शंभू भाऊ बांदेकर, अनिल सामंत, रमेश वंसकरयांना बा. द. सातोस्कर मराठी भाषा पुरस्कार जाहीर

0
4

कला अकादमीत उद्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते होणार पुरस्कारांचे वितरण

गोवा सरकारच्या राजभाषा संचालनालयाचे 2022-23, 2023-24 आणि 2024-25 ह्या तीन वर्षांचे भाषा पुरस्कार जाहीर झाले आहेत. 2022-23 सालचा ‘बा. द. सातोस्कर मराठी भाषा पुरस्कार’ शंभू भाऊ बांदेकर यांना जाहीर झाला आहे. 2023-24 सालचा पुरस्कार प्राचार्य अनिल गजानन सामंत यांना, तर 2024-25 सालचा पुरस्कार रमेश दत्ताराम वंसकर यांना जाहीर झाला आहे. प्रत्येकी 1 लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

कांपाल-पणजी येथील गोवा कला अकादमीमध्ये एका खास कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शुक्रवार दि. 30 मे रोजी सकाळी 10 वाजता वरील पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत, असे राजभाषा संचालनालयातर्फे कळविण्यात आले आहे.
राज्य सरकारने नियुक्त केलेल्या पाच सदस्यीय तज्ज्ञांच्या निवड समितीने प्राप्त झालेल्या अनेक नामांकनांमधून मराठी भाषेचे संवर्धन आणि विकासासाठी भरीव योगदान दिलेल्या वरील व्यक्तींची निवड या पुरस्कारांसाठी केली आहे.

याशिवाय 2022-23 सालचा ‘ज्ञानपीठकार रविंद्र केळेकर कोंकणी भाषा पुरस्कार’ प्रख्यात साहित्यिक माणिकराव राम नायक गावणेकर यांना, 2023-24 सालचा सुरेश रामचंद्र पै यांना, तर 2024-25 सालचा भिकू बोमी नायक यांना जाहीर झाला आहे.
राजभाषा संचालनालयातर्फे भाषांच्या विकासासाठी ही भाषा पुरस्कार योजना राबविण्यात येते. संस्कृत, कोकणी आणि मराठी भाषांसाठी तहहयात समर्पितपणे कार्य केलेल्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येतो. याद्वारे अशा थोर व्यक्तींचा आदर्श जनतेसमोर ठेवावा, तसेच साहित्यिकांना मानसन्मान देऊन त्यांनी भाषेच्या वृद्धीसाठी केलेल्या कार्याची दखल घेणे हा सरकारचा या योजनेमागचा हेतू आहे.