शास्त्रशुद्ध साधना महत्त्वाची

0
70

योगसाधना – ५२०
अंतरंग योग – १०५

  • डॉ. सीताकांत घाणेकर

मन व्यापक करण्याचे अनेक उपाय आहेत. त्यांत एक म्हणजे श्रीविष्णुची भक्ती- शास्त्रशुद्ध- समजून उमजून केलेली भक्ती. अशी भक्ती केली तर आपले संकुचित मनही आकाशासारखे विशाल होईल. तसेच ते शुभ्र व स्वच्छ होईल. म्हणूनच श्रीविष्णुला ‘गगन सदृशं’ म्हणून संबोधले जाते.

सृष्टिकर्त्याने स्वतःची अलौकिक बुद्धी व कर्तृत्वशक्ती वापरून एक सुंदर विश्‍व तयार केले आहे. या विश्‍वाची विविधता बघितली व त्यावर थोडेजरी चिंतन केले तर विश्वकर्माची महानता लक्षात येते. त्यातील प्रत्येक घटकावर विचार केला तर हे ब्रह्मांड किती व्यापक आहे हे लक्षात येते.
सुरुवातीलाच दृष्टिक्षेपात येतात ती पंचमहाभूते- पृथ्वी, जल, वायू, तेजाग्नी, आकाश. त्यानंतर लक्षात येतात ती म्हणजे वृक्ष, वनस्पती. त्यापुढे विविध जीवजंतू, कृमी-कीटक, पशू- पक्षी व सर्वांत उच्च मानला गेलेला मानव ज्याच्या जवळ अप्रतिम बुद्धी व कर्तृत्वशक्ती आहे. त्याची जिज्ञासाही उच्च कोटीची. त्यामुळे सृष्टीची रहस्ये शोधून काढण्याची त्याला आवड.
विविध क्षेत्रात या मानवाने नेत्रदीपक प्रगती केली- कला, विज्ञान, भूगोल, इतिहास… व त्याचबरोबर अध्यात्म. भारतात आध्यात्मिक पैलूला जास्त महत्त्व दिले गेले. त्यामुळे अनेक गूढ गोष्टींचा उलगडा झाला- जसे मानवी जीवन; आत्मा- परमात्मा; जन्म- मरण; जीव- जगत- जगदीश यांचे परस्पर नाते व संबंध. यातील अनेक विषय कठीण होते- सामान्य व्यक्तीच्या बुद्धीपलीकडचे! ते विषय सर्वांना समजावे म्हणून सोपे करण्यासाठी आपल्या ज्ञानी महापुरुषांनी विविध प्रतीके, देवदेवता, कथा… यांचा वापर करून हे उच्च ज्ञान सर्वांपर्यंत पोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. विविध कर्मकांडं, उत्सवसुद्धा त्याच प्रयत्नांचा एक अविभाज्य घटक.
प्रत्येक व्यक्तीच्या आवडी-निवडी, स्वभाव, वागणूक वेगळे. या सर्वांना एकत्र आणण्यासाठी वेगवेगळ्या देवदेवतांची निर्मिती त्यांनी केली….
उदा. – १. ब्रह्मा – सृष्टी निर्माण करणारा; विष्णू – सृष्टी सांभाळणारा;
शिव – सृष्टीचा नाश करणारा.
२. दशावतार ः मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध, कलकी.
३. प्रमुख देवतांच्या भार्या – ब्रह्माची सरस्वती, विष्णूची लक्ष्मी, शिवाची पार्वती. त्याशिवाय इतर अनेक देवता – कार्तिकेय, हनुमान.
याशिवाय प्रत्येक देवाचे वेगवेगळे वाहन.
विष्णू – गरुड, शिव – नंदी, गणपती – मूषक, लक्ष्मी – हत्ती, सरस्वती – मोर, दुर्गा – वाघ/सिंह.
तसेच प्रत्येकाच्या हातात विविध शस्त्रे/आयुधे…

  • शंख, चक्र, गदा, पद्म, त्रिशूळ, तलवार इ.
    भक्ताला देण्यासाठी – कमळ, मोदक, पुस्तक.
    दैवी शक्तीबरोबर आसुरी शक्तीदेखील दाखवल्या गेल्या. त्यातील प्रमुख म्हणजे-
  • रावण – रामावताराने वध केला.
  • कंस – कृष्णावताराने वध केला.
  • नरकासूर – कृष्णाने वध केला.
    अनेकवेळा स्त्रीशक्ती जागृत होऊन असुरांचा नाश करताना दिसतात.
  • महिषासुर मर्दिनी. त्याशिवाय विविध देवदेवतांना कुठली फुले व वनस्पती आवडतात हेदेखील त्या ज्ञानी महापुरुषांनी नमूद केले आहे. श्रीगणेश – लाल जास्वंद, दूर्वा; श्रीकृष्ण – तुळशी श्रीशंकर – बेलपत्री; श्रीविष्णु – पांढरे अनंताचे फूल त्याचबरोबर कुठल्या देवाला कोणता प्रसाद आवडतो हेसुद्धा सांगितले आहे. श्रीगणेशाला – मोदक; श्रीविष्णुला (सत्यनारायण) – शिरा या गोष्टींचा थोडा थोडा अभ्यास करता करता आणखी ज्ञान मिळावे अशी इच्छा होते. तदनंतर लक्षात येते की हे फक्त वरवरचे ज्ञान नाही तर प्रत्येक गोष्टीमागे त्यांचे खोल विचार, अभ्यास, तत्त्वज्ञान आहे – मग ती कथा असो, आयुष्य असो, नैवेद्याचा पदार्थ असो वा वाहन! या विषयावर विचार करता करता आपण भगवान विष्णूंबद्दल सविस्तर ज्ञान घेतले. त्यांचे ‘नारायण’ हे नाव, सागरातील शेषनागावर शयन, भगवंताचे गुण, त्यांच्या हातातील शंख-चक्र-गदा-पद्म या वस्तू यांचाही विविध पैलूंद्वारे विचार केला. विष्णू हा विषयच फार मोठा आहे. कारण विष्णू म्हणजे व्यापक. प्रत्येक व्यक्तीने आपले मन व्यापक बनवायला हवे, तरच जीवनविकास सहज होईल. आत्म्याला मुक्ती मिळेल. आपण घोर कलियुगातून सत्य युगात प्रवेश करू. मानवी जीवनात, आपल्या संसारात विविध छोट्या-मोठ्या गोष्टी आहेत. घटना घडतात. प्रत्येकाने त्यातील तुच्छ, त्याज्य गोष्टीत न अडकता, संकुचित मन विशाल बनवायला हवे. नाहीतर मन षड्रिपूंमध्ये – काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर व भयानक नाशवान अशा अहंकारातच गुंतून राहील. व्यक्तीचा व समाजाचाही नाश होईल. मन व्यापक करण्याचे अनेक उपाय आहेत. त्यांत एक म्हणजे श्रीविष्णुची भक्ती- शास्त्रशुद्ध- समजून उमजून केलेली भक्ती. अशी भक्ती केली तर आपले संकुचित मनही आकाशासारखे विशाल होईल. तसेच ते शुभ्र व स्वच्छ होईल. म्हणूनच श्रीविष्णुला ‘गगन सदृशं’ म्हणून संबोधले जाते. आजच्या विज्ञानयुगामध्ये मानव शरीराने जवळ आलेला आहे. दूर असला तरी थोड्याच वेळात जवळ येऊ शकतो. पण मानवतेचे दुर्भाग्य म्हणजे मनाने तो एकमेकांपासून दूर झाला आहे. दिवसेंदिवस दूर होतो आहे. कुटुंबाचेच बघा ना… एकत्र कुटुंबपद्धती नष्ट होऊन लहान कुटुंबं आलीत. हरकत नाही, काळाची तशी गरज असेल. पण दुःखाची गोष्ट म्हणजे अनेक ठिकाणी पती-पत्नीदेखील एकत्र राहत नाहीत. आधी अशा घटना पाश्‍चात्त्य देशात घडत असत. आता हा महाभयंकर रोग भारतातदेखील झपाट्याने पसरतोय. याचीच पुढची पायरी म्हणजे वाढते घटस्फोट, अनेकांचे लग्नानंतर लगेच! भगवान विष्णूचे वाहन म्हणजे गरुड. शरीराने मोठा व पक्षांचा राजा. आकाशात उंच भरार्‍या मारणारा. इथेसुद्धा आपण त्याचे गुण घेऊ शकतो. आपली दृष्टी विशाल करू शकतो. एखाद्या सच्चा राजासारखे विशाल हृदय करू शकतो- करुणामय, हितकारक. सुरुवातीला आपल्या मनात रामराज्य आणू शकतो. श्रीराम तर आदर्श पुत्र, बंधू, राजा… मानला जातो. आजच्या संकुचित जगात प्रत्येकाने असे विशाल मन व हृदय ठेवणे मानवकल्याणासाठी अत्यंत आवश्यक आहे. पू. पांडुरंगशास्त्री या संदर्भात सांगतात – ‘‘श्रेष्ठ जीवन कोणी जगून दाखवले आणि भगवान विष्णूने स्वतःच्या हातात असलेल्या कमळाने अशा नराचे पूजन केले, तर त्यात आश्‍चर्य मानण्याचे कारण नाही’’. ते पुढे एक प्रार्थना करतात – ‘‘खर्‍या अर्थाने विष्णुपूजा करण्याची सद्बुद्धी तसेच त्याच्याद्वारे प्रभूच्या हातात असलेले कमळ प्राप्त करण्याचे भाग्य ‘इह जन्मानि जन्मान्तरे वा’- आपणास मिळावे.’’ आपण सर्वांनी ज्ञान पुष्कळ मिळवले. मिळवीत आहोत. ज्ञानोपासना फारच जरुरी आहे. पण आज आहे ती फक्त माहिती. या सर्व गोष्टी जेव्हा प्रत्यक्षात आचरणात येतील तेव्हाच त्या ज्ञानाचा फायदा दिसेल. हे असे घडेल तो दिवस सोनियाचा असेल. मानवतेसाठी. मला खात्री आहे की बहुतेक योगसाधकांची वाटचाल या विकासाच्या वाटेने चालू आहे. मानवी ध्येयापर्यंत पोहोेचण्याचा प्रामाणिक प्रयत्न सर्व करताहेत. अशा साधकांना सुंदर आकर्षक कमळ देण्यासाठी भगवान विष्णू वाट पाहताहेत. …………………….. फोटो – ब्रह्मा-विष्णू-महेश
    • सरस्वती-लक्ष्मी-पार्वती
      गरुड वाहन.