शिक्षण आणि समाज – निर्मिती

0
3705

– प्रा. भूषण भावे

शिक्षण हे परिवर्तनाचे प्रभावी माध्यम मानले गेले आहे. शिक्षणामुळे समाजात शांतीयुक्त क्रांती निर्माण होते. आजच्या प्रचलित शिक्षण पद्धतीत बदल घडला पाहिजे, याविषयी सर्वांचेच एकमत आहे. हे परिवर्तन घडत असताना भारताचा धार्मिक व सांस्कृतिक वारसा, इतिहास, ज्ञान-परंपरा यांच्या बरोबरीनेच आधुनिक जगातील वैज्ञानिक प्रगती आणि भविष्यकाळाची आव्हाने यांचाही समग्रतेने विचार होण्याची आवश्यकता आहे. केवळ एकांगी विज्ञान-शिक्षण देऊन शिक्षणाचे काम संपत नाही व तशा प्रकारच्या शिक्षणामुळे राष्ट्राचे पुनर्निर्माणही होत नाही हे गेल्या काही वर्षांतील शैक्षणिक इतिहासातून आपण शिकलो आहोत. शिक्षणाला अध्यात्माची साथसंगत हवी हे अधोरेखित झाले आहे. केवळ विज्ञान शिक्षणामुळे ‘वैज्ञानिक-अंधश्रद्धा’ वाढते. त्यामुळे माणूस भौतिक सुखाच्या व चैनीच्या मागे लागतो. तो सुखलोलुप बनतो. तो आपल्या गावापासून दूर शहरात किंवा अन्य देशांत स्थलांतरित होतो. त्याला आपल्याच देशातील पूर्वापार परंपरा, चालीरिती यांविषयी घृणा वाटू लागते. म्हणून विद्यार्थ्याला त्याच्या परिसराशी जोडणार्‍या, जोडून ठेवणार्‍या, सामाजिक बांधीलकीचे भाव जपणार्‍या शिक्षणाची गरज आहे.
मनुष्याच्या शरीर, मन व बुद्धीचा विकास करणारी व आत्मविश्‍वास निर्माण करणारी शिक्षण-प्रणाली विकसित करण्याची गरज अनेक मनीषींनी, विद्वानांनी व्यक्त केली आहे. शिक्षण असे हवे ज्यामुळे व्यक्तीचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीच्या संस्कारांबरोबरच श्रमप्रतिष्ठा निर्माण झाली पाहिजे. शिक्षणामुळे विद्यार्थ्यांत आत्मविश्‍वास व आत्मगौरव निर्माण होणे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्या वैभवशाली व कर्तृत्ववान इतिहासाची माहिती पाठ्यपुस्तकांद्वारे देणे गरजेचे आहे. या दृष्टीने शिक्षणाचे भारतियीकरण झाले पाहिजे. शैक्षणिक नीती व तंत्रज्ञानात भारतीय ज्ञान-विज्ञान यांची उपलब्धता व प्रोत्साहन हवे. म्हणून भारतीय सांस्कृतिक वारशाचे अध्ययन पाठ्य चर्चेमध्ये समाविष्ट व्हावे. भारतीय समाजाच्या विकासाची व उन्नयनाची आस धरणार्‍या शिक्षणाने भारतीय भाषांची कदर केली पाहिजे. इंग्रजी बरोबरीनेच स्थानिक भाषांचे परिपूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांना मिळाले पाहिजे.
समाज जीवन व व्यक्तीजीवन यांद्वारे वाढणार्‍या नकारात्मक प्रवृत्तींना फोफावू न देता त्याऐवजी सामाजिक दायित्व व सामाजिक चेतना शिक्षणामुळे वाढीस लागली पाहिजे.
प्राथमिक शिक्षणास प्राधान्य देणे फार गरजेचे आहे. शिक्षणाच्या प्राथमिक स्तरावर एकीकडे स्वयंघोषित व काहीवेळा शासन पुरस्कृत इंग्रजी शाळा व दुसरीकडे रोडावलेल्या स्थानिक पुरस्कृत इंग्रजी शाळा व दुसरीकडे रोडावलेल्या स्थानिक माध्यमांतील सरकारी शाळा या दुपदरी शिक्षण पद्धतीमुळे समाजात उत्पन्न होणारा वर्गभेद थांबविण्यासाठी समान-तत्त्वांवर आधारित सुदृढ शिक्षण पद्धतीची आवश्यकता आहे.
नवनिर्मिती होऊच नये अशी उपजत व्यवस्था ब्रिटिश शिक्षण पद्धतीत होती. अजूनही बहुतांशी आपली तीच स्थिती आहे. पूर्व-प्राथमिक शिक्षणाला कुणी वालीच नाही. ‘कुणीही यावे व टपली मारून जावे’ या म्हणीप्रमाणे कुणीही यावे व नर्सरीचे वर्ग सुरू करावेत, अशी स्थिती आहे. आजचे नर्सरी शिक्षण म्हणजे काय? काही ठरावीक खेळ खेळणे, चित्रांची पुस्तके चाळणे, पठडीतील अर्थशून्य, संस्कारशून्य गाणी म्हणणे व डबा खाणे. त्यापुढील प्राथमिक-माध्यमिक शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकांचे ओझे. महाविद्यालयीन शिक्षणातून एका बाजूने उच्चशिक्षितांचे प्रज्ञा-पलायन व दुसरीकडे निर्माण होणारा कर्तव्यशून्य नोकरशहा वर्ग इंजिनिअरिंग, मेडिकल इ. क्षेत्रांतील सेवाभाव गायब होऊन केवळ अधिकाधिक पैसा मिळविण्याची ती साधने झाली आहेत. तोच उद्देश डोळ्यांसमोर ठेवून ‘उपयोजित-विज्ञान’ (ऍप्लाइड सायन्स) शाखांकडे लागलेली गर्दी व शुद्ध विज्ञान (प्युअर सायन्स), कला, सामाजिक शास्त्र, मानसशास्त्र यांना आलेली अवकळा असे चित्र पाहण्यास मिळते. एकूण महाविद्यालयीन व विद्यापीठीय शिक्षणात नवनिर्मिती, सृजनशीलता व संशोधन यांचा अभावच दृष्टीस पडतो. ही परिस्थिती बदलण्यासाठी सर्वांत प्रथम भारताच्या वैज्ञानिक आणि सामाजिक प्रगती विषयीची अनभिज्ञता, साशंकता दूर करून त्यांविषयी विद्यार्थ्यांना अवगत करण्याच्या दृष्टीने स्थळभेटी, स्थळदर्शन यांची नितांत आवश्यकता आहे.
प्राथमिक शिक्षणाचे संस्कार, साक्षरता, भावनांची अभिव्यक्ती व परिसर – निरीक्षण हे उद्दिष्ट असले पाहिजे. तर माध्यमिक शिक्षणाद्वारे जीवनाला उपयोगी पडणार्‍या विषयांचे शिक्षण, विचारांना चालना मिळाली पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याची जशी ही अवस्था आहे, त्याप्रमाणे मूल्यशिक्षणाद्वारे सामाजिक कर्तव्यांची त्याला जाणीव करून देण्याचेही हेच योग्य वय आहे. त्यापुढील उच्च माध्यमिक शिक्षण हे व्यवसायाभिमुख असावे. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण विकसित करणे व सामाजिक समस्यांसंबंधी स्वतःचे चिंतन निर्माण करण्यास, या शिक्षणाने विद्यार्थ्यांस सक्षम बनवावे. तर त्यानंतरच्या महाविद्यालयीन शिक्षणाद्वारे संशोधन व नवनिर्मिती यांवर विद्यार्थ्यांचे लक्ष केंद्रित व्हावे. अशा प्रकारे योग, उद्योग, प्रयोग व सहयोग अशा चार सूत्रांमधून शिक्षणाची चढती कमान योजली पाहिजे. कोणत्याही स्तरावरून विद्यार्थी समाजात गेला तरीही तो समाजहिताची भावना घेऊनच जाईल अशी व्यवस्था या पद्धतीत अनुस्यूत आहे.
आध्यात्मिक शिक्षण, भौतिक शिक्षण, सामाजिक शिक्षण व धार्मिक शिक्षण असे शिक्षणाचे चार आयाम मानले जातात. माध्यमिक शिक्षणातून मूल्यशिक्षणाद्वारे चरित्रसंपन्न व नीतिमान व्यक्तित्व निर्माण होते. या प्रकारे शिक्षण आपण अंगीकारले नसल्यामुळे औद्योगिक क्षेत्रात नवनिर्मितीचा अभाव, शिक्षणाचे राजकीयीकरण व व्यापारीकरण, समाजातील सुशिक्षितांमध्ये वाढलेली उदासीनता व जे जे पाश्‍चात्त्य ते ते आधुनिक असे मानून ते अंधपणे स्वीकारण्याची लाचार वृत्ती इ. समस्या उत्पन्न झाल्या आहेत. अतिभौतिकवादी व जडवादी शिक्षण प्रणालीमुळे सामाजिक ऐक्य, सद्भाव व विकास खुंटीत झाला आहे. शिक्षण पद्धतीत परिवर्तन घडविण्याच्या दृष्टीने, स्वातंत्र्योत्तर भारतात काही व्यक्ती व संस्था यांनी केलेले प्रयोग व त्यांनी वेळोवेळी व्यक्त केलेेली मते यांच्या आधारे खालील उपाय सुचवता येतील.
ज्या उपक्रमांची भलावण आपण अभ्यासक्रमांशी संबंधित (को-करिक्युलर) व अभ्यासक्रमा-व्यतिरिक्त (एक्स्ट्रा करिक्युलर) म्हणून आजपावेतो करत आलो आहोत, त्या उपक्रमांची संख्या व गुणवत्ता वाढवणे यामध्ये विद्यार्थ्यांना शालेय तासांमध्येच व नंतरही अधिकाधिक वेळा समाजात मिसळण्याची संधी प्राप्त व्हावी. यामध्ये सामाजिक सर्वेक्षणे करणे, वस्तुनिष्ठ अहवाल तयार करणे, मुलाखती, गाठीभेटी, क्षेत्रीय भेटी, शैक्षणिक सहली इत्यादींचा समावेश असावा. शालेय अभ्यासक्रमात या गोष्टींना प्राधान्य देण्यात यावे व त्या आधारे मूल्यांकनही व्हावे.
कार्यानुभव व सामाजिक सेवा हा याच्याशी जोडलेलाच दुसरा प्रयोग. प्रत्येक शैक्षणिक संस्थेने शक्य असल्यास एक बाग, वनराई, शेत स्वतः विकसित करावे किंवा कृषी – वन इत्यादी खात्यांच्या संयोगाने प्रयोगतत्वावर चालविण्यास द्यावे. त्यातून विद्यार्थ्यांच्या कष्टांतून फळे-फुले-भाज्या यांच्या बागा फुलवाव्यात किंवा वर्षाला एक पीक घ्यावे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मातीत काम करण्याची सवय उत्पन्न होईल व श्रमप्रतिष्ठा रुजेल. क्रीडांगणावर, मैदानावर नियमितपणे खेळ, व्यायाम इत्यादी उपक्रमांत सर्व विद्यार्थ्यांना सामावून घ्यावे. आठवड्यातील किमान दोन तास याकरिता वेळापत्रकात राखून ठेवावेत. शारीरिक कष्टांची कामे केल्यानंतर शक्यतो बौद्धिकदृष्ट्या जड विषयांचे तास न ठेवता हस्तकाम, हस्तकला, बैठे-खेळ (बुद्धिबळ, इतर पारंपरिक खेळ) यांचे तास असावेत. आठवड्यातून किमान एकदा अनाथालये, वृद्धाश्रम, हॉस्पिटले इत्यादी ठिकाणी भेटी देऊन रुग्ण व अपंगांच्या व गरीबांच्या सेवेची वृत्ती विद्यार्थ्यांमध्ये उत्पन्न करावी. शाळेतील सभागृहात, मोकळ्या मैदानावर योगासने, श्‍लोक, प्रार्थना इत्यादींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर आध्यात्मिक संस्कार करावेत. यासाठी आठवड्यातील किमान तीन तास, एक तास शक्य झाल्यास औपचारिक शिक्षणास सुरवात करण्यापूर्वी सकाळी आरक्षित करावेत.
तुकड्या-तुकड्यांनी विद्यार्थ्यांना बस-स्टँड, रेल्वे-स्टेशन, पोस्ट ऑफिस, बँका, सरकारी कार्यालये इत्यादी ठिकाणचा व्यवहार करण्याचा प्रत्यक्ष अनुभव द्यावा. सुट्टीतील शिबिरे, कार्यशाळा इत्यादींचे संपूर्ण आयोजन विद्यार्थ्यांकडून करवून घ्यावे. त्यात बाजारहाट, जेवण करणे, हिशेब ठेवणे, काटकसर व बचत कार्यक्रमातील सत्रे, सूत्रसंचालन, प्रास्ताविके, विषय-मांडणी, वक्ता-परिचय, आभार-प्रदर्शन इत्यादींचा समावेश असावा. वर्षांतून किमान एकदा विद्यार्थ्यांना गिर्यारोहणासाठी न्यावे. वर्षातून किमान एकदा सहभोजनाचा अनुभव द्यावा. वर्षातून किमान एकदा केवळ स्वभाषेतून बोलणे, संस्कृत-संभाषण यांचा अनुभव द्यावा. वर्गातील विद्यार्थ्यांचेच गट पाडून हुशार विद्यार्थ्यांना एक-दोन विद्यार्थी मित्र म्हणून घोषित करून त्यांच्या अध्यापनाची जबाबदारी द्यावी. स्नेहसंमेलनांतून केवळ रेकॉर्ड डान्स नव्हे तर अभिनय, चित्रकला, रंगकाम, मूर्तिकला, संगीत, वक्तृत्व इत्यादी अनेक कलांचे प्रदर्शन घडवावे. काही शाळांमधून सातत्यपूर्वक केला जाणारा सामूहिक नाट्याचा प्रयोग स्तुत्य आहे. शाळेतील प्रत्येकास त्यात अभिनय-कला प्रदर्शित करण्यासाठी वाव मिळतो. शालेय उपक्रमांतर्गतच विद्यार्थ्यांना संगणक ओळख, टंकलेखन, पोहणे, झाडावर चढणे इत्यादींचे प्रशिक्षण द्यावे. शक्यतो गावातील तज्ज्ञ मंडळी, शाळेतून उत्तीर्ण झालेले माजी विद्यार्थी यांना त्यासाठी निमंत्रित करावे. शाळेतील निपुण व विशेष चुणूक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी त्या-त्या क्षेत्रातील प्रशिक्षणाची स्वतंत्र व्यवस्था करावी. तसेच कमकुवत विद्यार्थ्यांना शालेय तासांव्यतिरिक्त अधिक प्रशिक्षण देण्याची जबाबदारी गावातीलच इच्छुक व्यक्तींना द्यावी.
शैक्षणिक संस्थांच्या इमारतीचा आजकाल केवळ पाच-सहा तासच उपयोग होताना दिसतो. खरे म्हटल्यास संपूर्ण वास्तूचा उपयोग गावाकरिता – सामाजिक उपक्रम राबवून शालेय तासानंतर, सायंकाळी व रात्रीही होऊ शकतो. यासाठी पालक-शिक्षक संघ व गावातील इतर संस्थांच्या मदतीने गावातील युवक – महिला व इतर वर्गासाठी शिवणवर्ग, हस्तकला, संस्कारवर्ग, व्याख्यानमाला, मैदानी खेळ, वाटिका-निर्माण, वस्तुसंग्रहालय निर्माण इत्यादी अनेक प्रकारे करता येईल. त्यामुळे शाळा व समाज यातील दुरी कमी होऊन आत्मीयता वाढेल व गावातील सृजनतेलाही वाव मिळेल. पालक व गावातील इतर व्यक्तींच्या मदतीने शाळेत शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय करणे, प्रयोगशाळा सुसज्ज करणे, वाचनालय समृद्ध करणे, छोट्याछोट्या स्पर्धांसाठी बक्षिसे पुरस्कृत करून घेणे इत्यादी गोष्टी केल्यामुळे शाळेतील साधनसुविधा विकसित होण्यास मदत होईल. प्रत्येक शाळेने आपापल्या कुवतीनुसार एका गोष्टीमध्ये वैशिष्ट्यपूर्ण कार्य करून इतरांसमोर आदर्श निर्माण करता येईल. एखाद्या शाळेने विद्यार्थी, शिक्षक व कर्मचार्‍यांच्या संघटित प्रयत्नातून एक फळबाग किंवा फुलबाग निर्माण करावी. त्यातून येणारे उत्पन्न शाळेसाठी पूरक ठरेल. एखाद्या शाळेने अद्ययावत अशी प्रयोगशाळा विकसित करावी. तर दुसर्‍या शाळेने एखादा ग्रामोद्योग चालवून दाखवावा. एखाद्या शाळेने साक्षर-गावचे तर दुसरीने प्लास्टीकमुक्त गावचे व्रत अंगीकारावे. एखाद्या शाळेने जलसंधारणाचा तर दुसरीने रोगराई निवारणाचा आदर्श निर्माण करावा. अशा प्रकारचे प्रयोग सातत्यपूर्वक केल्यास काही वर्षांतच त्याचे परिणाम दिसू लागतील. समाजाची शिक्षणाकडे पाहण्याची आजची दृष्टी फारशी आशावादी नाही. उलट शिक्षणामुळे विद्यार्थी स्वतः आपल्यापासून, कुटुंबापासून, गावापासून, समाजापासून व देशापासून तुटतो, विलग होतो, अशी भावना निर्माण झाली आहे. ती भावना वरील प्रयोगामुळे बदलून समाजही शालेय उपक्रमांना साथ देण्यासाठी निश्‍चितच पुढे येईल.
या युगाला ज्ञानयुग म्हणून ओळखतात. किमान दहा हजार वर्षांची वैभवशाली ज्ञानपरंपरा असलेल्या भारताने आपल्या आध्यात्मिक तत्त्वज्ञानाच्या बरोबरीनेच आपली बौद्धिक क्षमताही जगाला दाखवून दिलेली आहे. म्हणून ज्ञान-विज्ञानावर आधारित एका नव्या विश्‍वकल्याणकारी संस्कृतीची देणगी जगाला देण्याची तयारी भारताने दाखविली पाहिजे. त्यासाठी आपल्या शिक्षणाची पुनर्रचना करून हे आव्हान स्वीकारण्यास आपण सज्ज झाले पाहिजे.
……….