विवेक स्पंदन परत मातृभूमीला…

0
115

– प्रा. रमेश सप्रे

नरेंद्र जो आता स्वामी विवेकानंद बनला होता तो नुसता अक्षयवट बनणार नव्हता तर चैतन्यवट बनणार होता. कारण एरवी वटवृक्षाखाली इतर रोपं-झाडं वाढत नाहीत. पण नरेंद्राच्या म्हणजेच विवेकानंदांच्या छायेत अनेक जीवनं विकसणार होती. देशविदेशात विस्तारणार होती.

‘मी परतेन तेव्हा एखाद्या बॉंबगोळ्यासारखा आपल्या समाजावर आदळेन’, हे उद्गार होते स्वामी विवेकानंदांचे परदेशात जाण्यापूर्वी. त्यांना आपल्या जीवनकार्याची पूर्ण कल्पना होती. एवढंच नव्हे तर आपल्या अल्पायुष्याची जाणीवही त्यांच्या मनाच्या एका कोपर्‍यात दबा धरून बसली होती. त्यांना एका परीनं घाई होती सार्‍या गोष्टी पूर्ण करण्याची.

त्यानुसारच ते गुरूदेवांच्या आज्ञेनं, माताजींच्या अनुमतीनं, सहकारी शिष्यमंडळींच्या आग्रहानं नि मुख्य म्हणजे स्वतःच्या अंतःप्रेरणेनं अमेरिकेकडे निघाले होते. विश्‍वधर्मपरिषदेतील सहभाग हे उद्दिष्टही होतं नि निमित्तही. भारतीय समाजाच्या पुनरुत्थानासाठी काही साधनसामग्री, जमलं तर निधीसंकलन नि प्रत्यक्ष अनुभवातून समाजकार्यासाठी मार्गदर्शन हे उद्देश प्रामुख्यानं स्वामीजींच्या मनात होते. स्वतःच्या लौकिकाचा किंवा प्रसिद्धीचा विचारही त्यांच्या मनाला शिवला नव्हता.

पण स्वामीजी विश्‍वविख्यात व्हावेत ही नियतीची इच्छा होती. कालीमातेची योजना होती नि गुरूदेवांची धारणा होती. एक तेजस्वी वलय स्वामीजींच्या आधीच्याच तेजस्वी व्यक्तिमत्वाभोवती निर्माण झालं होतं. अमेरिकेतील युरोपातील देशांना स्वामीजी गेले असं म्हणण्यापेक्षा त्यांना त्यांच्या नियत कार्यानं, पूर्वनियोजित कार्यक्रमानं सार्‍या देशांना नेलं गेलं असं म्हणणं योग्य ठरेल. स्वामीजींनीही आपल्या जीवनाचं सुकाणू नि सर्व सूत्रं गुरूदेव रामकृष्ण परमहंसांच्या हातात दिली होती. ते निश्चिंत होते.

मायभूमीचा निरोप घेतला ते साल होतं १८९३. मुंबईहून त्यांनी नौयानानं (बोटीनं) देश सोडला होता. आता परतत होते ते वर्ष होतं १८९७. स्वामीजींचं आगमन व प्रचंड स्वागत झालं होतं ते कोलंबोला. त्यावेळी आजच्या श्रीलंकेला सिलोन म्हणत असत नि तो ब्रिटिश साम्राज्याचाच एक भाग होता.यानंतरचा तेजस्वी अध्याय म्हणजे कोलंबो (भारताच्याही दक्षिणे)पासून ते थेट हिमालयातील अलमोरा येथे पोहचेपर्यंत स्वामीजी एखाद्या चक्रवातासारखे (वादळासारखे) फिरत नि गर्जत गेले. त्यांना चक्रीवादळी संन्यासी (सायक्लॉनिक मंक) ही पदवी लोकांनी आधीच दिली होती. तीही परदेशात – तेथील वृत्तपत्रांनी!विवेकानंदांच्या उण्यापुर्‍या चाळीस वर्षांच्या आयुष्यातील ही चार वर्षं (१८९३ ते १८९७) हा स्वयंस्फूर्त तळपणारा कालखंड होता. एखाद्या आत्मतेजस्वी तार्‍याप्रमाणे त्यांनी पाश्चात्यांची मनं-बुद्धी पार दिपवून- उजळून टाकली होती. आता हा पश्चिमेला प्रकाशलेला सूर्य पूर्वेला उगवला होता. भारतीयांसाठी तर स्वामीजी एक पूज्य दैवत बनले होते.

मातृभूमीत परतल्यावर त्यांचे ठिकठिकाणी सत्कार होत गेले. मोठ्या जल्लोशात त्यांचं स्वागत केलं गेलं. त्यात लहान-मोठी, समाजातल्या सर्व थरातली नि वयोगटातली असंख्य माणसं होती. स्वामीजींचं डोकं मात्र त्यांच्या खांद्यावर घट्ट होतं. ते डोक्यावरच्या फेट्याबरोबर आकाशात उडत नव्हतं नि त्यांचे पाय घट्ट भूमीवर रोवलेले होते. मायभूमीवर. ‘जननी जन्मभूमिश्च स्वर्गात् अपि गरीयसि|’ हे रामाचे रामायणातील उद्गार स्वामीजी सार्थ ठरवत होते. त्यांच्या या झंझावाती प्रवासात त्यांनी केलेली व्याख्यानं हे नुसतं स्वागताला दिलेलं औपचारिक उत्तर नव्हतं तर स्वामीजींचा आत्मस्वर – मनोगत गर्जू लागलं होतं. त्यांचा रोख मुख्यतः भारतातील युवावर्गाकडे होता नि त्यांची गर्जना होती – ‘शृण्वंतु ते अमृतस्य पुत्राः’!ज्या नव्या भारताची नीलाकृती (ब्लूप्रिंट) स्वामीजी दाखवत होते त्यात अंधश्रद्धा – आळस – अस्पृश्यता यांना अजिबात स्थान नव्हतं. तो एक शक्तिशाली समर्थ भारत होता- जो स्वामीजींच्या दृष्टीसमोर स्पष्ट दिसत होता नि ते इतरांना तो दाखवत होते. ‘कोलंबो ते आल्मोरा’ अशी स्वामीजींची भारतीय व्याख्यानं आजही भारताच्या नवनिर्माणासाठी – पुनर्रचनेसाठी उपयुक्त व प्रेरक आहेत. ती समाजपरिवर्तनाची क्रांतिगीताच आहे.

यानंतर स्वामीजी अवघी पाचच वर्षं जगले. काळ भराभर मागे सरकत होता – नव्हे त्यांचं आयुष्य ग्रासत होता – गिळत होता. कार्याची गती प्रकाशाच्या वेगानं वाढणं आवश्यक होतं. केवळ ध्वनीचा वेग (भाषणांचा – शब्दांचा आवेग) पुरा पडणार नव्हता. स्वामीजींनी लगेचच एक महत्त्वाची युगप्रवर्तक ठरावी अशी गोष्ट केली- ती म्हणजे ‘रामकृष्ण मिशन’ची स्थापना. १ मे १८९७ या दिवशी गुरूदेव रामकृष्णांनी सांगितलेलं – कालीमातेनं योजलेलं – कार्य मूर्त स्वरूपात उतरवण्याचा श्रीगणेशा झाला असंच म्हणावं लागेल. ‘नोरेन, तुला वटवृक्षासारखं विकसित व्हावं लागेल’, हे गुरुदेवांचे शब्द आता प्रत्यक्षात येऊ लागले होते. नरेंद्र जो आता स्वामी विवेकानंद बनला होता तो नुसता अक्षयवट बनणार नव्हता तर चैतन्यवट बनणार होता.

कारण एरवी वटवृक्षाखाली इतर रोपं-झाडं वाढत नाहीत. पण नरेंद्राच्या म्हणजेच विवेकानंदांच्या छायेत अनेक जीवनं विकसणार होती. देशविदेशात विस्तारणार होती. विधायक विचार नि कार्य या दोन्ही चाकांवर विवेकानंदांचा कार्यरथ दौडणार होता. भारतातल्या सर्व लोकांना नवी दिशा दाखवणार होता नि ‘आनंद’ही देणार होता.या सार्‍या प्रकाशमय परिस्थितीला एकच अंधारलेली किनार होती – या विवेकसूर्याचा जो नव्यानं उदय भारतभूमीवर झाला होता त्याचा अस्तही जवळ आला होता. अगदी जवळ…