विल्फ्रेड डिसा नुवेतून अपक्ष लढणार

0
15

>> आमदारकीसह भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा

नुवेचे आमदार विल्फेड डिसा यांनी काल आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. तसेच डिसा यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. ते नुवे मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून लढविणार आहेत.
२०१७ च्या गोवा विधानसभेच्या निवडणुकीत विल्फ्रेड डिसा हे कॉंग्रेसच्या उमेदवारीवर निवडून आले होते. त्यानंतर मधल्या काळात घडलेल्या राजकीय घडामोडीत कॉंग्रेसच्या १० आमदारांच्या गटाचे भाजपमध्ये विलीनीकरण करण्यात आले होते, त्यात आमदार विल्फेड डिसा यांचाही समावेश होता. डिसा यांच्या राजीनाम्यानंतर गोवा विधानसभेत आता केवळ २८ आमदार शिल्लक राहिले आहेत. आत्तापर्यंत १२ आमदारांनी राजीनामे दिले आहेत.

फिलीप नेरी रॉड्रीगीस
भाजप सोडण्याच्या तयारीत
वेळ्ळीचे भाजप आमदार तथा जलस्रोत मंत्री फिलीप नेरी रॉड्रीगीस हे मंत्रिपद, आमदारकी आणि भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा देण्याच्या विचारात आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत ते कॉंग्रेसच्या उमेदवारीवरून निवडून आले होते. कॉंग्रेसच्या ज्या १० आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता, त्यात त्यांचा समावेश होता. त्यांनी बुधवारी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता; मात्र शेवटच्या क्षणी त्यांनी निर्णय बदलला. मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी विचारविनिमय करून अंतिम निर्णय घेणार आहेत.