राज्यात जुन्या जलवाहिन्या टप्प्याटप्प्याने बदलण्यात येणार आहेत. सध्या विजेचा लपंडाव सुरू असल्याने काही भागात पाणीटंचाईची समस्या निर्माण होत आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल विधानसभेत सांगितले. आमदार कृष्णा साळकर यांच्या वास्कोतील पाणीटंचाईसंबंधीच्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते. राज्यात पावसाळ्याच्या दिवसांत वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. त्यामुळे पाणी शुध्दीकरणाच्या कामात अडथळा निर्माण होत आहे. पाणी आणि वीज विभागाकडून पाणीटंचाईची समस्या सोडविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राज्यातील जलवाहिन्या जीर्ण झालेल्या आहेत. त्यामुळे त्या फुटण्याचे प्रकार घडतात. राज्यभरातील जुन्या जलवाहिन्या टप्प्याटप्प्याने बदलण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. तसेच पाणी पुरवठ्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.