विनाकारण वाहने अडवून वाहनचालकांना छळू नका

0
13

>> आयजीपी सिंग यांचा वाहतूक पोलिसांना आदेश

वाहतूक पोलीस विनाकारण वाहनचालकांना अडवून त्यांच्या वाहनाच्या कागदपत्रांची तपासणी करत असल्याचे समोर आले आहे. यापुढे वाहनचालक नियम मोडत असेल, तरच त्यांचे वाहन अडवून कारवाई करावी. पोलीस लोकांच्या सेवेसाठी असतात. त्यामुळे विनाकारण वाहने अडवून लोकांना छळू नका, असा आदेश इन्स्पेक्टर जनरल पोलीस (आयजीपी) ओमवीर सिंग यांनी काल काढला. तसेच वाहतूक नियमभंग प्रकरणातील दोषींची कागदपत्रे तपासण्याचे अधिकार केवळ पोलीस उपअधीक्षक व निरीक्षकांनाच असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आयजीपी ओमवीर सिंग यांनी काल एक आदेश जारी केला, त्यात वाहतूक पोलिसांना त्यांच्या मूळ कर्तव्याची जाणीव करून देत लोकांना नाहक छळू नये, असे म्हटले आहे.

पोलीस हे सामान्य लोकांच्या सेवेसाठी असतात, त्यांनी लोकांच्या समस्या दूर केल्या पाहिजेत. वाहतूक पोलिसांचे मुख्य कर्तव्य हे वाहतूक सुरळीत ठेवणे असून, त्यांनी त्यावरच अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे सिंग यांनी आदेशात म्हटले आहे.

यापुढे वाहतूक नियमांचा भंग होत असेल, तरच वाहनचालकांना थांबवावे, याची सर्व पोलीस स्थानके, वाहतूक विभाग, वाहतूक उपअधीक्षक यांनी खबरदारी घ्यावी. दोषी वाहनचालकांना केवळ संबंधित वाहतूक उपअधीक्षक व पोलीस निरीक्षकांनीच दंड आकारावा. तसेच वाहतूक उपअधीक्षक व पोलीस निरीक्षक यांनाच दोषी वाहनचालकांची कागदपत्रे तपासण्याचे अधिकार राहतील. अन्य कोणत्याही पोलीस कर्मचार्‍याला कागदपत्रे तपासता येणार नाहीत, असेही आदेशात नमूद केले आहे. सर्व पोलीस अधीक्षकांनी या आदेशाचे पालन होते की नाही, यावर लक्ष ठेवावे, तसेच हा आदेश मोडणार्‍यांविरुद्ध कारवाई करावी, असेही आदेशात म्हटले आहे.