शब्द .. शब्द .. जपून ठेव!

0
1184
  •  माधुरी रं. शेणवी उसगावकर
    (फोंडा)

हसवणे, लाजवणे, अर्थाचा अनर्थ करणे, अनर्थाचा अर्थ करणे हे सर्व शब्दांना छान जमते. शब्दांचीच जणू शर्यत असते. दोन जिवांना जोडणे- तोडणे ही जादू शब्दच जाणतात. असे विविध अर्थ घेऊन शब्द अवतरतात व सर्वकाही करून सवरून ते स्वतः नामानिराळे होतात.

शब्दांचे वर्णन शब्दात कसे सांगावे? ते तर शब्दातीत. शब्द हा भाषेचा अविभाज्य घटक आहे. परंतु शब्दाविना व्यक्त कसे करणार? प्रश्‍नच आहे. शब्दांचे सामर्थ्य ‘अवर्णनीय’ आहे, हे सांगतानासुद्धा शब्दांच्या कुबड्या घ्याव्या लागतातच ना! परमात्मास्वरूप आळवताना ‘ॐकार स्वरूपा तुज नमो’ शब्दांविना अशक्य. ‘गुरुर्ब्रह्मा, गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्‍वरः’ अशा शब्दात गुरुमंत्राचा महिमा वर्णन केला आहे.
शब्दांचे महत्त्व कथन करतानाही शब्दांच्याच आधारे शब्दबद्ध करण्याचा हा शाब्दिक प्रयास. तत्पूर्वी प्रख्यात कवी ना. धो. महानोरांच्या काव्यातून शब्ददेवतेला विनम्र आवाहन!

‘‘शब्दांचा हा खेळ मांडिला| तुझ्या कृपेवर ईश्‍वरा॥
आम्हा शक्ती दे शब्द शारदे| गौरीतनया ईश्‍वरा॥
सहज, सुंदर भावमधुर अशा शब्दांनी शक्तीदेवताना प्रार्थना केलेली आहे. प्रार्थना म्हणजे केवळ भक्त व ईश्‍वरातील संवाद नव्हे तर ती एक प्रेरित शक्ती आहे. शब्दांच्या खेळातून शब्दांचे महत्त्व प्रकट होते. कवींच्या लेखणीतून शब्दकळा फुलली नसती तर काव्याची असीम गोडी चाखता आली नसती.
संतसज्जनांच्या वाणीत शब्दसामर्थ्य दिसून येतं. श्री समर्थ म्हणतात –
‘‘शब्दपरिक्षा अंतरपरीक्षा| काही येक कळे दक्षा|
मनोगत नतद्रष्टा| काय कळे॥
दुसर्‍यांच्या बोलण्यावरून त्यांच्या अंतरंगातील विचारांची परीक्षा दक्ष किंवा सावध माणसाला करता येते. नतद्रष्ट, कोत्या वृत्तीच्या लोकांना मनोगत काय कळणार? अशा शब्दांनी श्रीसमर्थांनी आत्मसुधारणेचे मर्म सांगितले आहे.
लोकांना नावं ठेवायची आणि आपली आपणच पाठ थोपटावी हा बहुतेकांचा स्वभावच असतो. अहंभाव हाच ज्यांचा स्थायीभाव आहे त्यांच्या संबंधातील हे संतांचे अचूक निरीक्षण संतवाणीत शब्दांकित आहे. शब्दांविना संतवाणीच नाही.
‘निराकार ब्रह्म है आये| गीता का ज्ञान सुनाए|’
ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः| शब्द नसते तर भगवद्गीतेचे ज्ञान आकलन झालेच नसते. श्रीकृष्णलीलेत परमात्म्याच्या अद्भुत लीलांची किमया अगाध आहे.
मानवाला जगण्याकरिता श्‍वासोच्छ्‌वासाची आवश्यकता आहे. श्‍वासोच्छ्वास हा जीवनाचा प्राण आहे. तसेच जीवनात शब्दांचे महत्त्व आहे. शब्दांमुळे मानवी जीवन संतुलितही होऊ शकते. अर्थात धारदार शस्त्र उपसताना खबरदारी मात्र घ्यावी लागते. मात्र हे आकलनाचे साधन महत्त्वाची भूमिका बजावते. जीवनात जे मिळाले आहे ते सकारात्मक दृष्टिकोनाने बघायचे म्हणजे बाहेरचे नकारात्मक विचार येऊन मन असंतुलित होत नाही. हे वाचन, अनुभूती शब्दांमुळे शक्य आहे; किंबहुना अशक्यच.
ज्ञानियांच्या राजाने विश्‍वात्मक देवाजवळ मागितलेले पसायदान म्हणजे शब्दमंदिरावरचा रत्नजडित कळसच.

‘‘दुरितांचे तिमीर जावो| विश्‍वस्वधर्म सूर्ये पाहो|
जो जे वांछील तो ते लाहो| प्राणिजात॥
हे पसायदान प्राप्त करून ‘ज्ञानदेवो सुखिया झाला’. ज्ञानदेवांच्या मधुर शाब्दिक उपदेशाने, सर्वार्थाने पसायदान अक्षर झाले. इवल्याशा बीजात विशाल वटवृक्ष सामावला जावा त्याप्रमाणे छोट्याशा शब्दात शक्ती फार मोठी असते. शब्द लहान तरी त्याची शक्ती महान.
शब्दरचनेमुळे अभंगवाणीतील सौंदर्य वृद्धिंगत होते. भजनप्रेमी साधकांचे जीवनातील दुःख हलके होऊन मनःशांती प्राप्त होते. नित्य नामस्मरण, प्रार्थना केल्याने माणसाच्या मनातील अनिष्ट विचार, अनिष्ट भावना, अनिष्ट कल्पना वगैरे सर्व अनिष्ट गोष्टी नष्ट होऊन माणसाचे मन शांत, निवांत, प्रेमळ होते. बहिर्मन व अंतर्मन यांच्यात भावनिक ऐक्य व सुखसंवाद साध्य होऊन समाधान प्राप्त होते.
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवभाव|….
गानसम्राज्ञी किशोरी आमोणकर यांच्या स्वरातील हा अभंग ऐकताना नाममहिमाच्या अद्भुत गोडीत मन रमून जाते. विठ्ठल नाम अमृताचे पान. असे म्हटले जाते की पंढरीला जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेणे हे चांगलेच, पण अखंड नामाचा उच्चार करून देहाची पंढरी करणे हे त्याहून चांगले.
मिठाने अन्नाला चव येते त्याप्रमाणे शब्दांनी भाषा सालंकृत होते. शब्द हे भाषेचा उपयुक्त आधार आहेत. शब्दांमुळे जीव आणि देव एकच आहेत हा प्रेमभाव ईश्‍वरभक्तीत आढळून येतो. कोणीही पाणी प्यावे व तृष्णामुक्त व्हावे त्याप्रमाणे शब्दसंपदेच्या ज्ञानामृताने जीवन सफल करावे. शब्दांची गोडी लागल्याशिवाय शब्द ज्ञान लाभत नाही व शब्दज्ञान लाभल्याशिवाय शब्दांची गोडी लागत नाही, असे हे विलक्षण सूत्र आहे.

भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात शब्दांना वेगळीच चमक होती. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच’ लोकमान्य टिळकांच्या या स्वराज्य मंत्रात शब्दशस्त्राने इंग्रजांचं धाबं दणाणून सोडलं होतं. ‘इन्किलाब जिन्दाबाद’, ‘वंदे मातरम्’च्या गगनभेदी आरोळ्यांनी इंग्रजांना जरब बसला. ‘चले जाव’च्या इशार्‍याने परकीयांचा थरकाप उडाला. क्रांतीवीरांच्या शब्दशस्त्रांच्या मदतीने मातृभूमीच्या पायातील बेड्या निखळल्या. पाशवी, हिंस्त्र वृत्तीच्या दानवी सत्तेतून आपला देश स्वतंत्र होणे केवळ दुरापास्तच होते.
पण सावधान!! शब्द हे धारदार शस्त्रही आहे. शत्रूवर तुटून पुडताना शब्द दिव्य अस्त्राचं काम करतात. शब्द हे ‘दुधारी शस्त्र’ही आहे. तेव्हा ते जपून वापरावे. एकदा सोडलेला बाण आणि मुखातून सुटलेला शब्द माघारी घेता येत नाही. शब्द उच्चारताना भान असणे आवश्यक आहे. नाहीतर आपल्या हातातील शस्त्र शत्रूऐवजी आपल्या छातीतच खुपसण्याची शक्यता जास्त असते. जखमेवर मीठ चोळण्याचे कामही ते चोखपणे पार पाडतात.

शब्दांच्या महतीची वेगळी पद्धतही आहे. राईचा पर्वत आणि पर्वताची राई करावी ती शब्दांनीच. काही व्यक्तींकडे खर्‍याचं खोटं आणि खोट्याचं खरं करण्याची नामी शक्कल असते. उदा. वकील. तसेच निवडणुकीतील उमेदवार आपल्या भाषणबाजीने खोट्या आश्‍वासनांनी स्वार्थ साधून घेतात. शब्द टाकणे, शब्द पाळणे याला महत्त्व आहे. शब्दांच्या सामर्थ्यामुळेच शब्दांचा दुरुपयोग करण्याकरिताही शब्दप्रयोग केला जातो. स्वार्थांध लोक याचा बेसुमार फायदा उठवतात आणि आपले पितळ झाकण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे सत्य-असत्याचा पडताळा करणे मुश्कील होते. थोडक्यात शब्द ही शक्ती आहे. तिचा वापर कसा करायचा ते ठरवणं प्रत्येकाच्या हाती आहे.
कवी हे शब्दांचे मानकरी आहेत. शब्दातील गुह्य रहस्य काय ते कवींनाच उलगडते, असे त्यांच्या काव्यरचनेत दिसून येते. काव्यलेखन हे प्रतिभेच्या उर्मीवर अवलंबून असते. कधी कधी शब्द खंडित होतात; तर कधी शब्दांचा धो-धो ओघ सुरू होतो. काही कवितेत सुबक, गोंडस आणि कशिदाकारी शब्दप्रयोगाने आशय उत्कटपणे खुलताना दिसून येतो. तर काही कवितांत धुव्वाधार पावसाप्रमाणे शब्दांच्या थयथयाटाने कविता रौद्ररूप धारण करते. शब्दसंगमामुळे कविता हृदयाला भिडणार्‍या असतात. कविता ही जणू कवीच्या सर्व सुखदुःखाशी समरस होणार्‍या सखीप्रमाणेही असते.
कवीच्या प्रतिभेला चिमटीत पकडणे म्हणजे व्यापक कल्पकतेला सीमित करणे. कवीचं मन कधी फुलपाखरू बनून फुलातील मध चाखील तर कधी पक्षी बनून फांदीवर हिंदोळा घेईल. कवितेविषयींचे त्यांचे प्रेमांकुर शब्दघनाच्या अमृत वर्षावाने कधी तजेला धरतील, बहरतील हे कल्पनातीत आहे. भुरळ घालणार्‍या शब्दांनी कवींच्या प्रतिभेला मोहर फुटतो.

कवींच्या जीवनात कविता हीच चिरंतनतेचे वरदान देणारी संजीवनी आहे. दुःखात धीर देते. नवनिर्मितीचे बळ देते. आत्मभाव व्यक्त होतो. कवी आत्मनिष्ठही बनतो. कवितेच्या शब्दकळेतून अचेतनाला चैतन्याची कळा प्राप्त होते.
तुकाराम महाराज….
‘‘आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने
शब्दांचीच शास्त्रे, यत्न करु ’’
असा शब्दांचा गौरव करतात. शब्दच जीवाचे जीवन असा भाव ते प्रगट करतात. शब्दांचा महिमा हा शब्दांच्या पलीकडचा आहे. शब्द तोकडे पडणारा. कितीही सांगितला तरी न संपणारा, अक्षय. बोललेला शब्द प्राणपणाने जपणे म्हणजे शब्दब्रह्माची पूजा आहे. ‘प्राण जाए पर वचन न जाए’ हा आदर्श आहे.
विषयाचे आशयघन व्यक्त होण्याच्या क्षमतेत शब्दांची साथ असावी लागते. हसवणे, लाजवणे, अर्थाचा अनर्थ करणे, अनर्थाचा अर्थ करणे हे सर्व शब्दांना छान जमते. शब्दांचीच जणू शर्यत असते. दोन जिवांना जोडणे- तोडणे ही जादू शब्दच जाणतात. असे विविध अर्थ घेऊन शब्द अवतरतात व सर्वकाही करून सवरून ते स्वतः नामानिराळे होतात.