विद्याधीशतीर्थ स्वामींचे पीठारोहण भक्तिभावाने

0
109

५४० वर्षांची दीर्घ परंपरा लाभलेल्या श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी मठाचे २४वे स्वामी महाराज म्हणून श्र्‌रीमद् विद्याधीश श्र्‌रीपाद वडेरतीर्थ स्वामी महाराजांनी काल शुक्रवारी विधिवत पदभार सांभाळला. यावेळी कर्नाटक, केरळ, आणि गोव्यातून हजारो मठानुयायी उपस्थित होते.

मठपरंपरेतील २३ वे गुरूस्वामी विद्याधिराजतीर्थ श्रीपाद वडेर स्वामी महाराजांचे १९ जुलै रोजी महानिर्वाण झाले. त्यामुळे त्यांचे उत्तराधिकारी म्हणून शिष्यस्वामी असलेल्या श्र्‌रीमद् विद्याधीशतीर्थ स्वामीजींवर मठाची जबाबदारी विधिवत सोपविण्यात आली.

गुरूस्वामींचे संकल्प पूर्ण
करण्याचे प्रयत्न करणार

पीठारोहणानंतर आपल्या आशीर्वचनपर भाषणात विद्यमान स्वामी महाराजांनी गुरूस्वामींनी अनेक संकल्प सोडले होते. त्यातील अपुरे संकल्प पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी गुरूस्वामींच्या अनेक आठवणी कथन केल्या.
प्रभू रामचंद्रांना राज्याभिषेकाच्या दिवशी वनवास पत्करावा लागला आणि गुरूस्वामीजींच्या महानिर्वाणाच्या बाराव्या दिनी त्यांच्या अनुपस्थितीत आपले पीठारोहण होत आहे हा योगायोग आहे. गुरूस्वामींनी मठाचा इतिहास परत लिहून घेतला. आपल्याकडून त्याचे पठण करून घेतल्याचे स्वामी म्हणाले.


गुरूस्वामींनी समाजाला
संघटित केले ः धेंपे

२३ वे स्वामी महाराज श्र्‌रीमद् विद्याधिराजतीर्थ स्वामी महाराज कर्मयोगी आणि सिद्धयोगी होते. त्यांचे मठ परंपरेतील ४७ वर्षांचे कार्य सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखे आहे. गुरूस्वामी महाराजांनी सारस्वत समाजाला संघटित केले. मठाच्या कार्यपद्धतीत बदल केला पण ते करताना मठ परंपरा अबाधित ठेवली आणि समाजबांधवांच्या मनात स्वधर्म, सुसंस्कृतीची आणि स्वाभिमानाची ज्योत पेटविली. या मठाचे २४ वे उत्तराधिकारी म्हणून श्र्‌रीमद् विद्याधीशतीर्थ स्वामी पदभार सांभाळत आहेत ही अभिमानाची गोष्ट असल्याचे मठ समितीचे अध्यक्ष श्र्‌रीनिवास धेंपे यांनी सांगितले.

दिवसभर चाललेल्या या सोहळ्यात सकाळी विविध धार्मिक विधी, संध्याकाळी ३.१० वा. प्रत्यक्ष गुरूपीठारोहणाचा सोहळ्याला प्रारंभ झाला. यावेळी वैदिकांकडून गुरूपरंपरा स्तोत्र पठण झाले. यानंतर अध्यक्ष श्र्‌री. धेंपे आणि उपाध्यक्ष रामचंद्र नायक यांनी प. पू. स्वामी महाराजांची पाद्यपूजा केली.

विविध मठांतून पाठवण्यात आलेल्या शुभसंदेशांचे वाचन करण्यात आले. सूत्रसंचालन अनिल पै यांनी केले. गोव्याच्या राज्यपालांनी पाठविलेल्या संदेशाचे श्र्‌री. धेंपे यांनी वाचन केले.

आज चातुर्मास व्रताचरण
आज शनिवार दि. ३१ जुलै रोजी संध्याकाळी ५ वा. श्र्‌रीमद् विद्याधीशस्वामी महाराज व्यासपूजापूर्वक चातुर्मास व्र्रताला प्रारंभ करणार आहेत.