विषारी मद्य प्राशनामुळे गुजरातेत ३० जणांचा मृत्यू

0
13

गुजरातमधील बोटाद जिल्ह्यमध्ये विषारी मद्य प्राशन केल्याने ३० जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना काल घडली. मृतांमध्ये अहमदाबादमधील चार लोकांचा सामावेश आहे. तसेच विषारी दारू पिल्यामुळे ४० पेक्षा अधिक लोकांची तब्येत बिघडली असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी काही रुग्णांची अवस्था गंभीर आहे.

दारुबंदी असलेल्या गुजरात राज्यात विषारी दारुमुळे ३० जणांचा मृत्यू झाल्याचे समोर येताच देशभरात खळबळ उडाली. गुजरातच्या बोटाद शहरातही ही घटना घडली. या संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्यासाठी गुजरात सरकारने एसआयटीची स्थापना केली आहे. आत्तापर्यंत या प्रकरणात गावठी दारू बनवणार्‍या आणि विकणार्‍या १४ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच या गावठी दारुच्या अड्‌ड्याला मिथेनॉल पुरवणार्‍या व्यक्तीलाही पोलिसांनी अटक केली आहे.

या प्रकरणातून गुजरातमध्ये दारुबंदी असतानाही अवैध पद्धतीने दारू विकली जात असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी उपअधीक्षक अशोक यादव यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.