विशेष संपादकीय सबका साथ, सबका विकास!!

0
137

कर्नाटकच्या पावलावर पाऊल टाकत कॉंग्रेसचा दोन तृतीयांश आमदारांचा एक सत्तालोलुप कंपू काल पक्षांतर बंदी कायद्याला अलगद बगल देत सत्ताधारी भारतीय जनता पक्षात डेरेदाखल झाला. सदैव तत्त्वनिष्ठा, विचारधारा वगैरेंची बात करीत आणि ‘पार्टी विथ द डिफरन्स’ची शेखी मिरवत आलेल्या भारतीय जनता पक्षानेही त्यांना बिनबोभाट आपल्या पदराखाली घेतले आणि नरेंद्र मोदींचा ‘सबका साथ, सबका विकास’ हा मंत्र अशा वेगळ्या प्रकारे साकार करून दाखवला! कॉंग्रेसचे आमदार फुटणे ही काही आता नवी बाब राहिलेली नाही. मुळात कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष राहुल गांधी हेच पक्षाध्यक्षपदाला रामराम ठोकून विजनवासी झालेले असताना अनुयायांनी तरी कोणाच्या तोंडाकडे पाहायचे? कॉंग्रेस पक्षात आता काही भवितव्य उरलेले नाही, त्यामुळे येनकेनप्रकारेण सत्ता मिळते आहे तर उपभोगून घ्यावी या स्वार्थी विचारांनी पक्षाचे राज्याराज्यातील लोकप्रतिनिधी कुंपणावर चढून सत्ताधारी पक्षामध्ये उडी टाकायच्या बेतात केव्हापासून बसलेले आहेत. कर्नाटकने सुरवात करून दिली आणि आता लागोपाठ गोव्याने त्याचा कित्ता गिरवला. जे दहा जण काल स्वतःचा स्वतंत्र गट बनवून भाजपाच्या आसर्‍याला आले आहेत, ते काय पात्रतेचे आहेत हे जनतेला ठाऊकच आहे. भाजपच्या वाहत्या गंगेत हात धुवून आता ते पावन होऊन जातील. विशेष म्हणजे विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनीच या बंडखोरांचे नेतृत्व केले आहे. या पक्षांतरामुळे भाजपाचे राज्यातील एकूण संख्याबळ २७ पर्यंत वाढल्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत भलतेच खुशीत दिसत आहेत. परंतु एवढ्या घाऊक प्रमाणात ज्या मंडळींना पक्षात विलीन करून घेतले गेले आहे, ते भविष्यात त्यांच्याच बुडाखाली सुरूंग न पेरोत म्हणजे मिळवली! एक मोठी ख्रिस्ती लॉबी आता सरकारमध्ये तयार होईल. राज्य मंत्रिमंडळामध्ये मोठ्या प्रमाणात फेरबदल आता अपरिहार्य आहे. बंडखोरांपैकी काही जणांसाठी मंत्रिपदांची तरतूद आता करावी लागेल. त्यासाठी अर्थातच गोवा फॉरवर्ड आणि एक दोघा अपक्षांना बाहेरचा रस्ता दाखविला जाऊ शकतो. गोवा फॉरवर्डचे दोन तृतियांश आमदार उद्या भाजपात आले तरी आश्चर्य वाटू नये. गोव्याच्या राजकारणाने पुन्हा एकवार अत्यंत खालची पातळी गाठलेली आहे. ‘सत्तातुराणां न भयं, न लज्जा’ अशीच परिस्थिती सध्या निर्माण झालेली दिसते आहे. गेले कित्येक महिने मंत्रिपदासाठी तळमळणारे मायकल लोबो या सार्‍या घडामोडीमुळे खुशीत दिसत असले तरी भाजपच्या विद्यमान मंत्र्यांमध्ये आता असुरक्षितता निर्माण झाल्याविना राहणार नाही. त्यामुळे वरवर पाहता या वाढीव संख्याबळामुळे सरकारला स्थैर्य मिळेल हा निव्वळ भ्रम ठरू शकतो. ‘टू इज कंपनी, थ्री इज अ क्राऊड’ या तत्त्वाची सत्यता लवकरच प्रत्ययास येईल. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे हा सारा घटनाक्रम अत्यंत हताशपणे पाहण्याशिवाय गोव्याच्या जनतेपुढे दुसरा कोणताही पर्याय नाही. काल हे सारे नाट्य पर्वरीच्या विधानसभेच्या आवारात घडत होते तेव्हा मुसळधार पावसाने गोव्याची दाणादाण उडवलेली होती. अर्धी पणजी वीज गेल्याने अंधारात बुडालेली होती, परंतु त्याची फिकीर होती कोणाला? सत्तेच्या सुखस्वप्नांत मश्गुल कॉंग्रेसी बंडखोर आणि संख्याबळ वाढल्याने छात्या फुगलेले भाजपा नेते यांनी मांडलेला हा सारा निलाजरा खेळ मुकाटपणे पाहण्यावाचून जनता तरी बिचारी काय करू शकली असती? विशेष म्हणजे हे सारे तिच्याच नावाने चालले आहे!!