वाहतूक खात्याने १०४३ जणांची ड्रायव्हिंग लायसन्स केली निलंबित

0
128

वाहतूक खात्याने जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या काळात वाहतूक नियमांच्या उल्लंघन प्रकरणी १०४३ वाहन चालकांचे परवाने निलंबित केले आहेत. वाहतूक पोलीस आणि वाहतूक खात्याच्या अधिकार्‍याकडून नोंद केली जाणारी प्रकरणे कारवाईसाठी वाहतूक खात्याच्या संबंधित कार्यालयाकडे सादर केली जातात. दारूच्या नशेत वाहन चालविणार्‍या ३०६ वाहन चालकांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणार्‍या २३० जणांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. अतिवेगाने वाहन चालविणार्‍या ४०९ जणांचे परवाने निलंबित करण्यात आले आहे. तर रेड लाइटचे उल्लंघन प्रकरणी ९० वाहन चालक आणि बेकायदा प्रवासी वाहतूक प्रकरणी ८ वाहन चालकांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

वाहतूक पोलिसांनी २ ते ६ मे याकाळात विशेष मोहिमेत वाहतूक नियमाचे उल्लंघन करणार्‍या २३१८ जणांना दंड ठोठावला आहे. राज्यात वाहतूक पोलिसांकडून सध्या पंधरा दिवसासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत काळ्या काचा, दारूच्या नशेत वाहन चालविणे, मोबाईलचा वापर, अतिवेगाने वाहन चालविणार्‍या वाहन चालकांना दंड ठोठावला जात आहे.

वाहतूक पोलिसांनी पाच दिवसाच्या काळात काळ्या काचा असलेल्या १८२९ वाहन चालकांना दंड ठोठावला आहे. दारूच्या नशेत वाहन चालविणार्‍या २१३ वाहन चालकांचे परवाने ताब्यात घेऊन कारवाईला सुरुवात केली आहे. वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणार्‍या १०६ वाहन चालक आणि अतिवेगाने वाहन चालविणार्‍या १७० वाहन चालकांना दंड ठोठावण्यात आला आहे, अशी माहिती वाहतूक विभागाच्या सूत्रांनी दिली.