शिकवण

0
155

कथा अलीकडचीच आहे. १२ वर्षांचा एक मुलगा होता. एक दिवस तो रस्त्यावर चेंडूने खेळत असताना तो चेंडू बाजूच्या एका दुकानाच्या काचेवर आदळला आणि काच फुटली. पळून जायची संधी होती, पण तो पळाला नाही. दुकानदाराने त्याला पकडलं आणि तो त्याच्याजवळ पैसे मागू लागला. त्या मुलाजवळ पैसे नव्हते. मग असं ठरलं की, चार दिवस त्या मुलाने दुकानाची साफसफाई करावी.
मुलगा त्या गोष्टीला तयार झाला. त्याने चार दिवस दुकानाची साफसफाई केली. त्याने इमानदारीने काम केले. त्याच्या त्या कामावर आणि इमानदारीवर दुकानदार खूश झाला आणि त्याने आपल्या दुकानातच त्याला नोकरी दिली. तो मुलगा शिकतही होता आणि संध्याकाळी दुकानातही काम करत होता. हळूहळू आपल्या सद्गुणांनी त्याने आपल्या मालकाचं मन जिंकलं.
काही वर्षांनंतर त्या मालकाने आपल्या व्यवसायात त्याला पार्टनर केलं. आणि हळूहळू प्रगती करत त्या मुलाची तुलना श्रीमंत व्यक्तींंमध्ये होऊ लागली.
हा मुलगा आपल्या यशाचं श्रेय आपल्या आईला देतो. तो सांगतो की, आईने आपली चूक स्वीकारायची आणि इमानदारीने काम करण्याची शिकवण त्याला दिली.
मुलांनो, बालपणीच मिळालेली शिकवण आमच्या संपूर्ण जीवनात आपली सोबत करते. त्यामुळे प्रयत्नपूर्वक आपल्या मुलांना नैतिक शिक्षण अवश्य द्या. त्याने आमच्या जीवनाचं आणि समाजाचं कल्याण होईल. केवळ पैसे कमवण्याचं शिक्षण आपल्या मुलांना श्रीमंत बनवू शकतं, पण तो जीवनात सुखी तेव्हाच होईल तेव्हा तो सत्याच्या मार्गाने चालेल!