शरद पवार, संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी

0
5

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सोशल मीडियावरून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. महाराष्ट्रातील दोन मोठ्या नेत्यांना काल जीवे मारण्याची धमकी आल्याने एकच खळबळ उडाली.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यानंतर काल खासदार संजय राऊत आणि त्यांचे बंधू आमदार सुनिल राऊत यांना देखील फोनवरून धमकी आल्याचा प्रकार समोर आला.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना ‘राजकारण महाराष्ट्राच’ या नावाच्या ग्रुपवर ‘तुमचा दाभोळकर करू’ अशा आशयाची जीवे मारण्याची धमकी आली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात जाऊन धमकी प्रकरणाची माहिती दिली. राष्ट्रवादी काँग्रेस या प्रकरणावर चांगलीच आक्रमक झाली असून, पवारांना धमकी देणारा आरोपी भाजपशी संबधित असल्याचे म्हटले आहे.

शरद पवार धमकी प्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. राष्ट्रवादीकडून करण्यात आलेल्या तक्रारीनुसार नर्मदाबाई पटवर्धन आणि सौरभ पिंपाळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादंवि कलम 153 -, 504, 506(2) अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखा पुढील तपास करत आहेत.
शिवसेना खासदार संजय राऊत यांना आणि त्यांचे बंधू आमदार सुनील यांना देखील फोनवरून धमकी आली. धमकी देणाऱ्याने संजय राऊत यांनी सकाळची पत्रकार परिषद बंद करावी अथवा भावासह जीवे मारण्यात येईल अशी धमकी दिली. या प्रकरणात गोवंडीतील दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या धमक्यांनंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेची गंभीर दखल घेत कुठल्याही राजकीय व्यक्तीला धमकी देणे खपवून घेणार नसल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी गृह खाते तत्काळ कारवाई करेल, असे आश्वासन देखील त्यांनी दिले. विरोधी पक्षाने मात्र राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याची टीका सरकारवर केली आहे.