‘विसंगतीतून विनोद’ अशी विनोदाची सोपी छोटी सुटसुटीत व्याख्या केली जाते. परंतु ही विसंगती दर्शविताना त्याला व्यक्तिगत टीकाटिप्पणीची, व्यक्तिगत बदनामीची धार असू नये अशीही अपेक्षा असते. परंतु आजकाल विनोदाच्या नावाखाली आपली काहीही खपून जाते असा प्रकार चालला आहे. स्टँड अप कॉमेडी हा प्रकार सध्या परदेशाप्रमाणे आपल्या देशातही बोकाळला आहे. तरूण पिढीतील असे अनेक स्टँड अप कॉमेडियन आपल्या समवयस्क मुलामुलींना हसवत आहेत, भोवतालच्या सामाजिक, राजकीय परिस्थितीवर भाष्य करीत आहेत. त्यांना युवा पिढीचा मोठा प्रतिसादही मिळत असतो. परंतु असे कार्यक्रम करीत असताना आपण विनोदाच्या नावाखाली सभ्यतेच्या मर्यादा तर ओलांडत नाही ना ह्याचाही विचार कोठेतरी ह्या विनोदवीरांनी करण्याची आवश्यकता आहे. काही दिवसांपूर्वीच ‘इंडियाज गॉट टॅलंट’मध्ये स्पर्धकाच्या पालकांना उद्देशून असभ्य टिप्पणी केल्याने समय रैना आणि रणवीर अलाहाबादिया हे गोत्यात आले होते. त्यांच्याविरुद्ध पोलिस तक्रारी दाखल झाल्या. न्यायालयानेही विनोदाच्या नावाखाली काहीही खपवून घेतले जाणार नसल्याची समज संबंधितांना दिली. अगदी संसदेमध्येही तो विषय उपस्थित झाला. काल आणखी एका विनोदवीराविरुद्ध वाद उफाळला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील ‘विनोदी’ टीकाटिप्पणीचा राग आल्याने शिवसैनिकांनी कुणाल कामरा ह्या विनोदवीराच्या स्टुडिओवर हल्ला चढवला आणि त्याची नासधूस केली. कुणाक कामरा ह्याने एका हिंदी चित्रपटातील गीताचा आधार घेत शिंदे यांच्यावर टीकात्मक टिप्पणी केली, परंतु ती करीत असताना विनोदापेक्षा ती वैयक्तिक टवाळीकडे अधिक झुकणारी आहे ह्याचे भान त्याने राखले नाही. शिंदे हे पूर्वाश्रमी रिक्षा चालवायचे, त्याचाही संदर्भ त्याने ह्या टवाळीसाठी घेतला हे गैर होते. अर्थात, त्याच्याविरुद्ध पोलीस तक्रारी दाखल झाल्या वगैरेपर्यंत ठीक होते, परंतु शिवसैनिकांनी स्वतःच कायदा हाती घेऊन जी तोडफोड केली, तीही मुळीच योग्य म्हणता येणार नाही. एकनाथ शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत. असे असताना त्यांचेच कार्यकर्ते कायदा हाती घेऊन तोडफोड करतात ह्याचा अर्थ काय? शिंदे समर्थक आपल्या नेत्यावरील वैयक्तिक शेरेबाजीमुळे दुखावले गेले असतील, तर त्यांनी पोलिसी कारवाईचा आधार घ्यायला हवा. कायदा स्वतःच्या हाती घेण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला? कुणाल कामरानेही आपण विनोदाच्या नावाखाली कोणाचीही व्यक्तिगत निंदानालस्ती करू शकत नाही, भारतीय संविधानाने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य बेबंदपणाला अनुमती देत नाही हे लक्षात घ्यायला हवे. आपल्या देशात ‘भावना दुखावणे’ आणि ‘अभिव्यक्तिस्वातंत्र्य’ ह्या दोन्ही गोष्टींचे अगदी टोक गाठले जाताना दिसत असते. कोणाच्या भावना कशामुळे दुखावतील हे जसे आजकाल सांगता येत नाही, तसेच अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली कोण काय बरळेल ह्यालाही धरबंध राहिलेला नाही. स्वतःच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यासाठी आग्रही असणाऱ्या व्यक्ती दुसऱ्याच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याप्रती मात्र असंवेदनशील दिसतात तेव्हा खरोखर आश्चर्य वाटते. ‘स्टँड अप कॉमेडी’द्वारे भोवतालच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक परिस्थितीवर भाष्य जरूर केले जावे, परंतु त्यात एक सभ्यतेची मर्यादा सांभाळली जाणे नक्कीच अपेक्षित आहे. आजवर अनेक विनोदवीरांविरुद्ध मोठे वाद उफाळले. मुनव्वर फारुकीने हिंदू देवदेवतांवर विनोद केल्याने तो गोत्यात आला. तन्मय भटने लता मंगेशकर, अब्दुल कलाम यांच्यासारख्या व्यक्तींची टर उडवल्याने नेटकरी त्याच्यावर नाराज झाले. कपिल शर्मासारख्या कलाकारालादेखील जनतेच्या रोषास सामोरे जावे लागलेले आहे. विनोद ही आपल्या जीवनातील आवश्यक बाब आहे. आजच्या ताणतणावाच्या काळात तर विनोदाची आत्यंतिक जरूरी आहे, परंतु विनोद म्हणजे काय ह्याची जाणीवही ठेवली जाणे तितकेच जरूरी आहे. विनोद म्हणजे टिंगलटवाळीचा परवाना नव्हे. कारुण्याची किनार असलेला विनोद किती उंचीवर जाऊ शकतो हे पु. ल. देशपांड्यांसारख्या लेखकांनी आपल्या लिखाणातून दाखवून दिलेले आहे. जयवंत दळवींच्या ‘ठणठणपाळ’ ने निर्विष विनोदाची कमाल दाखवली आहे. विनोदी साहित्याची समृद्ध परंपरा प्रत्येक भाषेमध्ये असताना ह्या स्टँड अप कॉमेडियन्सना मात्र सभ्य, सुसंस्कृत विनोदाचे वावडे का असावे? शिवीगाळ, अश्लीलता आणि असभ्य, असंस्कृत भाषा म्हणजे विनोद असे ह्यांना का वाटत असेल? की तरुण पिढीमध्ये असलेल्या लोकप्रियतेमुळे आणि तिच्या मिळणाऱ्या प्रतिसादामुळे हे लोक चेकाळत आहेत? विनोद हे फार प्रभावी हत्यार आहे, परंतु त्याचा वापर योग्य प्रकारे आणि जबाबदारीनेच व्हायला हवा.