विरुद्धाशन म्हणजे काय?

0
140
  • डॉ. मनाली म. पवार

या कोरोना महामारीच्या काळात आहाराला किती महत्त्व आहे हे सगळ्यांनाच पटलेले आहे. आहार कसा असावा हे आपण बर्‍याच वेळा जाणून घेतलेले आहे. आयुर्वेद शास्त्रानुसार अपथ्यामध्ये ‘विरुद्ध आहार’ सेवन करू नये, असे अनेक वेळा सांगितलेले आहे. मग हा विरुद्ध आहार म्हणजे नेमके काय…

एखादा पदार्थ आपण जरी घरी बनवला तरी जर त्या पदार्थामधील संयोग चुकीचा असला किंवा तो पदार्थ त्या काळाविपरीत सेवन केल्यास तोच पदार्थ विरुद्ध आहार म्हणून गणला जातो. म्हणजे तो आपल्या शरीराला उपायकारक न ठरता अपायकारक ठरू शकतो. म्हणूनच आपण जिथे वास्तव्य करतो, तिथले हवामान, ऋतु, संयोग, स्वतःचा अग्नीविचार, कोष्ठाचा विचार इत्यादीनुसार आहाराचे सेवन केलयास तो आहार आपले बल, रोगप्रतिकारशक्ती वाढवतो. पर्यायाने आपल्याला निरोगी ठेवतो.
विरुद्ध आहार म्हणजे काय? –

शरीर हे त्रिदोष (वात-पित्त-कफ), तीन मल (स्वेद, मूत्र, पुरीष) व सप्तधातू (रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र) पासून बनलेले आहे. जो आहार सप्तधातुविरुद्ध असतो, त्याला विरुद्ध आहार असे म्हणतात. जो आहार आपण सेवन करतो, त्यामुळे शरीरातच सप्तधातूंचे पोषण व्हायला हवे. पण जर त्या आहाराने शरीराचे पोषण न होता कुपोषण होत असेल तर आपण विरुद्धाशन करतो हे जाणावे. कुपोषण म्हणजे शरीर बारीक किंवा जाड होणे.

विरुद्धाशनचे प्रकार –
१. देशविरुद्ध – देश म्हणजे जिथे आपण राहतो ती भूमी. याचे तीन प्रकार असतात. जांगल, आनूप व साधारण ज्या देशात रुक्षता, उष्णता जास्त. उदा. राजस्थान, अशा प्रदेशात सगळ्या पदार्थांमध्ये तूप व मधुरता जास्त असते. तो आहार तिथे सात्म्य आहे पण जर जांगल देशात आपण रुक्ष, उष्ण, तिखट, चटपटीत असा आहार सेवन केला तर तो आहार त्या देशाविरुद्ध ठरतो.आनूप देशात पाऊस जास्त असतो. म्हणून या प्रदेशात स्निग्ध व शीत हे गुण आढळतात. म्हणून ज्या व्यक्ती आनूप देशात राहतात त्या व्यक्तीने जर जास्त स्निग्ध व थंड असा आहार सेवन केला तर हा आहार आनूप देशाविरुद्ध ठरतो.
साधारण देशात पाऊस व ऊन हे साधारण समान मात्रेत असते. अशा प्रदेशामध्ये पाऊस असताना उष्ण पदार्थ खावेत व ऊन असताना शीत पदार्थ खावेत.

२. कालविरुद्ध – काळ हे दोन प्रकारचे असतात – शीत व उष्ण.
शीत काळात जर आपण जास्त थंड व रुक्ष पदार्थांचे सेवन केले तर ते हानिकारक ठरतात. तसेच गर्मीमध्ये आपण जास्त उष्ण, तिखट पदार्थांचे सेवन केले तर शरीरातील पित्त जास्त वाढेल व अनेक व्याधी उत्पन्न होतील. म्हणून उष्ण काळात आपण तिखट, आंबट, कडू तसेच तुरीची डाळ, मांस, दारू व दह्याचे सेवन करू नये. दही आपल्याला कितीही थंड वाटले तरी ते फक्त आपल्या जिभेलाच थंड वाटते. पण हेच दही शरीरात (जठरात) गेल्यावर उष्ण गुणाची वृद्धी करते. म्हणून गर्मीमध्ये दही हे विरुद्धाहार ठरते.

३. अग्नीविरुद्ध – जो आहार आपण सेवन करतो तो जठरामध्ये जाऊन त्याचे पचन होते. हे पचवण्याचे कार्य अग्नीद्वारे होते. हा अग्नी सम, विषम, तीव्र व मंद अशा चार प्रकारचा असतो. ज्यांचा अग्नी सम असतो त्यांना वेळेवर भूक लागते. समतोल आहार सेवन केल्यास अशा व्यक्तींमध्ये प्राकृत पचन होते. विषमाग्नीमध्ये वातप्रकोप होतो. भूक अनियमित लागते. पचनसुद्धा अनियमित होते. तीव्राग्नीमध्ये पित्तदोष प्रधान होते. भूक जास्त लागते. मंदाग्नीमुळे साधारण ९९ टक्के व्याधी उत्पन्न होते. भूकही जास्त लागत नाही. अशा प्रकारच्या व्यक्ती फक्त वेळ झाला म्हणूनच जेवतात. अशा व्यक्तींमध्ये पचनक्रियासुद्धा सावकाश होते. म्हणून प्रत्येकाने आपला अग्नी कसा आहे हे जाणावे. समाग्नीच्या व्यक्तीने जर जास्त खाल्ले तर तो आहार अग्नीविरुद्ध ठरतो.
विषम अग्नी असता जर रुक्ष, लघु असा वातप्रकोप आहार सेवन केल्यास तो आहार अग्नीविरुद्ध ठरतो.
तिक्ष्णाग्नी असता लघु, तीक्ष्ण, उष्ण, अल्प आहार सेवन केल्यास तो आहार अग्नीविरुद्ध ठरतो.
मंदाग्नी असता गुरू, स्निग्ध, मधुर आहाराचे सेवन केल्यास हा आहार अनेक आजार उत्पन्न करतात. यामध्ये सगळ्या प्रकारची बेकरी उत्पादने येतात. मैदा, गहू, तळलेले पदार्थ, तूप, मीठाई, दही, उडदाची डाळ खाऊ नये.

४. मात्राविरुद्ध – काही आहारद्रव्ये समामात्रेत घेणे मात्राविरुद्ध ठरतात. आयुर्वेद शास्त्रानुसार स्निग्ध द्रव्ये व मध ही समप्रमाणात घेऊ नये, असे सांगितले आहे. म्हणजे तूप किंवा तेल व मध सममात्रेत खाऊ नये. म्हणून पंचामृत करते वेळी पाच भाग दूध, ४ भाग दही, तीन भाग साखर, २ भाग तूप व १ भाग मध असे प्रमाण असावे. यामध्ये जरी आपण तूप व मध एकत्र मिसळले तरी मात्रा कमी-अधिक असावी.

५. सात्म्यविरुद्ध – जो आहार आपल्या शरीरासाठी अनुकूल, सुखकारक तो सात्म्य आहार. जो आहार सेवन केल्याने रोग उत्पन्न करणार नाही तो आहार सात्म्य मानावा. आपल्या जिभेला काय बरे वाटते त्यापेक्षा आपल्या शरीराला कशाची गरज आहे ते जाणावे. उदा. जर एखादा कफ प्रकृतीचा माणूस आहे, त्याने उष्ण, तिखट असा पदार्थ खाल्ल्यास त्याला हे पदार्थ सात्म्य ठरतात.
पण मधुर व गुरु असे पदार्थ खाल्ल्यास सात्म्यविरुद्ध ठरतात. दुसरे उदा. केळे हे पित्तप्रकृतीच्या व्यक्तीसाठी सात्म्य ठरते पण कफप्रकृतीच्या व्यक्तीसाठी सात्म्यविरुद्ध होय.

६. दोष विरुद्ध – ज्या दोषाची प्रकृती असेल अथवा ज्या दोषाचा प्रकोप असेल तद्गुणविरुद्ध आहार घ्यावा. कफप्रकृतीच्या व वातप्रकोप झालेल्या मनुष्याने रुक्ष, लघू, शीत गुणांचा दोषविरुद्ध आहार घेऊ नये. उदा. सगळ्या प्रकारची मोड आलेली कडधान्ये, बटाटे वातदोषविरुद्ध आहार ठरतो. पित्तदोष प्रधान असल्यास, अनशन केल्यास तीक्ष्ण, उष्ण, अल्प आहाराचे सेवन केल्यास पित्तदोषविरुद्ध आहार ठरतो. म्हणून पित्त दोषांसाठी स्निग्ध मधुर आहार सेवन करावा. मिरची, पाणीपुरीसारखे पदार्थ तसेच लोणचे हे पित्तदोषविरुद्ध आहार होय.

कफप्रकृती व्यक्ती जर गुरु, स्निग्ध, मधुर असा आहार करतात तसेच अभिष्यंदि आहार उदा. दही. म्हणून कफप्रकृती व्यक्तींनी हे पदार्थ खाऊ नये. भेंडीची भाजी, उडदाची डाळ, म्हशीचे दूध हे कफदोषविरुद्ध आहार होय.

७. संस्कार विरुद्ध – एखादा पदार्थ बनवताना द्रव्य साफ करणे, धुणे, भाजणे, तेलात-तुपात तळणे, वाफेवर शिजविणे इ. जी कर्मे करतो त्याला संस्कार म्हणतात. उदा. तांदूळ – डाळ व्यवस्थित दोन-तीन वेळा धुवून जेव्हा आपण त्यात हळद- मीठ घालून शिजवतो व खिचडी तयार करतो तेव्हा हा जो शिजवण्याचा संस्कार होतो ती शिजवलेली खिचडी शरीरासाठी हितकर असते. पण तांब्याच्या किंवा पितळेच्या भांड्यात ठेवून खाल्लेले दही संस्कारविरुद्ध ठरते.वेलची, जायफळ आदी सुगंधित द्रव्ये पदार्थाच्या शेवटी घालावा. तसेच आपण जो फूड कलर वापरतो तो संस्कारविरुद्ध होय. तसेच सद्यकाळाच्या उदाहरणामध्ये फ्रेंच फ्राइज, नूडल्स हे पदार्थ संस्कारविरुद्ध आहारामध्ये येतात. फ्रीजरमध्ये ठेवलेला पदार्थ गरम तेलात तळणे किंवा शिजवलेला पदार्थ एकमेकांना चिकटू नये म्हणून लगेच थंड पाणी ओतले ही झाली संस्कारविरुद्ध आहाराची उदाहरणे.

८. वीर्यविरुद्ध – जे पदार्थ आपण सेवन करतो ते पदार्थ शरीरात गेल्यावर ते एकतर शीत होतात किंवा उष्ण. हे शीत किंवा उष्ण हे त्या पदार्थाचे वीर्य होय. उदा. दूध गरम केल्यावर जरी प्यायले तरी शरीरात गेल्यावर शीत गुणच वाढवणार म्हणून दूध हे शीतविर्यात्मक होय. शीत व उष्ण विर्यात्मक द्रव्ये जेव्हा आपण एकत्र खातो तेव्हा त्याला वीर्यविरुद्ध अन्न म्हणतात. उदा. दूध व मीठ, दूध व मांस, दूध व लोणचे. म्हणजेच भातामध्ये मीठ व दूध त्याबरोबर लोणचे घेऊन जेवणे; विशिष्ट प्रकारचे मांसाचे प्रकार बनवताना दूध घालणे किंवा मांसाहार सेवन केल्यावर लगेच आईस्क्रीम खाणे इत्यादी.

९. कोष्ठ विरुद्ध – कोष्ठ क्रूर किंवा मृदु असते. ज्या व्यक्तींना अल्प वीर्य असलेली, अल्प मात्रेत औषध दिल्यास त्यांचे पोट साफ होत नाही. ती क्रूर कोष्ठ असणारी व्यक्ती व ज्या व्यक्तींनी अगदी दुधात १ चमचा तूप घालून जरी दुधाचे सेवन केले तरी त्यांना लगेच संडासला लागते म्हणून मृदुकोष्ठ असणारी व्यक्ती. अशांना खवा, मिठाई इत्यादी गुरु व विरेचन उत्पन्न करणारी द्रव्ये कोष्ठविरुद्ध ठरतात.

१०. अवस्थाविरुद्ध – जशी आपली जीवनशैली असेल त्यानुसार आहार सेवन असावा याला अवस्थारुप म्हणतात. उदा. जे जास्त श्रम करतात, व्यायाम करतात, त्यांनी जर जास्त वात वाढवणारा आहार सेवन केला तर त्याच्या आहाराला अवस्थाविरुद्ध आहार म्हणतात. त्यांनी गुरु व स्निग्ध आहार घ्यावा.

११. क्रमविरुद्ध – दिनचर्येचे पालन करावे. क्रमानुसार आपण उठल्यापासून झोपेपर्यंत आचरण असणे. मल-मूत्राचा त्याग केल्यावाचूनच नाश्ता करणारे हे क्रमविरुद्ध आहे. भूक लागल्यावाचून आहाराचे सेवन करणे किंवा अत्याधिक भूक लागली तरी भोजन न करणे हे क्रमविरुद्ध होय.

१२. परिहास विरुद्ध – विशिष्ट स्वरुपाच्या आहारानंतर विशिष्ट क्रम, परिहार आचरण करावे लागते. तसे न केल्यास परिहारविरुद्ध होते. उदा. डुकरासारखे उष्ण मांस सेवन केल्यावर परत वर उष्ण द्रव्यांचे सेवन करणे.
दुसरे खूप महत्त्वाचे उदा. म्हणजे मधाचे उष्ण पाण्याबरोबर सेवन करणे.

१३. उपचारविरुद्ध – जे एक द्रव्य सेवन केले आहे ते पचण्याअगोदरच दुसरे द्रव्य सेवन करणे म्हणजे उपचारविरुद्ध होय. तूप, चीज, पनीर असे पदार्थ खाल्ल्यावर लगेच त्यावर थंड पाणी, थंड पेय सेवन करणे हे उपचारविरुद्ध होय. म्हणून स्निग्ध पदार्थ सेवन केल्यावर कोष्ण जलाचे सेवन करावे.

१४. पाकविरुद्ध – अर्धवट शिजवेलेले अन्न उदा. बिर्याणीमध्ये तांदूळ हा कमी शिजवला जातो. अशा प्रकारचा बिर्याणी भात हा पाकविरुद्घध होय. तसेच अत्यधिक शिजवलेल्या भाज्या या पाकविरुद्ध होय.
१५. संयोगविरुद्ध – ज्या दोन द्रव्यांना एकत्र करून आपण विषसदृश तिसरे द्रव्य बनवतो ते संयोगविरुद्ध होय. उदा. दूधात लिंबू टाकून पनीर बनवणे. तसेच अम्लरसाची फळे व दूध, साखर आणि दही व मासे.
अहृद्य – जो आहार किंवा औषध आपण मनापासून आवडीने सेवन करत नाही ते अहृद्य होय. त्याचा आपल्या शरीराला काहीच उपयोग नाही.
१६. संपद्विरुद्ध – ज्या आहारात किंवा औषधामध्ये रस पूर्णतः उतरलेला नाही किंवा अतिपक्व असेल तर आहार किंवा औषध संपद्विरुद्ध होय. अतिपक्व, अतिशिळे झालेल्या फळांचा आहार सेवन करणे, तसेच व्याधी झालेल्या प्राण्यांचे मांस खाणे, योग्य तर्‍हेने न पिकलेली धान्ये सेवन करणे, रसायनयुक्त दूध.

१८. विधिविरुद्ध – अन्नसेवन करण्याचे काही नियम सांगितले आहेत. त्यानुसारच विधीयुक्त आहार सेवन करावा. उदा. अन्न गरम असताना, मनापासून, बडबड न करता सेवन करावा. तसेच शरीराला गरज आहे का?- असा विचार करूनच आहार सेवन करावा. या नियमांविरुद्ध आपण जेव्हा आहार सेवन करतो त्याला विधिविरुद्ध म्हणतात.
सद्यकाळातील काही विरुद्ध आहाराची उदाहरणे…

  • फ्रूटसॅलाड, मिल्क ज्यूस, फ्राइड आइसक्रीम, सिझलिंग ब्रावनी, पास्ता (व्हाइट सॉस पास्ता, हनी ग्लेझ्ड चिकन, कीर व कढी एकत्र, ग्रेव्हीमध्ये बनणारे पदार्थ ज्यामध्ये लसूण, लिंबू, टोमॅटो, मीठ व त्यात दूध किंवा मलई घातली जाते. जिलबीबरोबर रबडी, आले व पुदीनाचा चहा.
  • विरुद्ध आहार सेवन केल्यानंतर होणारे आजार …
    नपुंसकता, वीसर्प, अंधत्व, उन्माद, भगन्दर, मूर्च्छा, आध्मात, उदर, गलग्रह, पाण्डू, श्‍वित्र, शोथ, पीनस, सन्तान दोष इत्यादी. आजार होऊ शकतात.