>> गोवा फॉरवर्ड पार्टीकडून प्रश्न
गोवा सरकारने नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गोवा खासगी विद्यापीठ विधेयक २०२० घाई गडबडीत कोणतीच चर्चा न करता मंजूर करण्यामागील कारण काय, असा प्रश्न काल गोवा फॉरवर्ड पार्टीने येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यानी या विधेयकाला मंजूरी न देता ते परत पाठवावे, अशी मागणीही लोलयेकर यांनी यावेळी केली.
यासंबंधी बोलताना पार्टीचे सरचिटणीस मोहनदास लोलयेकर म्हणाले की, खासगी विद्यापीठ विधेयक २०२० विधानसभेत मंजूर करण्यापूर्वी त्याबाबत विधानसभेत सविस्तर चर्चा व्हायला हवी होती. खासगी विद्यापीठाचे फायदे व तोटे, हे विद्यापीठ सुरू झाल्यानंतर गोवा विद्यापीठावर काय परिणाम होऊ शकतो, खासगी विद्यापीठात दर्जात्मक शिक्षण दिले जाईल काय, त्यांची फी किती असेल, ती गरीब विद्यार्थ्यांना परवडेल काय, श्रीमंतांच्या मुलांना पैशांच्या मोबल्यात तेथे पदव्या तर दिल्या जाणार नाहीत ना,गोवा विद्यापीठाचे कायदे या विद्यापीठाला लागू होतील का, असे कित्येक प्रश्न असून या प्रश्नांवर चर्चा व्हायला हवी होती, असे मोहनदास लोलयेकर म्हणाले.
हे विधेयक जेव्हा विधानसभेत मंजूर करण्यात आले तेव्हा विरोधी पक्षाचे आमदार सभागृहात नव्हते. या विधेयकावर चर्चा होण्याची गरज आहे, असे लोलयेकर यानी नमूद केले.
घोटाळ्याची भीती
गोव्यात खासगी विद्यापीठाची स्थापना करण्यासाठी उत्तर प्रदेश, बिहारमधील माफिया तर येणार नाहीत ना, अशी भीतीही लोलयेकर यानी यावेळी व्यक्त केली. खासगी विद्यापीठाच्या नावाने राज्यात घोटाळा होण्याची भीती असून या विद्यापीठासाठी जमीन कोण देणार, असा प्रश्नही लोलयेकर यानी यावेळी केला.