वाहतूक नियमभंग प्रकरणी यापुढे दंडाची रक्कम डिजिटल पेमेंटनेच स्वीकारली जाणार

0
0

गोवा पोलिसांकडून येत्या 1 मार्चपासून वाहतूक नियमांच्या उल्लंघन प्रकरणातील दंडाची रक्कम फक्त डिजिटल पेमेंट पद्धतीने स्वीकारली जाणार आहे.
यासंबंधीचा एक आदेश वाहतूक पोलीस विभागाचे उपअधीक्षक सुदेश नार्वेकर यांनी जारी केला आहे. वाहतूक नियमांच्या उल्लंघन प्रकरणात रोख पद्धतीने दंडाची रक्कम स्वीकारली जात असल्याने गैरव्यवहाराची काही प्रकरणे उजेडात आली आहेत. डिचोली पोलीस स्थानकात वाहतूक विभागात एका महिला कर्मचाऱ्याने दंडाच्या सुमारे 17.30 लाख रुपयांच्या रकमेची अफरातफर केल्याचे उघडकीस आले आहे. यासारखे प्रकार पुन्हा घडू नयेत म्हणून डिजिटल पेमेंट पद्धतीचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या 1 मार्चपासून वाहतूक पोलीस दंडाची रक्कम रोख स्वरूपात स्वीकारणार नाहीत. डिजिटल पेमेंट हे डेबिट/ क्रेडिट कार्ड, ई-चलन यंत्रांवरील क्यूआर कोड अथवा केंद्रीय वाहतूक खात्याच्या संकेतस्थळावरून दंडाची रक्कम भरता येणार आहे, असे नार्वेकर यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.