शपथविधी सोहळ्यावर साडेसहा कोटींचा खर्च

0
22

>> व्हीआयपी व्यक्तींच्या वाहनांवरील आणखी एक खर्च आरटीआयमधून उघड

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या डॉ. शामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम झालेल्या दिमाखदार शपथविधी सोहळ्यासाठी अतिमहनीय व्यक्तींसाठी १३४ वाहने भाडेपट्टीवर घेण्यात आली होती. त्यावर सुमारे ७२ लाख २१ हजार ९७२ रुपये खर्च करण्यात आले आहेत. भाजप सरकारच्या शपथविधी सोहळ्यावर एकूण ६ कोटी ५६ लाख रुपये खर्च करण्यात आल्याचे माहिती अधिकारातून स्पष्ट झाले आहे.

ऍड. आयरिश रॉड्रिग्स यांनी माहिती हक्क कायद्या (आरटीआय) खाली शपथविधी सोहळ्यासाठी भाडेपट्टीवर वापरलेल्या वाहनांसाठी किती खर्च करण्यात आला, याची माहिती मिळवली आहे. गोवा पर्यटन विकास महामंडळाकडून मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी व्हीआयपी व इतरांसाठी १३४ वाहने भाडेपट्टीवर घेण्यात आली होती, त्यावर तब्बल ७२ लाख २१ हजार ९७२ रुपये खर्चिले आहेत.

यापूर्वी देखील ऍड. आयरिश रॉड्रिग्स यांनी आरटीआयमधून भाजप सरकारच्या शपथविधी सोहळ्यावर किती खर्च झाला, याची माहिती मिळवत ती उघड केली होती. त्यावेळी जवळपास साडेपाच कोटी या सोहळ्यावर खर्च झाल्याचे समोर आले होते; मात्र आता व्हीआयपी व्यक्तींसाठी भाडेपट्टीवर वापरलेल्या वाहनांवरील खर्च समोर आल्याने शपथविधी सोहळ्यावरील खर्चाचा आकडा वाढला आहे. या शपथविधी सोहळ्यावर सर्वसाधारण प्रशासन विभागाकडून ५ कोटी ५९ लाख २५ हजार ८०५ रुपये खर्च करण्यात आले आहेत. माहिती खात्याकडून प्रसिद्धीसाठी २४ लाख ५२ हजार ४७७ रुपये खर्च करण्यात आले आहेत, तर भाडेपट्टीवरील वाहनांसाठी ७२ लाख खर्च केले आहेत. परिणामी शपथविधी सोहळ्यावरील खर्चाचा एकूण आकडा साडेसहा कोटींवर पोहोचला आहे.