राज्यातील शालेय विद्यार्थ्यामध्ये तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनाचे प्रमाणात वाढ होत असल्याचे आढळून आले आहे. राज्यातील विविध शैक्षणिक संस्थांनी कोटपा कायदा २००३ चे अनुपालन करून मुलांमध्ये तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाबाबत जनजागृती करण्याची गरज आहे, असे परिपत्रक शिक्षण खात्याच्या संचालिका वंदना राव (आयएएस) यांनी जारी केले आहे. आरोग्य खाते, गोवा दंत महाविद्यालयातर्फे राज्यातील विविध विद्यालयांच्या मुलांच्या दातांची तपासणी केली जात आहे.
या दंत तपासणीमध्ये मुले तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करीत असल्याचे आढळून येत आहे. मुले आणि पालकांना सुध्दा तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे होणार्या घातक परिणामाबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे. शैक्षणिक संस्थांनी कोटपा या कायद्याचे अनुपालन करून विद्यार्थी व युवा वर्गात तंबाखूबाबत जनजागृती कार्यक्रम राबविण्याची गरज आहे, असे परिपत्रकात म्हटले आहे.
राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक सरकारी आणि अनुदानित शैक्षणिक संस्थांच्या प्रमुखांनी तंबाखूबाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजित करून त्याबाबतची माहिती शिक्षण खात्याला द्यावी, अशी सूचना करण्यात आली आहे.