विंडीज दौर्‍यासाठी टीम इंडियाची घोषणा

0
117

>> तरुण खेळाडूंना संधी

>> हार्दिक पंड्याला विश्रांती

विंडीज दौर्‍यासाठी भारताच्या कसोटी, वनडे व टी-ट्वेंटी संघांची काल रविवारी घोषणा करण्यात आली. निवड समितीचे अध्यक्ष एम. एस. के. प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये निवड समितीची बैठक झाली. कर्णधार विराट कोहली हा देखील या बैठकीला उपस्थित होता. या बैठकीनंतर दुपारी २ वाजण्याच्या सुमारास पत्रकार परिषदेत नव्या संघाची घोषणा करण्यात आली.

भारताचा विंडीज दौरा ३ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या दौर्‍यात २ कसोटी सामने, ३ वनडे सामने आणि ३ टी- ट्वेंटी सामने खेळण्यात येणार आहेत. तिन्ही प्रकारासाठी विराट कोहली कर्णधारपदी कायम असून एकदिवसीय आणि टी ट्वेंटीसाठी रोहित शर्मा तर कसोटीच्या उपकर्णधारपदी अजिंक्य रहाणेची निवड करण्यात आली आहे. धोनीने आपण पुढील दोन महिने उपलब्ध नसल्याचे बीसीसीआयला कळविले आहे. त्यामुळे या दौर्‍यात त्याचा समावेश नसेल. या दौर्‍यासाठी मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर, अष्टपैलू कृणाल पांड्या, लेगस्पिनर राहुल चहर, स्विंग गोलंदाज दीपक चहर, अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर, वेगवान गोलंदाज नवदीप सैनी, डावखुरा मध्यमगती गोलंदाज खलील अहमद या तरुण खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. अष्टपैलू हार्दिक पंड्या याला संपूर्ण दौर्‍यासाठी विश्रांती देण्यात आली असून वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह केवळ कसोटी मालिकेत खेळेल. टी-ट्वेंटीमधून प्रमुख फिरकीपटू युजवेंद्र चहल याला बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. त्याची जागा राहुल चहरने घेतली आहे. विश्‍वचषक स्पर्धेतील काही मोजक्या सामन्यांत अपयशी ठरल्यानंतर दिनेश कार्तिकला वनडे संघातून बाहेर बसवण्यात आले आहे. विजय शंकर याचा विचार करण्यात आलेला नाही.

टी-ट्वेंटी संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), कृणाल पंड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, भुवनेश्‍वर कुमार, खलील अहमद, दीपक चहर, नवदीप सैनी
वन डे संघ : विराट कोहली ( कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, केदार जाधव, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, नवदीप सैनी, खलील अहमद
कसोटी संघ : विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), मयंक अगरवाल, लोकेश राहुल, चेतेश्‍वर पुजारा, हनुमा विहारी, रोहित शर्मा, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), वृद्धिमान साहा (यष्टिरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, उमेश यादव व इशांत शर्मा.