शालोम नेत्यान्याहू!

0
142
  • दत्ता भि. नाईक

भारतीयांना जिद्द व चिकाटी म्हणजे काय हे समजून घ्यायचे असेल तर ज्यूंच्या राष्ट्रवादाचा व वाळवंटात बगीचे फुलवण्याच्या कलेचा अभ्यास करावा लागेल. म्हणूनच म्हणावे लागेल, नेत्यान्याहू तुम्हाला आमचा शालोम!

रविवार, दि. १४ जानेवारी २०१८, मकर संक्रमणाचा म्हणजेच परिवर्तनाचा संदेश देणारा हा दिवस. इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेत्यान्याहू यांचे नवी दिल्ली येथे आगमन झाले. भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचे विमानतळावर उतरताच सालिंगन स्वागत केले. एकप्रकारे भारत-इस्रायलच्या प्राचीन काळापासून चालत आलेल्या सांस्कृतिक संबंधांना यामुळे उजाळा मिळाला. संरक्षण, तंत्रज्ञान, शेती इत्यादी क्षेत्रांत सहकार्य व विकास घडवून आणण्यासाठी या भेटीच्या काळात नऊ करारांवर स्वाक्षर्‍या होण्याची अपेक्षा आहे.

भारतभेटीसाठी निघत असतानाच इस्रायलमधील माध्यमांसमोर बोलताना ते म्हणाले की, ‘माझी ही भेट इस्रायल व जागतिक शक्ती असलेल्या भारतदेशामधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी आयोजित केलेली आहे. ही भेट म्हणजे इस्रायलसाठी एक मोठे वरदान ठरणार आहे.’ नवी दिल्ली येथे उतरल्यानंतर भारताच्या प्रधानमंत्र्यांनी ज्या पद्धतीने आपले स्वागत केले हे एक सुखद आश्‍चर्य आहे, असे नेत्यान्याहू म्हणाल्याचे त्यांच्या सोबत आलेल्या शिष्टमंडळातील अधिकार्‍यांनी बातमीदारांना सांगितले.

संरक्षण क्षेत्रात भागीदारी
सर्वप्रथम दोन्ही नेत्यांनी दिल्लीतील तीनमूर्ती चौकाला भेट दिली व भारत-इस्रायल मैत्रीचे प्रतीक म्हणून या चौकाचे ‘तीनमूर्ती हायफा चौक’ असे नामकरण केले. त्यांनी परराष्ट्रमंत्री श्रीमती सुषमा स्वराज यांच्याशी झालेल्या वार्तालापात देशातील पाहुणचारामुळे आपण भारावून गेल्याचे सांगितले.

आपल्या भारतदौर्‍याच्या काळात नेत्यान्याहू यानी दि. १५ रोजी ज्यू उद्योगपतींची भेट घेतली व दि. १६ रोजी रायसीना येथे एका चर्चेतही भाग घेतला. अहमदाबाद, मुंबई या शहरांना भेटी व साबरमती आश्रमालाही वंदन करणे हा त्यांच्या भारतभेटीतील कार्यक्रम आहे. मुंबई हल्ल्याच्या दरम्यान हल्ल्यात बळी पडलेल्या चबाड हाऊसला भेट देणे हाही त्यांच्या कार्यक्रमाचा भाग आहे. या हल्ल्यातून वाचलेला मोशे होल्झबर्गही आलेला आहे.

दोन्ही देशांच्या प्रधानमंत्र्यांनी प्रसिद्ध केलेल्या संयुक्त पत्रकात बदलती परिस्थिती व परदेशी गुंतवणुकीचा खुला झालेला मार्ग पाहता संरक्षण क्षेत्रात भागीदारी, संयुक्त निर्मिती व उत्पादन, तंत्रज्ञान क्षेत्रातील संयुक्त संशोधन तसेच आर्थिक व सुरक्षा या क्षेत्रांतही वाढीव सहकार्य राहील, अशी ग्वाही दिलेली आहे.
संयुक्त पत्रकात वाढत्या दहशतवादापासून जगासमोर उभ्या ठाकलेल्या समस्येचाही उल्लेख करण्यात आलेला असून कोणत्याही परिस्थितीत या कारवायांना पाठिंबा मिळता कामा नये असे मत व्यक्त केलेले आहे. याशिवाय दहशतवादाला आर्थिक मदत व आश्रय देणार्‍या संघटना व गट यांच्याविरोधात ठोस कारवाई करण्याच्या कामी एकमेकांना सहकार्य देण्याचे या संयुक्त पत्रकात स्पष्टपणे मत व्यक्त केलेले आहे.

भारतात ज्यूंचा छळ झाला नाही
भारतात कॉंग्रेसच्या नेतृत्वाखाली देशाचा स्वातंत्र्यलढा चालू होता तेव्हा ज्यूंचे एक आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळ गांधीजींना भेटण्यासाठी आले होते. इस्रायल या देशाच्या निर्मितीसाठी भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या नेत्यांनी पाठिंबा व्यक्त करावा अशी त्यांची माफक अपेक्षा होती. परंतु कॉंग्रेसमधील मुसलमान नेत्यांच्या प्रभावाखाली येऊन गांधीजींनी या शिष्टमंडळाची विनंती मान्य केली नाही. १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले व मे १९४८ मध्ये भूमध्य समुद्राच्या किनार्‍यावर पॅलेस्टाईन अरबांची तुरळक वस्ती असलेल्या प्रदेशात ज्यूंचे इस्रायल हे राष्ट्रराज्य अस्तित्वात आले. जेकब हा ज्यूंचा पूर्वज. जशी भीमाची शंकराशी कुस्ती झाली होती व शंकर त्याच्या शक्तीवर प्रसन्न झाला होता, तशीच जेकबची देवदूताशी कुस्ती झाली होती व देवदूताने त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याला इस्रायल ही पदवी दिली होती. तेव्हापासून ज्यूंना इस्रायली या नावानेही ओळखतात. केवळ देशातील मुस्लीम मतांवर डोळा ठेवून कॉंग्रेस सरकारने इस्रायलला एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता देण्यास नकार दिला.

इस्रायल हे अमेरिकेचे मित्रराष्ट्र म्हणून सोव्हिएत संघराज्याने त्याला मान्यता दिली नाही. त्यामुळे इस्रायलविरोधी गटामध्ये भारत नकळत सामील झाला तरीही इस्रायलमधील निरनिराळ्या पक्षांच्या सरकारांनी भारताच्या या धोरणावर टीका करण्याचे टाळले. याला सर्वात महत्त्वाचे कारण होते ते राजकीय नसून सांस्कृतिक होते. भारत हा विश्‍वातील एकमेव देश असा आहे की, तिथे ज्यूंचा छळ झाला नाही. आणि म्हणूनच हिंदू संस्कृती व इस्रायलची संस्कृती या एकमेकांच्या मित्रसंस्कृती आहेत असे त्यांचे मत आहे.

१९७७ साली दिल्लीत सत्तांतर झाले व मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखालील जनता पार्टीचे सरकार दिल्लीत सत्तेवर आले. त्यावेळी इस्रायलचे माजी संरक्षणमंत्री व तत्कालीन परराष्ट्रमंत्री मोशे दायान वेश पालटून दिल्लीला भेट देऊन गेले होते. परंतु हे सरकार अठरा महिन्यांनीच कोसळल्यामुळे पुढे काहीही घडले नाही. १९९१ च्या डिसेंबरमध्ये शीतयुद्ध समाप्त झाले व १९९२ मध्ये नरसिंहराव या कॉंग्रेस पक्षाच्या प्रधानमंत्र्यांनी इस्रायलशी राजकीय संबंध प्रस्थापित केले.

नेत्यान्याहू हे भारताला भेट देणारे इस्रायलचे पहिले प्रधानमंत्री नव्हेत, तर २००३ मध्ये तत्कालीन प्रधानमंत्र्यांनी भारताला भेट दिली होती. त्यावेळी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार दिल्लीत होते.
जेरुसलेमविरोधी भूमिका घेऊनही!
नेत्यान्याहू यांचे नरेंद्र मोदी यांनी ज्या पद्धतीने परंपरा सोडून स्वागत केले त्यावर कॉंग्रेस पक्षाने टीका करावी यात गैर काहीच नाही. परंतु त्यांच्या सुरात टीका कमी व टिंगल जास्त होती. डाव्या पक्षांनी निदर्शने करून निषेध व्यक्त केला हेही त्यांच्या परंपरेप्रमाणे असले तरीही २००० साली मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कणखर नेते व प. बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री इस्रायलला भेट देऊन आले होते, हे सर्व डाव्या विचारसरणीचे नेते सोयिस्करपणे विसरतात.

इस्राएलच्या शिष्टमंडळाशी प्रधानमंत्री, परराष्ट्र व्यवहारमंत्री यांच्याबरोबर संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण, इतर मंत्र्यांमध्ये हर्षवर्धन, मावळते परराष्ट्र सचिव एस. जयशंकर, याशिवाय आधुनिक राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखले गेलेले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हेही चर्चेत सहभागी झाले.

गेल्या महिन्यात डोनाल्ड ट्रम्प यांच्या अमेरिकेचा दूतावास जेरुसलेममध्ये हलवण्याच्या विषयावर संयुक्त राष्ट्रामध्ये मतदान घेतले गेले. त्यावेळी १२७ राष्ट्रांनी हा निर्णय फेटाळून लावला, त्यात भारताचाही समावेश होता. परंतु दोन्ही देशांनी या राजकीय निर्णयाला उभय राष्ट्रांच्या संंबंधांच्या आड येऊ दिले नाही. खारे पाणी पिण्यायोग्य करण्याचे यंत्र बसवलेली जीप भारताला भेट देणे, याशिवाय अहमदाबाद येथे ‘जय भारत, जय इस्रायल’ची नेत्यान्याहू यांनी घोषणा देणे यावरून संबंध मूळ पदावर दृढ झाल्याचे सिद्ध झाले.

जगातील सर्व मुसलमान इस्रायलचा द्वेष करतात, तरीही या कल्पनेला छेद देणार्‍या काही घटना घडतात. जन. परवेझ मुशर्रफ यांनी पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष असताना अमेरिकेच्या दौर्‍यात अमेरिकेतील ज्यू समाजाबरोबर एक बैठक केली होती. भारताच्या पाकिस्तान व चीनबरोबर असलेल्या तणावपूर्ण संबंधांवर इस्रायल सरकार भाष्य करण्याचे टाळते. कित्येक अरब राष्ट्रांचे भारताशी अतिशय चांगले राजनैतिक संबंध आहेत, परंतु जम्मू-काश्मीरच्या बाबतीत ते भारताच्या पाठीशी नाहीत. तसेच भारत सरकार पॅलेस्टाईनच्या स्वातंत्र्याला पाठिंबा देऊनही इस्रायलशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवू शकते.

जिद्द व चिकाटी
इतके असूनही भारत व इस्रायल हे दोन देश एकमेकांचे नैसर्गिक मित्र आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे दोन्ही देशांमध्ये सांस्कृतिक मैत्रीबरोबर सामरिक करार होऊ शकतात. मुसलमान, ख्रिस्ती व कम्युनिस्टांनी जसा ज्यूंचा व ज्यूंच्या राष्ट्राचा दुस्वास केला तसा हिंदूंनी केला नाही. ज्यूंचा धर्मांतरावर विश्‍वास नाही. त्यामुळे या समाजाच्या संपर्काचा हिंदूंना त्रास होऊ शकत नाही. महाराष्ट्रात स्थायिक झालेल्या ज्यूंचे नेते विजू पेणकर व त्यांचा समाज स्वतःला बेने इस्रायल अर्थात इस्रायलचे पुत्र म्हणवून घेतात. त्यांना ज्यू असल्याचा जितका अभिमान आहे, तितकाच मराठीपणाचाही आहे. अलीबाग येथे बेने इस्रायलचे संमेलनही अलीकडेच भरवले गेले, हाही एक चांगला योगायोग म्हणावा लागेल.

नेत्यान्याहू यांनी नरेंद्र मोदी यांचे वर्णन करताना त्यांना ‘क्रांतिकारक नेता’ म्हटलेले आहे. कुठलाही ज्यू फुकाची खुशामत करत नसतो. इस्रायल समाज स्वतःच्या आत्मविश्‍वासावर हजारो वर्षे तग धरून राहिलेला आहे. स्वतःच्या भूमीतून परागंदा झाल्यानंतरही राष्ट्र जिवंत ठेवण्याचे कसब ज्यू समाजामध्ये आहे. विश्‍वातील कोणत्याही वंशामध्ये ते नाही. भारतीयांना जिद्द व चिकाटी म्हणजे काय हे समजून घ्यायचे असेल तर ज्यूंच्या राष्ट्रवादाचा व वाळवंटात बगीचे फुलवण्याच्या कलेचा अभ्यास करावा लागेल. म्हणूनच म्हणावे लागेल, नेत्यान्याहू तुम्हाला आमचा शालोम!