वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी 21 ऑगस्टपासून प्रवेश प्रक्रिया सुरू

0
9

>> शिक्षणमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची विधानसभेत माहिती; ‘नीट’ निकालानुसार प्रवेश मिळणार

‘नीट’ परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणवत्तेनुसार विविध वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देण्याची पहिली फेरी येत्या 21 ते 29 ऑगस्ट या दरम्यान सुरू होणार असल्याची माहिती काल शिक्षणमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा विधानसभेत दिली. काल विधानसभेत सदर प्रश्नावर आमदार विजय सरदेसाई, कार्लुस फेरेरा, वीरेश बोरकर, व्हेन्झी व्हिएगस, युरी आलेमाव, क्रूझ सिल्वा व अल्टन डिकॉस्टा यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर बोलताना मुख्यमंत्र्यांनी वरील माहिती दिली.
गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (गोमेकॉ) गोव्यातील विद्यार्थ्यांसाठी ज्या जागा राखीव आहेत, त्याखाली विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास कोणतीही अडचण येणार नाही; मात्र गोमेकॉत अखिल भारतीय ‘कोटा’ अंतर्गत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेवर परिणाम होणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

यंदा नीट परीक्षेत जी काही समस्या निर्माण झालेली आहे, त्या पार्श्वभूमीवर या परीक्षेला बसलेले विद्यार्थी व त्यांचे पालक यांच्यात वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेश प्रक्रियेवरुन चिंतेचे वातावरण निर्माण झालेले असून, त्याची सरकारला जाणीव आहे. मात्र, चिंतेचे कारण नसून ‘नीट’शी संबंधित वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी जी पहिल्या टप्प्यातील निवड प्रक्रिया दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या ज्या तारखेला व्हायची तशीच यंदाही होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

नीट परीक्षा नव्याने घेण्यात यावी, ही मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली असून, फेरतपासणीनंतर निकाल जाहीर करावेत असा जो आदेश दिलेला होता, त्यानुसार ती प्रक्रिया 26 जुलै रोजी पूर्ण करुन निकाल जाहीर करण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

नीट 2024 चे सुधारित निकाल एकदा अर्जदाराने सादर केले आणि भारत सरकारच्या आरोग्य सेवेचे महासंचालक यांच्या वैद्यकीय निवड समितीने व तांत्रिक शिक्षण संचालनालय यांनी प्रवेश प्रक्रियेसंबंधीचे वेळापत्रक जाहीर केले की एमबीबीएस, बीडीएस, बीएचएमएस, बीएएमएस, नर्सिंग व निमवैद्यकीय अभ्यासक्रम, तसेच बी. व्ही. एससी व एएच अभ्यासक्रम यासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरु होईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

तत्पूर्वी ही लक्षवेधी सूचना मांडल्यानंतर विरोधी व सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी सरकारला नीट प्रश्नी विविध प्रश्न विचारण्याबरोबरच सूचनाही केल्या.
यावेळी बऱ्याच विरोधी आमदारांनी सरकारने वरील अभ्यासक्रमासाठी ‘नीट’ परीक्षेच्या आधारे प्रवेश न देता राज्य पातळीवर समान प्रवेश परीक्षा घेऊन त्याद्वारे विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा, अशी मागणी केली. ‘नीट’ परीक्षेत यंदा झालेला घोळ लक्षात घेऊन तसे करणेच उचित ठरणार असल्याचे त्यांचे म्हणणे होते. तसेच ‘नीट’ परीक्षेसाठी कोचिंग घ्यावे लागते आणि ह्या कोचिंग क्लासेससाठी जे शुल्क असते, ते ग्रामीण भागांतील गरीब विद्यार्थी देऊ शकत नाहीत. त्यामुळे नीट परीक्षेत ते मागे पडतात, असे यावेळी आमदार कार्लुस फेरेरा, अल्टन डिकॉस्टा, व्हेन्झी व्हिएगस यांनी निदर्शनास आणून दिले.