्वाने ‘लाचार गुलाम’ म्हणून इस्लामी राजवटीची सेवा करण्यात शिवपूर्वकालीन भारतातील विद्वान पंडित व शूर क्षत्रिय आपले जीवन सार्थकी लावत होते. त्यामुळे, कोंडी फुटण्याऐवजी हा महान देश अधःपतनाच्या खोल गर्तेखाली झपाट्याने भिरकावला जाऊ लागला होता.

– संतमहंतांची मालिका –

तसे पाहिले तर .. शिवकालामधे इस्लामच्या कुठराघातून महाराष्ट्र स्वतःला व पर्यायाने भारताला कां सावरू शकला याला कारण या काळात काही विचारवंतांची मालिका सतत निर्माण होत गेली ती म्हणजे, संत-महंतांची…!!
कबीर हे १५व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि नानक हे १६व्या शतकाच्या प्रारंभी होऊन गेले. दोघांची शिकवण एकच होती. राम-रहिम एकच होत आणि शुद्ध मनाने भजन केल्यास मोक्ष मिळतो. ज्ञानेश्वरांपासून रामदासांपर्यंतची विचारवंत संत मंडळी याच काळात दिसते. त्यात नृसिंहसरस्वती, ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम व रामदास हे महत्वाचे टप्पे. इथे मला मुद्दाम न्यायमूर्ती रानडेंचा उल्लेख करणे योग्य वाटते कारण त्यांचे मत असे होते की, एकतर या संत लोकांनी बोली भाषेत मोलाचे ग्रंथ लोकांना दिले. ज्यातून जातिभेदाची तीव्रता कमी झाली. अध्यात्मिक व सामाजिक महती प्राप्त झाली. परस्परांच्या सहिष्णूतेने एकमेकांना धरून चालण्याची दिशा दिली. अशा अनेक शिकवणींनी राष्ट्राला परकीयांच्या वर्चस्वातून सोडवून संघर्षाची देशी सत्ता स्थापन करण्याचे बळ या विचारवंतांनी महाराष्ट्राला दिले. त्यातही रामदास स्वामी वेगळे..!! याचे कारण, त्यांचे उपदेश हे प्रत्येक वेळी महाराजांना स्वराज्य घडविण्यासाठी मदतगार ठरले. कारण त्यांचा रोख भक्तीबरोबर शक्तीच्या उपासनेचासुद्धा होता. आता दैवत उभे करायचे ते फक्त भक्तीचे नाही तर शक्तीचे प्रतीक हवे जेणेकरून शत्रूला बेचिराख करून सोडेल. म्हणून त्यांनी ठिकठिकाणी हनुमानाची मंदिरे स्थापन केली, मठ स्थापन केले जिथे १२० सूर्यनमस्कार घातल्याशिवाय मठात परवानगी नसे. या मठातून अनेक वेळा रामदासी लोकांनी महाराजांना बातम्या पुरवण्यास मदतंही केली. देशी सत्ता स्थापन करण्याचे बळ या विचारवंतांनी महाराष्ट्राला दिले.

हा सर्व इतिहास इथे थोडक्यात नमूद याकरता केलाय की शिवाजी महाराजांची इतकी महती किंवा ते सर्व महान योद्ध्यांपेक्षा वेगळे का होते..? कारण एकसंघ, जाती-धर्म भेद, स्त्रीयांना मातेसमान वागणूक आणि कितीही संकटे आली तरी माझी भूमि व भारतवर्ष कसा मुक्त होईल याची त्यांनी सतत काळजी घेतली. स्वतःच्या तत्वांवर अटळ राहिले. म्हणूनंच तर आज नेपोलिअन, अलेक्झांडर, तैमूरलंग..इ. असे कित्येक महान योद्धे इतिहासात अमर झाले पण… आज शिवाजी महारांजांइतकी धगधगती उर्जा नाही टिकवू शकले. शिवाय, त्यांचे एकही राज्य अस्तित्वात नाही वा कुणाला त्यांचे सोयरेसूतक नाही.

परंतु, आजही शिवरायांचं नाव घेतलं की, नवयुवकांचं रक्त सळसळते, आजही त्यांच्या आठवणीत महाराष्ट्रातील किल्ल्यांची जपवणूक होत आहे. आजही त्यांच्या प्रतिमेपाशी गेल्यावर आपसूक नतमस्तक व्हायला होते.

बहमनी कालखंडाचे विघटन झाल्यावर ज्या सरदारांच्या खांद्यावर विविध शाही सुखेनैव राज्य करीत होत्या, त्यात भोसले व जाधव या घराण्यांचा समावेश होता. मालोजी राजांपासून आपणास भोसले घराण्याचा इतिहास ज्ञात आहे. मालोजीराजे निजामशाहीतील प्रमुख मनसबदारांपैकी एक होते. त्यांना शहाजी व शरीफजी ही मुले होती. शहाजी राजांचे लग्न तत्कालीन कालखंडातील मातब्बर सरदार लखुजी जाधवराव यांची कन्या जिजाबाई यांच्याशी झाले. भातवडीच्या लढाईत पराक्रम गाजविल्यामुळे शहाजीराजांचे नाव सर्वदूर झाले. शहाजीराजे व मातु:श्री जिजाबाई यांस संभाजीराजे व स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज अशी दोन पुत्ररत्ने झाली. संभाजीराजे लढाईत मारले गेले. निजामशाही, आदिलशाही, मुघल यांच्या संपर्कात आल्यावर शहाजीराजांना स्वतंत्र राज्य स्थापनेचे महत्त्व समजले होते. आजूबाजूची परिस्थिती, काळाचे दडपण, काही अन्य मर्यादा यांमुळे शहाजीराजांना स्वराज्य स्थापना करता आले नाही.
आणि तो दिवस उगवला. दिनांक १९ फेब्रुवारी, १६३० रोजी जुन्नरजवळील शिवनेरी किल्ल्यावर शिवाजींचा जन्म झाला.

जिजाऊंनी स्वराज्याचे बीज शिवरायांमधे असे काही पेरले की त्यांच्या कारकीर्दीत … एकही विनाकारण कत्तल, एकही अन्याय, एकही अत्याचार, भ्रष्टाचार नव्हता. जातीधर्माविषयी भेदभाव नव्हता. कुठल्याही परस्त्रीकडे वर तोंड करून बघण्याची बिशाद नव्हती. असा राजा जो जनतेसाठी जगला. एक योद्धा जो अन्यायाविरुद्ध आणि लोकहितासाठी लढला. एक नेता ज्याने गुलामासारखं जगणं नाकारलं. दादोजी कोंडदेव आणि जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या या छाव्यापाशी असलेले गुण जुन्या हस्तलिखितात सापडतात. ते असे.. रत्नपरीक्षा, अश्वपरीक्षा, शस्त्रपरीक्षा, मनुष्याची अचूक पारख, राजकारणी, देवनिष्ठा, डोळ्यात शरम, उदार, घोडेचढाईत, हत्तीचढाईत, इमानी, शूर, सखोल, धीर, न्याय करणे उत्तम, परीक्षा ..इ. अनेक आहेत. समर्थही महाराजांच्या गुणसंपदेचे वर्णन करतांना म्हणतात…
यशवंत किर्तीवंत, सामर्थ्यवंत वरदवंत
पुण्यवंत, नीतिवंत, जाणता राजा ॥
आचारशील, विचारतील, दानशील, धर्मशील
सर्वज्ञपणे सुशील, सर्वांठायी ॥
याच गुणांवर त्यांनी आपल्या जीवलग सोबत्यांना घेऊन तोरण्यावरची चढाई केली. अत्यंत मुत्सद्दीपणे केलेली शहाजीराजांची सुटका व पुरंदरचा तह. प्रचंड हिंमतीने आणि चातुर्याने अफझलखानाचा वध असो किंवा सिद्धी जौहरच्या तावडीतून केलेली सुटका असो. शाहिस्तेखानावरचा धाडसी छापा असो किंवा मिर्झाराजे जयसिंगाबरोबर केलेली तहाची यशस्वी बोलणी असो.

सुरतेवरची लूट असो किंवा कडेकोट बंदोबस्त असूनसुद्धा अत्यंत सावध आणि धोरणाने स्वतःची केलेली आग्र्याहून सुटका असो. या प्रत्येक प्रसंगात या महान राजाच्या गुणांची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही.
या सगळ्या प्रसंगांना पाहून आजवर कित्येक लोकांना प्रेरणा तर मिळाली आहेच पण त्याहीपेक्षा काकणभर जास्तंच असा विचार मिळाला तो म्हणजे, ध्येयाचा, कुशल व्यवस्थापनेचा ज्यात कुठलाही वैयक्तिक स्वार्थ वा महत्वाकांक्षा नव्हती …होता तो फक्त उदात्त राष्ट्रवाद..!!

– शिवाजी महाराजांजवळील नररत्ने –

हिंदवी स्वराज्याच्या या ध्येयातंच आपल्या जगण्याचा अर्थ शोधण्यातंच जीवाभावाची माणसं त्यांनी जोडली. राजाच्या एका हाकेसरशी घरादारावर पाणी सोडणारे कान्होजी जेधे, शेंडीला गाठ बांधून दोन्ही हातात तलवारी घेऊन तोफ वाजेपर्यंत साक्षात मृत्यूला थोपवणारे बाजीप्रभू देशपांडे, अफझलखानावर जेव्हा महाराजांनी वार केला तेव्हा त्याच्यावर धावून येणार्‍या सैय्यद बंडाचा वार आपल्यावर घेत दगा-दगा म्हणणारा जीवा महाला, शाहिस्तेखानाच्या लाखोच्या सैन्याला न जुमानता अखंड चार महिने चाकणचा किल्ला झुंजवणारे फिरंगोजी नरसाळ, दोन हातात तलवारी घेऊन दिलेरखानाच्या हत्तीला पुरंदरावर दिपवणारे, स्वामिनिष्ठेची शर्थ करणारे मोरारबाजी देशपांडे, प्रतापराव गुजर, तानाजी मालुसरे, संताजी धनाजी, मोरारराव घोरपडे, दौलत छान आणि दर्या सारंग …कुठुन आली ही हिर्‍याच्या मोलाची माणसं? का स्वीकारली असेल या वाघासारख्या मावळ्यांनी महाराजांची चाकरी..? इथे एक लक्षात घेतले पाहिजे की महाराजांनी कोणालाही त्याची जात, धर्म विचारला नाही. उलट त्यांनी त्यांना हिंदवी स्वराज्याचा मंत्र दिला. भगव्या जरीपटक्याची ग्वाही दिली, ध्येय दिलं, अभय दिलं. आणि अवघ्या ५५व्या वर्षी महाराजांनी तळहातावर शिर घेऊन शत्रूवर तुटुन पडणारा, निधड्या छातीच्या वाघांचा अलौकिक संप्रदाय उभा केला..!! अशा या दैदिप्यमान आधारस्तंभाविषयी म्हणतात….

‘निश्चयाचा महामेरू… बहुत जनांसी आधारू …
अखंड स्थितीचा निर्धारू… श्रीमंतयोगी…!!’
जो श्रीमंत आहे, सर्व ऐहिक सुखांचा मालक आहे. तरीही एखाद्या योग्याप्रमाणे दैदिप्यमान अशा ध्येयासाठी बद्ध आहे. ज्याचा निर्धार अखंड आहे. ज्याचा निश्चय मेरू पर्वताइतकाच विराट आहे आणि म्हणूनच त्याच्या या भव्य अस्तित्वाचा सगळ्यांना आधार वाटत होता. कारण हिंदू भूमी मोकळे श्वास घेऊ लागली होती. गोठ्यातली गाय आणि माजघरातली माय निश्चिंत झाली. शहाजीराजांचं आणि शिवरायांचं स्वप्न साकार झाले. त्यांनी अनेक जणांना अनेक पिढ्या पुरेल इतकी उर्जा निर्माण करून ठेवली की शक्ती अनेक साम्राज्यांना पुरवून हिंदवी स्वराज्याची ज्योत तेवत ठेवेल. म्हणूनंच समर्थ म्हणतात….
शिवरायांचे आठवावे रूप,
शिवरायांचा आठवावा प्रताप,
शिवरायांचा आठवावा साक्षेप,
भूमंडळी.. !!