वादळ

0
172

अमेरिकेचे ४५ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प सत्तारूढ झाले आहेत. बराक ओबामा यांच्यासारख्या उमद्या, लोकप्रिय नेत्याची जागा त्यांच्यासारख्या अत्यंत फटकळ, अर्वाच्च बोलणार्‍या, महिलांपासून पत्रकारांपर्यंत सर्वांविषयी जाहीर अनुद्गार काढणार्‍या, परंतु व्यावसायिकदृष्ट्या अत्यंत यशस्वी ठरलेल्या, ‘श्रीमंत कसे व्हावे’ यासारखी जवळजवळ पंधरा बेस्टसेलर पुस्तके लिहिणार्‍या आणि बर्‍या-वाईट कारणांनी का असेना, आजवर सदैव प्रकाशझोतात राहत आलेल्या अत्यंत वादग्रस्त नेत्याने आता घेतलेली आहे. अवघे जग या नव्या राष्ट्राध्यक्षाकडे विस्मयाने आणि तितकेच भीतीने पाहते आहे, कारण शेवटी एका जागतिक महासत्तेची सूत्रे आता या महाशयांच्या हाती आलेली आहेत. कोणाच्या ध्यानीमनी नसताना ट्रम्प रिपब्लिकन प्रायमरीज्‌मध्ये बघता बघता आपल्या सतरा प्रतिस्पर्ध्यांवर मात करून आणि शेवटी हिलरी क्लिंटन यांच्यासारख्या अनुभवी नेतृत्वाला पराजयाची धूळ चारून या पदावर येऊन पोहोचले आहेत. ‘ग्रेट अगेन’ किंवा ‘हाऊ टू फिक्स अवर क्रिपल्ड अमेरिका’ नावाचे त्यांचे एक पुस्तक आहे. आपल्या अमेरिकेला पुनर्वैभव कसे प्राप्त करून द्यायचे त्याविषयीच्या स्वतःच्या कल्पना त्यांनी त्यात मांडल्या आहेत. प्रचारकाळातील ट्रम्प यांची भाषणे पाहिली तरी त्यांच्या मनात काय चालले आहे आणि ते काय करू इच्छितात त्याचे चित्र समोर येते. अमेरिकी देशभक्तीच्या लाटेवर स्वार होऊन ते सत्तारूढ झालेले असल्याने साहजिकच देशात येणारे स्थलांतरितांचे लोंढे थोपवणे, मेक्सिकोच्या सीमेवर भिंत उभारून तेथील निर्वासितांना मज्जाव करणे, ज्या कंपन्या इतर देशांतून आयात करतात वा इतर देशांत आउटसोर्सिंग करतात, त्यांच्यावर कर लादणे, चीनसारख्या देशांशी केलेल्या किंवा नाफ्टा, ट्रान्स पॅसिफिक सारख्या करारांचा पुनर्विचार करणे अशी आपली प्राधान्ये त्यांनी यापूर्वीच जाहीर केलेली आहेत. हवामान बदलांसंदर्भातील ठराव वा पॅरिस करार त्यांना मान्य नाही. उद्योगसंस्कृतीचे ते पुरस्कर्ते आहेत. जागतिक घडामोडींमध्ये अमेरिका तटस्थता स्वीकारील, परंतु आयएसआयएसविरुद्धच्या कारवाईत अधिक आक्रमक भूमिका बजावील असे संकेतही त्यांनी दिलेले आहेत. अल्पसंख्यकांविषयी; विशेषतः मुस्लीम स्थलांतरितांविषयी त्यांनी काढलेले अनुद्गार ट्रम्प यांच्या एकंदर भूमिकेबाबत प्रश्नचिन्हे निर्माण करतात. बराक ओबामांनी सत्तेवरून पायउतार होताना हिंदू, ज्यू किंवा लॅटिन व्यक्ती अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष झालेली आपल्याला आवडेल असे जे उद्गार काढले, तो खरे तर ट्रम्प यांना टोला आहे. आपल्या शेवटच्या भाषणातही ओबामांनी लोकशाहीला असलेल्या धोक्यांकडे जनतेचे सूचकपणे लक्ष वेधले होते. देशात भेदभावाचे नवे पर्व येण्याची जी भीती बराक ओबामांनी त्या भाषणात व्यक्त केली होती. डोनाल्ड ट्रम्प हे एक अजून पुरते न उलगडलेले कोडे आहे. वॉशिंग्टन टाइम्सचे वीस वार्ताहर, तीन संपादक आणि दोन फॅक्टचेकर यांनी मिळून ‘ट्रम्प रिव्हिल्ड ः ऍन अमेरिकन जर्नी ऑफ अँबिशन, ईगो, मनी अँड पॉवर’ हे अप्रतिम पुस्तक साकारले आहे. त्यात डोनाल्ड ट्रम्प यांच्या आजवरच्या संपूर्ण वाटचालीचा परखड लेखाजोखा आहे, जो आपल्याला भविष्यात येऊ घातलेल्या वादळाचीही चाहुल देतो. रिअल इस्टेट, बड्या बड्या इमारती, हॉटेल, कॅसिनो, गोल्फ कोर्स यांचा हा अब्जाधीश सम्राट खरोखरच अमेरिकेला पुनर्वैभव प्राप्त करून देईल? त्याचे जगावर कोणते पडसाद उमटतील? प्रश्नचिन्हांच्या या घेर्‍यातच या जागतिक महासत्तेचे सत्ताशकट त्यांच्या हाती आलेले आहे. त्याची फळे मिळण्यास अर्थातच काही काळ जावा लागेल. ही तर डोनाल्ड ट्रम्प नावाच्या एका वादळाची सुरूवात आहे…!