विलक्षण

0
144
  • गिरिजा मुरगोडी

कधी देवराईत, कधी दाट वनात, कधी घनगर्द पण छान अशा जंगलात काहीतरी वेगळं जाणवत राहातं. भारून आणि भारावून टाकणारं… तेही या वृक्षांच्या आणि माणसाच्या मनाच्या दरम्यान असणार्‍या काही अद्भुत लहरींमुळे आणि गूढ नात्यामुळेच असणार.

याआधी एका लेखात मनात घर केलेल्या झाडांविषयीच्या आल्हादक आठवणी लिहिल्या होत्या. पण मनाला क्लेष देणारी अशी एक आठवण आहे. तीही त्यानंतर मनाच्या तळातून वर आली.

खूप वर्षांपूर्वीची, मी बी.एड्. करत होते तेव्हाची गोष्ट. पुण्याच्या कॉलेजमधून व्हेकेशन कोर्स करत असल्याने सराव पाठ, परीक्षा इ.साठी आईकडे राहत होते. उन्हाळ्याचे दिवस. कॉलनीच्या वाटेवर एका बंगल्याच्या बाहेर कोपर्‍यावर एक बहावा भरगच्च फुललेला.
लखलखणार्‍या किरणांची झुंबरं मंद वार्‍यावर हलवत, हरखत राहणारा तो बहावा मला फार आवडायचा. गच्चीवरून, हॉलच्या खिडकीतून, बाहेरच्या कट्‌ट्यावरून… जिथूनही तो दिसे मी पाहत बसे. त्या वाटेवरून जाता-येता क्षणभर त्याच्याजवळ थबकून त्याला जवळून मनःपूत न्याहाळूनच मी पुढे जायची.

अशीच एक दिवस जवळच्या दुकानातून काही आणण्यासाठी बाहेर पडले. सोबत माझा धाकटा मुलगा होता. बहाव्याजवळ आल्यावर नेहमीप्रमाणे थबकले. फिरताना नेहमीच मी त्याच्याशी आजूबाजूला जे-जे दिसेल त्याबद्दल गप्पा मारत असायची. त्याप्रमाणेच त्या दिवशीही चाललं होतं. आम्ही माझ्या त्या लाडक्या बहाव्याजवळ आलो आणि त्याला त्याबद्दल काही सांगायला लागले.

इतक्यात समोरून एक मोटरसायकल भरधाव वेगात आली आणि काही कळायच्या आत एक राकट दणकट हात माझ्या गळ्याच्या दिशेने आला. जोरदार हिसका बसला आणि माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र…!! काय घडलंय हे कळायलाच मला क्षणभर लागला. मला एवढा प्रचंड धक्का बसला की तोंडातून शब्दच फुटेना. पुढे असलेल्या लोकांना मी सांगण्याचा प्रयत्न करत होते, पण दातखीळ बसणं म्हणजे काय याचा साक्षात अनुभव घेतला.

नंतर कित्येक दिवस ते दृश्य डोळ्यांसमोरून जात नव्हते. पुस्तक उघडलं तरी त्यात समोरून येणारी ती मोटरसायकल दिसायची. झोपण्यासाठी डोळे मिटले की ते सगळं दृष्य जसंच्या तसं दिसायचं. कित्येक दिवस काय, वर्षं लोटली पण अजूनही त्या कोपर्‍यावरून जाताना बहावा दिसला की तो प्रसंग आणि ते दृष्य आठवल्याशिवाय राहत नाही. इतक्या आल्हादक प्रसन्न झाडाशी असली ही क्लेषदायक आठवण जोडली जावी याची खूप खंत वाटते! तो मात्र बिचारा अजूनही आपला नाजूक बहर नजर करून दिलासा देण्याचा प्रयत्न करत असतो. खोलवरचा जुना ऋणानुबंध जपत असतो.

आपलं प्रत्येकाचं एखाद्या तरी झाडाशी मनापासून सख्य जुळलेलं असतं. ते मनाच्या जवळ असतं. ते लागेबांधे आगळेवेगळे, मनमोहक असे असतात. पण काही अनुबंध मात्र अत्यंत अनाकलनीय असतात…
आमच्या एका मैत्रिणीच्या स्वप्नात अनेक वर्षं एक झाड येत असे. उंचच उंच. दोन बाजूंनी आकाशाकडे झेपावलेलं खोड, वर भरगच्च फांद्या, पानं आणि मंद गंधाची, लांब देठाची शुभ्र सुंदर फुलं. ती खाली उभी आणि तिच्याभोवती वरून टपटपणार्‍या त्या नाजूक फुलांचा सडा. पुन्हा पुन्हा हे स्वप्न पडायचं. एकदा त्यांचं कुटुंब आपल्या गाडीनं प्रवास करत होतं. वाटेत एके ठिकाणी विश्रांतीसाठी गाडी थांबवली. गाडीतून उतरल्यावर पाय मोकळे करण्यासाठी ती जवळच्या पायवाटेवरून चालत थोडीशी पुढे गेली आणि चालता चालता थबकली. तिचा तिच्या डोळ्यांवर विश्‍वासच बसेना. कारण स्वप्नात येणारं ते झाड तिथे प्रत्यक्ष उभं होतं! जसच्या तसं…!! तसंच खोड, तशाच फांद्या आणि तीच पांढरी फुलं. थक्क झाली ती. काय लावायचा या अनुबंधाचा अर्थ?
काही अनुभव अनाकलनीय तर असतातच, पण अगदी अद्भुतही असतात. माझी एक मैत्रीण वाराणसी येथील जे. कृष्णमूर्ती फाऊंडेशन पाहण्यासाठी गेली होती. त्या परिसरात फिरत असताना तिला एके ठिकाणी एक मोठा प्रशस्त पिंपळ आपल्या सळसळत्या पानांनी स्वागत करत आहे, स्वतःकडे बोलवत आहे असे वाटले. त्याच्याजवळ गेली असता असा भास झाला की पुढे डावीकडे वळून थोडं पुढे गेलं की तिथेही असा अश्‍वत्थ आहे. अनामिक ओढीनं ती त्या वाटेनं त्या दिशेनं पुढं गेली तर खरंच तिथे आणखी एक पिंपळ होता. एवढंच नाही तर तिथे पोचल्यावर पुढच्या अशाच पिंपळवृक्षाचा संकेत मिळाला. प्रचंड मोठा विस्तार असलेला तो वनपरिसर, तिथे प्रथमच गेलेली ती आणि एकमेकांपासून कितीतरी दूर अंतरावर असलेले असे ४-५ सोयरे, ते अश्‍वत्थ तिला साद घालून आपल्या भेटीसाठी बोलवत असलेले! सगळं अद्भुतच! कोणत्या अनाकलनीय नात्यानं जोडलेले असतात हे एखाद्याच्या मनाच्या गाभ्याशी?
मी लहान असताना आम्ही पुण्याला चतुःश्रृंगीच्या पायथ्याशी राहत होतो. घराच्या मागच्या बाजूला चतुःश्रृंगीचा डोंगर. मागच्या दारातून आणि स्वयंपाकघराच्या खिडकीतून दिसणारा. खूपदा चढून जायचो डोंगरावर. पुष्कळ खेळायचो तिथे. त्या डोंगरावर एकीकडे एक गूढ वाटणारं एकटंच झाड होतं. त्याच्या बुंध्याशी एक छोटीशी गुहा होती. आत कुठेतरी मंद झुळझुळत्या पाण्याची छोटीशी धार. ते झाड वेगळंच वाटायचं. त्याच्या जवळचं ते वातावरण गूढ वाटायचं. तिन्हीसांजेला किंवा अंधार्‍या रात्री कुठल्यातरी अंधुक उजेडात ते अधिकच गूढ वाटायचं. भीतीही वाटायची. पण वेगवेगळ्या प्रहरी त्याच्याकडे पाहत राहावंसंही वाटायचं. सोबत वाटायची. मी आणि बहीण बिचकत का होईना त्याच्या अगदी जवळ जाऊनही येत असू. तो तटस्थपणे पाहात असे. आम्ही दोघी त्याच्याबद्दल नेहमी काय काय बोलत असू. अनेक तर्क करीत असू. एक अनामिक ओढ होती जी उलगडता येत नाही. अजूनही दिसतं ते मनःचक्षूंना. माणसाचं मन आणि ही झाडं, त्यांची पाळंमुळं काही एका वेगळ्या लहरींच्या माध्यमातून संवाद साधत असतात का?
कधी देवराईत, कधी दाट वनात, कधी घनगर्द पण छान अशा जंगलात काहीतरी वेगळं जाणवत राहातं. भारून आणि भारावून टाकणारं… तेही या वृक्षांच्या आणि माणसाच्या मनाच्या दरम्यान असणार्‍या काही अद्भुत लहरींमुळे आणि गूढ नात्यामुळेच असणार. विलक्षणच सगळं!