वेलिंगकरांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

0
7

>> सेंट फ्रान्सिस झेवियरविषयी अनुद्गार प्रकरण : पणजी सत्र न्यायालयाचा निर्णय; पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणात प्रा. सुभाष वेलिंगकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज येथील पणजी सत्र न्यायालयाने काल फेटाळून लावला. त्यामुळे त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. न्यायालयाने वेलिंगकर यांना चौकशीसाठी डिचोली पोलिसांसमोर हजर राहण्याचा आदेश दिला आहे.
सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी डिचोली पोलिसांनी प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात अटक होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी पणजी येथील सत्र न्यायालयात शनिवारी अर्ज दाखल केला होता. शनिवारच्या सुनावणीवेळी न्यायालयाने तातडीने अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला होता. तसेच पुढील सुनावणी सोमवारी ठेवली होती.

न्यायालयात या अटकपूर्व जामीन अर्जावर काल सुनावणी घेण्यात आली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश बॉस्को रॉबर्ट यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. प्रा. वेलिंगकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जामध्ये आमदार क्रूझ सिल्वा यांच्यासह चार जणांकडून हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.
डिचोली पोलिसांनीही सुभाष वेलिंगकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जाला विरोध केला. या वादग्रस्त वक्तव्य प्रकरणाच्या तपासासाठी वेलिंगकर यांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी दोन नोटीस पाठविण्यात आला होत्या. तथापि, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, असे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.
प्रा. सुभाष वेलिंगकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यातील ख्रिस्ती बांधवामध्ये नाराजी पसरली असून, विविध पोलीस स्थानकावर तक्रारी नोंदवून या प्रकरणी त्यांच्या अटकेची मागणी केली जात आहे.

वेलिंगकर यांना तडीपार करण्याची मागणी
सेंट फ्रान्सिस झेवियर यांचा पार्थिव प्रदर्शन सोहळा पूर्ण होईपर्यंत सुभाष वेलिंगकर यांना जुने गोवे येथे येण्यास मज्जाव करावा किंवा तडीपार करावे, असा युक्तिवाद हस्तक्षेप अर्ज दाखल केलेल्या आमदार क्रूझ सिल्वा यांचे वकील अमित पालेकर यांनी केला.

वेलिंगकरांकडून सलोखा बिघडवण्याचे काम
सुभाष वेलिंगकर यांनी सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करून गोव्यातील सामाजिक सलोखा आणि शांतता बिघडवण्याचे काम केले आहे, असा युक्तिवाद प्रतिवादींनी न्यायालयात केला.

वेलिंगकरांचे वकील म्हणाले, झुंडशाही सुरू
सुभाष वेलिंगकर हे तपास अधिकाऱ्यासमोर हजर होण्याचा धोका पत्करू शकत नाहीत. राज्यातील नागरिकांच्या दबावाखाली त्यांना पोलीस अटक करतील. येथे लोकशाही नाही, तर झुंडशाही सुरू आहे, असा युक्तिवाद वेलिंगकर यांच्या वकिलांनी केली. वेलिंगकर यांनी कोणताही गुन्हा केला नाही, तर डीएनए टेस्ट करावी ही केवळ मागणी केली आहे, असाही युक्तिवाद वेलिंगकर यांच्यावतीने करण्यात आला.