विशेष संपादकीय – स्वागत

0
194

जवळजवळ चार महिन्यांनंतर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची अमेरिकेतील वैद्यकीय उपचारांनंतर गोव्यात परतण्याची घटिका जवळ आली आहे. आज रात्री उशिरा किंवा उद्यापर्यंत ते गोव्यात पोहोचणार आहेत. आपल्या दुर्धर आजारातून पूर्णतः बरे होण्यास अद्याप थोडा कालावधी जावा लागणार असला तरीही त्यांचे सध्याचे गोव्यातील आगमन हे गोव्यामध्ये चैतन्य आणणारे असेल यात शंका नाही. आपल्या अनुपस्थितीमध्ये प्रशासन ठप्प होऊ नये यासाठी त्यांनी त्रिसदस्यीय मंत्रिसमिती नेमली, त्यानंतर तिला वेळोवेळी मुदतवाढही दिली. स्वतः उपचार घेत असतानाही गोव्याचे हित दृष्टिआड होऊ न देता त्यांनी महत्त्वाच्या फायलींची माहिती घेतली, ईमेल आणि टेलिकॉन्फरन्सिंगद्वारे प्रशासनावर नजर ठेवली. ते ढेपाळू नये यासाठी पुरेपूर प्रयत्न केले. पर्रीकर यांनी मुख्यमंत्रीपद सोडावे यासाठी विरोधी पक्षाने जोरदार दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तरी त्यांनी आपले पद न सोडण्यामागे राजकीय हाव निश्‍चितच नव्हती आणि नसेल. आपला प्रिय गोवा वार्‍यावर सोडला जाऊ नये या भावनेतूनच त्यांनी स्वतःच्या अनारोग्याशी झुंजत असतानाही आपले मुख्यमंत्रिपद स्वतःपाशी ठेवले आहे. त्यांचे एकंदर खंबीर आणि जिद्दी व्यक्तिमत्त्व लक्षात घेता ते आपल्यावरील जबाबदारी पूर्ण पार पाडतील असा विश्वास वाटतो. जगात कोणाचे कोणावाचून अडत नाही हे खरे, राजकारणात तर पोकळी वगैरे काही नसते, परंतु तरीही मनोहर पर्रीकर यांचे राजकारणात सक्रिय असणे गोव्याच्या हिताचे असेल यात शंका नाही. अर्थात, यापुढे त्यांच्या कामाच्या झपाट्यावर प्रकृतीच्या मर्यादा येणार आहेत. त्यांनी स्वतःसाठी वेळ देणे, पुरेशी विश्रांती घेणे आवश्यक असेल. कदाचित पुढील उपचारांसाठी त्यांना अमेरिकेत परतावेही लागेल, परंतु तरी देखील आज त्यांच्या गोव्यातील आगमनाकडे अवघ्या गोव्याचे डोळे लागलेले आहेत. आज नवप्रभेचे हे विशेष पान गोव्याच्या या प्रिय नेत्याच्या स्वागतार्थ आहे. तमाम गोमंतकीयांच्या भावना त्यातून प्रतिकात्मकरीत्या अभिव्यक्त होत आहेत. पर्रीकरांच्या या पुनरागमनाचा राजकारणापलीकडे जाऊन विचार व्हायला हवा. तेवढी उदारता आणि माणुसकी सर्वांनी दाखवणे गरजेचे आहे. मनोहर पर्रीकर यांच्याएवढा गोव्याच्या जनसामान्यांशी घट्ट नाळ जुळलेला लोकनेता आज तरी गोव्यात दुसरा कोणी नाही. त्यांच्यावर मनोमन प्रेम करणारी जनता जशी आहे, तसेच त्यांचा पराकोटीचा द्वेष करणारेही आहेत. परंतु एका गंभीर आजारपणातून हा आपला एक लोकनेता परत आपल्या मायभूमीत येतो आहे, त्याक्षणी तरी एखाद्याच्या मनातील सारे हेवेदावे, द्वेषभावना दूर ठेवून स्वच्छ मनाने त्याचे स्वागत व्हायला हवे. त्याच्या आयुरारोग्यासाठी कामना व्हायला हवी. पर्रीकर यांच्या पुनरागमनाच्या आनंदवार्तेने गोव्याच्या जनमानसात आलेले चैतन्यच बोलके आहे.