विवाह नोंदणीपूर्व समुपदेशनाचा प्रस्ताव गुंडाळला

0
58

>> प्रस्ताव लवकरच रद्दबातल; मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची माहिती

विवाह नोंदणीपूर्वी जोडप्यांच्या समुपदेशन सक्तीचा प्रस्ताव रद्दबातल केला जाणार आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल पत्रकारांशी बोलताना दिली. या प्रस्तावाला नागरिकांसह खुद्द भाजपनेच विरोध दर्शवल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय जाहीर केला.

राज्यात विवाह नोंदणीपूर्वी जोडप्यांचे समुपदेशन सक्तीचे करण्याच्या प्रस्तावावर नागरिकांकडून नाराजी आणि विरोधात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात होत्या. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी देखील या प्रस्तावाला जोरदार विरोध दर्शवत, हा प्रस्ताव पुढे न नेण्याचे आवाहन त्यांनी मुख्यमंत्र्यांना केले होते.

प्रस्तावाला मान्यता दिलेली नाही
या पार्श्‍वभूमीवर बोलताना मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, कायदा मंत्री नीलेश काब्राल यांनी राज्यातील घटस्फोटांचे प्रकार कमी करण्यासाठी समुपदेशन सक्तीचा प्रस्ताव मांडलेला आहे. राज्य सरकारने अद्याप या प्रस्तावाला मान्यता दिलेली नाही. तसेच, या प्रस्तावाच्या अंमलबजावणीबाबत अधिसूचना सुद्धा जारी केलेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

संचारबंदीबाबत ७ जूनपूर्वी निर्णय
राज्यातील संचारबंदीबाबत वाढ होणार का, असा प्रश्‍न मुख्यमंत्र्यांन विचारला असता, येत्या ७ जूनपूर्वी योग्य निर्णय घेतला जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.

समुपदेशन सक्तीला भाजपचाच आक्षेप

विवाह नोंदणीपूर्वी जोडप्यांचे समुपदेशन सक्तीचे करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला भाजपनेच आक्षेप नोंदवला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी संपर्क साधून जोडप्यांच्या विवाह नोंदणीपूर्व समुपदेशन सक्तीचा विषय पुढे न नेण्याचे आवाहन केले आहे.

राज्यातील वाढत्या घटस्फोटांचे प्रमाण कमी करण्यासाठी विवाह नोंदणीपूर्वी जोडप्यांचे समुपदेशन करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा कायदा मंत्री नीलेश काब्राल यांनी दोन दिवसांपूर्वी केली होती.
सरकारी अधिकार्‍यांनी समुपदेशन केले, तरी घटस्फोटांचे प्रमाण कमी करण्यासाठी त्याचा विशेष फायदा होणार नाही. नागरिकांना या समुपदेशन सक्तीच्या निर्णयामुळे जास्त त्रास होणार आहे, असा दावा तानावडे यांनी केला.

गोव्यात घटस्फोटांचे प्रमाण केवळ ०.१८ टक्के एवढे नगण्य आहे. राष्ट्रीय स्तरावर हे प्रमाण ०.२४ टक्के एवढे आहे, असेही तानावडे यांनी सांगितले.

आई-वडीलच खरे समुपदेशक
वधू-वराकडील मंडळी चौकशी करूनच विवाह ठरवतात. वधू-वराचे खरे समुपदेशक त्यांचे आई-वडीलच असतात, असेही सदानंद शेट तानावडे यांनी नमूद केले.