विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसची आक्रमक रणनीती

0
118

>> विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांची माहिती

आगामी विधानसभा निवडणुकांसाठी कॉंग्रेस पक्षाने आक्रमक रणनीती तयार केलेली आहे. पक्षाचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव हे येत्या आठवड्यापासून सर्व चाळीसही मतदारसंघाचा दौरा करून गट समित्यांचा आढावा घेणार असल्याचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी कॉंग्रेस सदस्य नोंदणी समन्वय समितीच्या आभासी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

वरील बैठकीत दिनेश गुंडू राव यांनी पक्षाचे सर्व आमदार, खासदार तसेच प्रदेश कॉंग्रेस समिती सदस्यांना आता मैदानात उतरून लोकांकडे थेट संपर्क साधण्याचे आदेश दिले.

चाळीसही मतदारसंघातील गट समित्यांचा आढावा घेतल्यानंतर कॉंग्रेस पक्षाच्या राज्य, जिल्हा व गट समित्यांमध्ये आवश्यक ते बदल केले जातील. पक्षाच्या सर्व सदस्यांच्या मागील कामगिरीचा आढावा घेतला जाणार असून पक्षासाठी चांगले योगदान दिलेल्यांना बढती देण्यात येणार आहे. काही कारणांमुळे पक्ष कार्यासाठी जास्त वेळ देऊ न शकलेल्यांना इतर जबाबदारी देण्यात येईल, असे राव यांनी सांगितल्याचे कामत म्हणाले.

दोन्ही जिल्हा समित्या व जोड संघटनांच्या कामगिरीचा आढावा घेण्यात येणार असून गरज भासल्यास तेथेही आवश्यक ते बदल करण्यात येतील असेही राव यांनी सांगितल्याचे कामत पुढे म्हणाले.

अखिल भारतीय कॉंग्रेस पक्षातर्फे ११ जून रोजी पेट्रोल-डिझेल व गॅस दरवाढीविषयी देशव्यापी आंदोलन छेडण्यात येणार असून त्यानिमित्त राज्यातील सर्व चाळीसही मतदारसंघात धरणे व निषेध कार्यक्रम आयोजित करण्याचे बैठकीत ठरल्याचे कामत यांनी स्पष्ट केले.
या आभासी पद्धतीच्या बैठकीत विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर, समन्वय समितीचे अध्यक्ष रमाकांत खलप, सहअध्यक्ष ऍलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन, ऍलेक्स सिल्वेरा व इतर सदस्यांनी भाग घेतला.