शिक्षकांच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्याचा निर्णय

0
40

>> लसीकरण पूर्ण करण्यासाठी ५ सप्टेंबरपासून अंमलबजावणी

राज्यातील जास्तीत जास्त शिक्षकांचे लवकरात लवकर कोविड प्रतिबंधक लस देऊन लसीकरण पूर्ण व्हावे यासाठी ५ सप्टेंबरपासून त्यांच्यासाठी लशीच्या दोन डोसमधील अंतर हे कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षकांच्या कोविड लसीकरणातील दोन डोसमधील अंतर आता कमी करून ते सहा आठवडे एवढे करण्यात येणार असल्याचे काल कोविड लसीकरणासाठीचे नोडल अधिकारी डॉ. नेत्रावळकर यांनी सांगितले.

सध्या कोविड लसीच्या दोन डोसमधील अंतर हे १२ ते १६ आठवडे एवढे आहे. राज्यातील उच्च शिक्षण देणार्‍या संस्थांसह सर्व शैक्षणिक संस्थांनी आपल्या शिक्षकांना तसेच शिक्षकेतर कर्मचार्‍यांसाठी लसीकरण सक्तीचे केले आहे. ज्या शिक्षकांचे तसेच शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे लसीकरण झालेले नाही त्यांना दर आठवड्याला कोविड निगेटिव्ह आरटी-पीसीआर प्रमाणपत्र सादर करण्यास सांगण्यात येत आहे.

दरम्यान, चतुर्थीच्या दोन दिवसांत दि. १० व ११ सप्टेंबर रोजी राज्यातील लसीकरण बंद राहील अशीही माहिती यावेळी देण्यात आली.

कोविडमुळे चोवीस तासांत
एक मृत्यू, ९५ बाधित

काल कोविडमुळे राज्यात एकाचा मृत्यू झाला. तर कोरोनाचा संसर्ग झालेले नवे ९५ रुग्ण राज्यात सापडले. तसेच गेल्या २४ तासांत ८२ जण कोविडमुक्त झाले. त्यामुळे राज्यातील ऍक्टिव्ह कोविड रुग्णांची संख्या ८८९ एवढी झाली आहे. राज्यात कोविड पॉझिटिव्हीटीचे प्रमाण सध्या १.८ टक्के एवढे आहे. काल ५१०९ जणांची कोरोनासाठी चाचणी करण्यात आली असता त्यात संसर्ग झालेले ९५ रुग्ण सापडले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.६५ टक्क्यांवर पोहोचले आहे. कोरोनाची एकूण रुग्णसंख्या १,७४,०५० एवढी झाली आहे.

कोविडमुळे राज्यात आतापर्यंत मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ३२०२ एवढी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे सध्या ९७.६५ टक्के एवढे आहे. काल इस्पितळातून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या ४ एवढी आहे. तर काल इस्पितळात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांची संख्या ही १९ एवढी आहे.

सर्वांत जास्त रुग्ण या घडीला राजधानी पणजीत असून त्यांची संख्या ७२ एवढी आहे. काणकोणमध्ये ५४, मडगावमध्ये ४९, पर्वरी ४५, कांसावली ३९, कांदोळी ३५, कुठ्ठाळी ३७ असे रुग्ण आहेत. तर कोविडसाठीचे सर्वांत धोक्याचे हॉटस्पॉट असलेल्यांमध्ये बांबोळी, कालवी, थिवी, म्हापसा, जुवारीनगर, कुडचडे, फातोर्डा, आकें आदींचा समावेश आहे.

कोरोनाची सौम्य लक्षणे सापडल्याने काल ७६ जणांनी घरी विलगीकरणात राहण्याचा निर्णय घेतला. राज्यात आतापर्यंत १,६९,९५९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. इस्पितळात आतापर्यंत २९, ०८१ जणांनी उपचार घेतले आहेत. तर घरी विलगीकरणात राहिलेल्यांची संख्या १,२१,४९२ एवढी झाली आहे.