शिक्षणतज्ज्ञांच्या अहवालानंतर शाळांबाबत निर्णय ः मुख्यमंत्री

0
276

राज्यातील विद्यालयाचे वर्ग सुरू करण्याबाबत शिक्षण क्षेत्रातील संबंधितांशी चर्चा करून अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर विद्यालयाचे वर्ग सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

केंद्र सरकारने अनलॉक ५ मध्ये सुरू करण्यास मान्यता दिलेल्या सर्व गोष्टी सुरू करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आली असून प्रत्येक व्यावसायिकाने आपल्या व्यवसायाला सुरुवात करण्याची गरज आहे. राज्यातील हॉटेल ८० टक्के फुल्ल झाली आहेत. कोविड महामारीच्या काळात कामकाज करण्यासाठी शिकले पाहिजे. आगामी ३ ते ४ महिने कोविड महामारीमध्ये घालवावे लागतील, अशी शक्यता मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी काल व्यक्त केली.

राज्यातील हॉटेल सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. हॉटेलमधील ८० टक्के खोल्यांचे बुकिंग झाले आहे. कोरोना महामारीच्या काळात व्यवसाय बंद ठेवल्यास नुकसान आणखीन वाढणार आहे. या कोरोना महामारीच्या काळातसुद्धा नवनवीन व्यवसाय सुरू केले जात आहेत, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

सिनेमागृहांबाबत व्यावसायिकांनी
निर्णय घ्यावा

राज्यातील सिनेमागृहे कधी सुरू करायची याचा निर्णय संबंधित व्यावसायिकांनी घेतला पाहिजे. सिनेमागृहे सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. सिनेमागृहाच्या व्यवस्थापनाने केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून सिनेमागृहे सुरू केली पाहिजेत, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

र्चाटर विमानांबाबत केंद्राकडे विनंती
केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पर्यटक चार्टर विमाने आणण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. राज्यात देशी पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. विदेशी पर्यटक आणण्यासाठी चार्टर विमान कंपन्यांनी प्रयत्न चालविले आहेत. राज्य सरकारने पर्यटक चार्टर विमानांना मान्यता देण्याची विनंती केंद्रीय गृहमंत्रालयाकडे केली आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.