- स्पृहा जोशी
ना. धों. महानोर अनोखे आयुष्य जगले. त्यांची कविता अनुभवांमधून उगम पावत असे. ते अत्यंत कृतिशील साहित्यिक होते. त्यांच्या कवितेत कायमच एक प्रकारचा सहजपणा जाणवला. रोजच्या बोलण्यातले शब्दच त्यांच्या कवितेमध्ये आढळतात. सहजगम्य कविता असल्यामुळे त्यांचे साहित्य समजायला आणि अनुभवायला सोपे गेले. आपण कुठल्याही प्रसंगामध्ये असलो तरी त्यांच्या कवितांचे पुस्तक उघडून आस्वाद घेता येतो.
माझी ना. धों. महानोरांशी पहिली भेट शाळेच्या पुस्तकामध्ये झाली. ‘या नभाने या भुईला दान द्यावे’ या कवितेला पाठ्यपुस्तकामध्ये मानाचे स्थान होते. शाळेत असताना गुण मिळवण्यासाठी घोकंपट्टी करताना आपल्याला कवितेचा मथितार्थ समजत नाही. तेव्हा आपण काय वाचतो आहोत हे समजण्याची कुवतच नसते. ‘या शेताने लळा लावला असा…’ या कवितेमध्ये असणारी अनुभवसिद्धता कळण्यासाठी वैचारिक वय वाढावे लागते. सहजसोपे शब्द आणि त्यामध्ये दडलेला मथितार्थ ही त्यांची खासियत होती. पण हे शाळेतल्या कवितेमधून समजले नाही. पुढे कवितेचा अभ्यास करताना सोप्या शब्दांची महती काय असते हे त्यांच्या साहित्यामुळे समजले. पुढे काही कार्यक्रमांच्या निमित्ताने त्यांच्याशी प्रत्यक्ष भेटण्याचेही भाग्य लाभले. तेव्हा वेळेअभावी निवांत गप्पा झाल्या नाहीत, ही खंत कायम राहील. काही व्यक्तींना आपल्या आयुष्यातील जास्तीत जास्त वेळ समर्पित करावा असे वाटते. महानोरांच्या बाबतीत माझेही तसेच काहीसे झाले होते. मी त्यांना कितीतरी वेळा भेटायला येणार असल्याचे वचन दिले होते. त्यांनी मला पळसखेडला येण्याचे आमंत्रणही दिले होते. मला जळगावला जाऊनही पळसखेडला त्यांची भेट घ्यायला जाता आले नाही. काही भेटींचा योग यावा लागतो हेच खरे! पण अशा व्यक्तींना आपण कायम एका अंतरावरून बघत असतो. त्यांच्याविषयी मनात आदर ओतप्रोत भरलेला असतो. महानोरांबद्दलही मला अगदी तसेच वाटते.
ना. धों. महानोर अनोखे आयुष्य जगले असे मला कायम वाटते. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, त्यांची कविता अनुभवांमधून उगम पावत असे. ते जेव्हा ‘शब्दगंधे तू मला बाहूंमध्ये घ्यावे’ असे लिहितात तेव्हा खरोखरच त्यांनी तो गंध अनुभवलेला असतो हे लेखनातून आपल्याला जाणवत राहते. त्यांच्या साहित्याबद्दलचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ते अत्यंत कृतिशील साहित्यिक होते. आपल्याला बालकवी, बहिणाबाई, महानोर या कवींची मार्मिक परंपरा लाभली आहे. त्यामधील बालकवींची भाषा प्रमाण भाषेच्या जवळ जाणारी, संस्कृतप्रचूर आहे. पण महानोरांच्या कवितेत कायमच एकप्रकारचा सहजपणा जाणवला. आपल्या रोजच्या बोलण्यातले शब्दच त्यांच्या कवितेमध्ये आढळतात. सहजगम्य कविता असल्यामुळे त्यांचे साहित्य समजायला आणि अनुभवायला सोपे गेले. आपण कधीही, कुठेही, कुठल्याही प्रसंगामध्ये असलो तरी त्यांच्या कवितांचे पुस्तक उघडून आस्वाद घेता येतो.
महानोरांविषयीची आणखी एक कौतुकास्पद बाब म्हणजे ते उतारवयातही शेती करत होते आणि तरीही त्यांचा जगाशी संपर्क तुटला नव्हता. सध्याचे वास्तव काय आहे हे जाणून घेण्याची असोशी त्यांच्याकडे होती. कवितेपासून राजकारणापर्यंत असणारी त्यांची वैचारिक जाण थक्क करून सोडणारी होती. त्यांच्या कवितांवर गीताचे संस्कार झाल्यावरही मूळ सौंदर्य अबाधित राहिले. ‘श्रावणाचं ऊन मला झेपंना’, ‘राजसा जवळी जरा बसा’ अशा त्यांच्या लावण्या प्रचंड गाजल्या. ‘दोघी’, ‘अजिंठा’ या चित्रपटांमधील गाणी अजूनही ओठांवर आहेत. ‘पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा’, ‘आम्ही ठाकरं ठाकरं’, ‘मी रात टाकली’, ‘घन ओथंबून येती’ या गीतांनी मराठी चित्रपटसृष्टीवर अक्षरशः राज्य केले. महानोरांच्या अनेक कवितांची गीतांमध्ये रूपांतरे झाली. तरीही कविता म्हणून वाचताना ही गीते आणखी भावतात. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्या कवितेमधील सहजता. मला मनापासून भावलेल्या त्यांच्या कवितांमधील एक म्हणजे ‘या नभाने या भुईला दान द्यावे…’ त्यांची ही कविता क्लासिक आणि कालातीत आहे असे मला वाटते. त्या कवितेतील शब्दमाधुर्य मनाला अतिशय भावते. आमच्या पिढीसाठी त्यांच्याकडून शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. त्यातील सोपे आणि छंदबद्ध कसे लिहावे हे कौशल्य विशेष महत्त्वाचे वाटते. आमच्या पिढीने छंदबद्ध कविता शिकणे फार गरजेचे आहे. फार अगम्य किंवा वेगळेच लिहिण्याच्या नादात आम्ही अनुभवकथन करणेच विसरतो. आपल्या आसपासच्या विश्वामधूनच कवितांचे विषय मिळत असतात हे महानोरांच्या कविता शिकवून जातात. साधेपण आणि प्रासंगिकता यातून आलेला गोडवा त्यांच्या कवितेमध्ये प्रकर्षाने जाणवतो, हे कवितेचा अभ्यास करताना लक्षात ठेवण्यासारखे आहे. हल्लीच्या कवितांमध्ये पूर्वीच्या कवींचा गोडवा नसतो असा सूर उमटतो. पण मला मनोमन तसे वाटत नाही. प्रत्येक पिढीसमोर वेगवेगळी दृश्ये असतात. त्यामुळे कवितेतील गोडव्याचे स्वरूप बदलते. पण या बदलांमध्ये अबाधित असलेली एक गोष्ट म्हणजे अनुभव. आपल्या अनुभवांशी प्रामाणिक राहून लिहिलेले साहित्य कायमच वाचकांच्या मनाला भिडते.
महानोर, नारायण सुर्वे यांच्या कवितेतील पर्यावरणाचे वर्णन मनात घर करून बसते. निसर्गाचे जे रूप प्रत्यक्ष बघायला मिळाले नाही, ते मी त्यांच्या कवितेतून बघितले. उतरलेल्या नभामधून बरसणारा पाऊस बघायच्या आधीच मी ‘नभ उतरू आलं…’मधून थरथरणाऱ्या अंगाची अनुभूती घेतली. ‘या शेताने लळा लाविला असा…’मधून निसर्गही जीव लावू शकतो. किंबहुना, माणसापेक्षा जास्त जिव्हाळा दाखवू शकतो हे जाणवले. कळीत साकळलेले केशर, फुलांमध्ये न्हालेली ओली पहाट, कठीण झालेली पहिलटकरीण या साध्यासोप्या शब्दांचे गहन अर्थासाठी प्रतिमेमध्ये कसे रूपांतर करायचे हे त्यांच्या कवितेतून शिकण्यासारखे आहे. त्यांच्याकडून हजारो गोष्टी शिकायच्या होत्या; त्या राहून गेल्या याचा खेद आहेच. पण त्यांच्या काव्यसंग्रहाचा वरदहस्त आयुष्यभर माथ्यावर राहील. हे महान कवी कालवश झाले असले तरी त्यांचे कालातीत साहित्य आशीर्वाद म्हणून लाभले आहे, हीच काय ती पुंजी!
मातीशी जोडलेला कवी (ना. धों. महानोर यांचे साहित्य)
निसर्ग आणि स्त्री ही महानोरांच्या कवितेची केंद्रस्थाने. त्यांच्या कवितेत निसर्गाचे विविध गंध आढळतात, विविध ध्वनी आढळतात, निसर्गाच्या स्पर्शाने फुललेला आणि रोमांचित करणारा शृंगार त्यात झळकतो. या कवितेत मातीशी जडलेली नाती आहेत. महानोरांनी गद्य लेखनही भरपूर केले. ‘गांधारी’ ही कादंबरी, ‘गपसप’ आणि ‘गावाकडच्या गोष्टी’ हे लोककथांचे संग्रह, ‘ऐशी कळवळ्याची जाती’ हा व्यक्तिचित्रणात्मक ललित लेखांचा संग्रह असे विविधांगी ललित लेखन त्यांच्या नावावर आहे. याशिवाय ‘यशवंतराव चव्हाण यांचे मौलिक विचार’, ‘शरद पवार आणि मी’ तसेच ‘आनंदयोगी पु. ल.’ या पुस्तकांमधून त्यांनी महाराष्ट्रातील मोठी व्यक्तिमत्त्वे उलगडण्याचा प्रयत्न केला. अर्थात, महानोरांचे पहिले प्रेम कवितेवरच आहे. ‘रानातल्या कविता’ या त्यांच्या पहिल्याच कवितासंग्रहाने मराठी कवितेत महत्त्वाचे स्थान निर्माण केले. त्यांचे 11 कवितासंग्रह आणि ‘अजिंठा’ हे खंडकाव्य प्रकाशित आहे. ‘वही’ आणि ‘पळसखेडची गाणी’ हे त्यांच्या लोकगीतांचे संग्रह आहेत.
महानोर यांनी चित्रपटांसाठी उत्तमोत्तम गाणी लिहिली. ‘जैत रे जैत’ या चित्रपटात त्यांच्या कविताच गाण्यांच्या रूपाने आविष्कृत झाल्या आहेत. बऱ्याच लोकांना रानकवी, निसर्गकवी अशी त्यांची ओळख आहे; परंतु त्यांनी ठसकेबाज लावण्याही लिहिल्या असल्याचे अनेकांना ज्ञात नसेल. श्रावणातील उन्हाचा कोवळेपणा आणि स्त्रीच्या नाजूकपणाचा साज एकत्रितपणे चितारणारी ‘श्रावणाचे ऊन मला झेपेना’ ही त्यांची लोकप्रिय झालेली ठसकेबाज लावणी. ‘एक होता विदूषक’ या चित्रपटासाठी आशा भोसले यांनी ही लावणी गायली. ‘चिंब पावसानं रान झालं आबादानी’, ‘नभ उतरू आलं’, ‘जांभूळ पिकल्या झाडाखाली’, ‘किती जीवाला राखायचं राखलं’ अशी एकाहून एक सरस गाणी ना. धों. महानोरांनी लिहिली. महानोहांचे अनेक कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांपैकी ‘अजिंठा’ या दीर्घ काव्यसंग्रहाचा विशेषत्वाने उल्लेख करावा लागेल. ‘गंगा वाहू दे निर्मळ’, ‘जगाला प्रेम अर्पावे’, ‘दिवे लागणीची वेळ’, ‘पावसाळी कविता’, ‘रानातल्या कविता’ हे त्यांचे काही प्रसिद्ध कवितासंग्रह. ‘गपसप’, ‘गावातल्या गोष्टी’ हे त्यांचे कथासंग्रहही आहेत. त्यांनी आपल्या साहित्यात बोलीभाषांचा वापर केला. ‘पानझड’, ‘तिची कहाणी’, ‘पळसखेडची गाणी’ ही महानोरांनी लिहिलेली गाणी मराठवाडी लोकगीतांचा खजिनाच आहेत.