विधानसभेत अर्थसंकल्प चर्चेविनाच मंजूर

0
41

गेल्या मार्च महिन्यात सरकारने गोवा विधानसभेत मांडलेला २०२१-२२ ह्या वर्षासाठीचा अर्थसंकल्प कोणत्याही चर्चेविना काल संमत करण्यात आल्याने सत्ताधारी व विरोधक यांच्यात जोरदार शाब्दिक चकमकी झडल्या. सरकारच्या या कृतीला विरोध करीत सर्व विरोधी पक्षांच्या सदस्यांनी सभापती राजेश पाटणेकर यांच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत धाव येऊन सभागृहात गदारोळ केला.

सभागृह कामकाज व्यवहार मंत्री माविन गुदिन्हो यांनी यावेळी बोलताना चर्चेशिवाय हा अर्थसंकल्प सभागृहात संमत करता यावा यासाठी कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत त्यासंबंधीचे नियम शिथिल करण्याबाबत एकमत झाले होते असे सांगितले. त्यावर विरोधकांनी माविन गुदिन्हो हे खोटे बोलत असून असा कोणताही निर्णय झाला नसल्याचा दावा केला.

माविन गुदिन्हो खोटे बोलत असून हे सगळे धक्कादायक आहे, असे यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते दिगंबर कामत म्हणाले. चर्चा घडवून न आणता प्रमोद सावंत सरकारने अर्थसंकल्प संमत करून गोवा विधानसभेत इतिहास घडवल्याचेही कामत यांनी सांगितले.
या सरकारने २६ हजार कोटींचे कर्ज घेऊन इतिहास रचला असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. सरकारच्या ह्या कृतीमुळे राज्यात आर्थिक आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली असल्याचे ते म्हणाले.

ज्येष्ठ कॉंग्रेस नेते प्रतापसिंह राणे म्हणाले की, मी या सभागृहातील सर्वांत ज्येष्ठ सदस्य आहे. एवढ्या वर्षांत आपण अशा प्रकारे कुठल्याही सरकारने चर्चा घडवून न आणता अर्थसंकल्प संमत केल्याचे पाहिले नाही. गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते लुईझिन फालेरो, मगो नेते सुदिन ढवळीकर, अपक्ष आमदार रोहन खंवटे आदींसह सर्वच विरोधी आमदारांनी यावेळी सरकारच्या वरील कृतीला हरकत घेत जोरदार टीका केली व सभापतींच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत धाव घेतली. मात्र, तत्पूर्वीच सभापती राजेश पाटणेकर यांनी गोंधळाच्या वातावरणातच आवाजी मतदानाने अर्थसंकल्प संमत झाल्याचे जाहीर केले व सकाळच्या सत्राचे कामकाज तहकूब केले.