वाद ‘पद्मावती’चा

0
187

संजय लीला भन्साळींच्या ‘पद्मावती’ चित्रपटावरून उसळलेला विवाद दिवसेंदिवस गंभीर रूप घेत चालला आहे. भन्साळींवरील हल्ल्यासाठी पाच कोटींचे बक्षीस जाहीर करण्यापासून अभिनेत्री दीपिका पडुकोनचे नाक कापण्याची धमकी देण्यापर्यंत काहींची मजल गेली आहे. यापूर्वी कोल्हापुरात या चित्रपटाचा सेट जाळण्यात आला होता, त्यामुळे अशा प्रकारच्या धमक्या गांभीर्याने घेऊन सरकारने अशा फतवेखोरांवर सर्वप्रथम कारवाई केली पाहिजे. भन्साळींचा हा चित्रपट राजपुतांच्या दृष्टीने देवीस्वरूप असलेल्या महाराणी पद्मिनीचे अवमानास्पद चित्रण करीत असल्याची त्यांची भावना असल्याने त्याविरुद्ध संवैधानिक मार्गांनी आपला निषेध नोंदवण्याचे आणि न्यायालयांचे दरवाजे ठोठावण्याची संधी त्यांना खुली आहे आणि ते ठोठावलेही गेलेले आहेत. असे असताना अशा प्रकारच्या फतवेबाजीला प्रोत्साहन मिळणे सर्वस्वी अनुचित आहे आणि शतकानुशतके शौर्य गाजविलेल्या आणि त्याची प्रचंड किंमत मोजावी लागलेल्या राजपुतांच्या त्या क्षात्रपरंपरेलाही शोभादायक नाही. ‘पद्मावती’ ही व्यक्तिरेखा खरी की खोटी असा एक वाद उपस्थित करण्यात आला आहे. अल्लाउद्दिन खिलजीची स्वारी चितोडगडावर झाली १३०३ साली आणि सूफी काव्यात ‘पद्मावती’चा प्रथम लेखी निर्देश झाला ते ‘पद्मावत’ मलिक मुहंमद जयसीने लिहिले त्यानंतर दोन शतकांनंतर म्हणजे १५४० मध्ये हे जरी खरे असले, तरी तत्पूर्वी मौखिक परंपरेत महाराणी पद्मिनीची ही कथा पिढ्यानपिढ्या चालत आलेली असू शकते. खिलजी हा रानटी क्रूरकर्मा होता आणि राणा रावळ रतनसिंह सत्तेवर असताना त्याने चितोडवर स्वारी केली होती याचे ऐतिहासिक पुरावे उपलब्ध आहेत. त्यावेळी रजपूत स्त्रियांनी शीलरक्षणार्थ पहिला जौहर केला असे इतिहास सांगतो. चितोडवर दुसरा जौहर झाला तो राणा सांगाचा खानुआच्या लढाईत मृत्यू झाल्यानंतर गुजरातचा सुलतान बहादूरशहाने चितोडवर स्वारी केली तेव्हा राणा सांगाची पत्नी राणी कर्णावतीच्या वा कर्मवतीच्या नेतृत्वाखाली ८ मार्च १५३५ रोजी आणि तिसरा जौहर झाला अकबर चितोडवर चालून आला तेव्हा २२ फेब्रुवारी १५६८ रोजी. आक्रमकांना शरण जाऊन स्वतःची विटंबना करून घेण्याऐवजी स्त्रियांनी केलेले हे सामूहिक जौहर आणि पुरुषांनी केलेले शाके यांनी राजपुतांच्या इतिहासाला सोन्याची झळाळी दिलेली आहे. राजपूत समाजमानस त्याविषयी विलक्षण संवेदनशील आहे. या जौहर आणि शाक्यांंविषयी इतिहासकारांत दुमत नाही. विवाद आहे तो राणा रतनसिंहाने खिलजीच्या मागणीवरून आपल्या पत्नीचे प्रतिबिंब त्याला दाखवले होते की नाही याविषयी. ती कथा चितोडगडावर पद्मिनी महालास भेट देणार्‍या पर्यटकांना आजवर त्या ठिकाणी सांगितली जात आली, परंतु आता ‘पद्मावती’ चित्रपटाच्या निमित्ताने तिला आक्षेप घेतले गेले आहेत. चित्रपट हे आजचे अत्यंत प्रभावी माध्यम असल्याने हे घडले असावे. ‘पद्मावती’ला विरोध करणार्‍यांनी अद्याप तो चित्रपट पाहिलेला नाही हे खरे आहे, परंतु त्याचे जे काही अंश समोर आले आहेत, चित्रपटाशी संबंधितांनी आजवर ज्या मुलाखती दिल्या आहेत, त्यातून संजय लीला भन्साळींनी आविष्कार स्वातंत्र्याच्या नावाखाली इतिहासाशी विपर्यस्त चित्रण करण्याचा प्रयत्न चालविला असल्याची राजपूत समाजाची भावना झालेली आहे. त्यामुळे त्यावर प्रतिक्रिया उमटत आहेत. परंतु ह्या प्रतिक्रिया सर्वस्वी कायद्याच्या आणि संविधानाच्या चौकटीतच उमटल्या पाहिजेत. खंडणीखोरांना, समाजकंटकांना, गुंडपुंडांना त्यातून हिंसाचाराची संधी मिळू नये. दुर्दैवाने आज या वादात राजकारणी, राजघराणी, करणी सेनेसारख्या राजपूत संघटना आणि प्रसिद्धीलोलूप लुंगेसुंगेही आपापले इरादे घेऊन उतरले आहेत. भन्साळीच्या यापूर्वीच्या चित्रपटात – ‘बाजीराव मस्तानी’ मध्ये प्रत्यक्षात अधू पायाची असलेली काशीबाई मस्तानीसह नाचताना दाखवली गेली होती. ऐतिहासिक व्यक्तिरेखांबाबत अशा प्रकारचे कल्पनास्वातंत्र्य घेणे उचित आहे का हा या विवादातील मूलभूत प्रश्न आहे. एखादी गोष्ट ऐतिहासिक सत्य म्हणून प्रस्तुत करीत असताना त्यावर पुरेसे संशोधन व्हावे अशी किमान अपेक्षा असते, परंतु ते घडत नाही, त्यातून असे विवाद जन्म घेतात. अलीकडेच दोन ‘बाहुबली’ चित्रपट येऊन गेले. परंतु ते सर्वस्वी काल्पनिक होते. त्यामुळे तेथे जे स्वातंत्र्य दिग्दर्शकाला मिळाले ते ऐतिहासिक चित्रपटाच्या दिग्दर्शकाला कसे मिळू शकेल? ‘पद्मावती’च्या वादाचे मूळ आहे ते येथे आहे. इतिहासाची मांडणी जेव्हा उदात्तीकरणाच्या रूपात केली जाते तेव्हा कोणाची त्याला हरकत असत नाही, पण जेव्हा ती अवमानास्पद रूप घेते तेव्हा समाजाला ती सहन होत नाही. त्यातूनच असे विवाद जन्म घेतात आणि विकोपाला जातात!