वादळीवार्‍यासह राज्यात मुसळधार पाऊस

0
133

>> चोवीस तासांत साडेतीन इंच पाऊस; कोकण रेल्वेच्या काही गाड्या रद्द

राज्यातील विविध भागांना वादळी वार्‍यासह जोरदार पावसाने काल झोडपून काढले. शनिवारपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर कायम आहे. वादळी वार्‍यामुळे झाडांच्या पडझडीच्या घटनांची नोंद झाली असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. येथील अग्निशामक दलाच्या मुख्य कार्यालयाकडे रविवारी सकाळपासून पडझडीच्या ९५ पेक्षा जास्त घटनांची नोंद झाली आहे. येथील हवामान विभागाने केसरी अलर्ट जारी केला असून सोमवारी जोरदार पावसाची शक्यता वर्तविली आहे. मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा देण्यात आला आहे.

मागील चोवीस तासांत साडेतीन इंचांपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. राज्यात आत्तापर्यंत ८८ इंच पावसाची नोंद झाली आहे.
राज्यात काही ठिकाणी घरांवर झाडे मोडून पडली आहेत. तसेच, रस्त्यावरसुद्धा झाडे मोडून पडल्याने वाहतुकीत अडथळा निर्माण झाला. राज्यातील काही भागात विजेच्या खांबावर झाडे आणि झाडाच्या फांद्या मोडून पडल्याने वीजपुरवठ्यावर विपरीत परिणाम झाला आहे. विजेच्या तारा तुटल्याने काही भागातील वीजपुरवठा खंडित झाला.
अग्निशामक दलाच्या कर्मचार्‍यंनी घरे आणि रस्त्यावर पडलेली झाडे हटविण्याच्या कामाच्या सुरुवात केली आहे. वीज खात्याचे कर्मचारी खंडीत झालेला वीजपुरवठा पुन्हा सुरळीत करण्याचे काम सुरू केले आहे.
रविवारी सकाळी ८.३० ते संध्याकाळी ५.३० यावेळेत (नऊ तास) पणजीमध्ये २ इंच आणि मुरगावमध्ये २.१४ इंच पावसाची नोंद झाली आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

पणजी शहराला जोरदार पावसाने झोडपून काढले आहे. जोरदार पावसामुळे मळा, मिरामार व इतर भागातील रस्त्यावर पावसाचे पाणी साचले होते.

वाळपईत ५.८४ इंच पाऊस
मागील चोवीस तासात वाळपई येथे सर्वाधिक ५.८४ इंच पावसाची नोंद झाली आहे. पेडणे येथे ४.७५ इंच, पणजी येथे २.६० इंच, साखळी येथे ४.३० इंच, काणकोण येथे १ इंच, दाबोली येथे २.४३ इंच, मुरगाव येथे २.६८ इंच, केपे येथे २.९२ इंच, सांगे येथे ३.५२ इंच पावसाची नोंद झाली आहे. म्हापसा, फोंडा, ओल्ड गोवा, मडगाव येथील पावसाची माहिती उपलब्ध झाली नाही.

सासष्टीत अतिवृष्टी
सासष्टी तालुक्यात काल रविवारी अतिवृष्टी झाली. त्यामुळे मडगाव शहरात ठिकठिकाणी पाणी तुंबल्याचे दिसून येत होते अनेक ठिकाणी झाडे पडून नुकसान झाले. तालुक्यात ठिकठिकाणी झाडे पडण्याच्या एकूण २५ घटना घडल्या. संध्याकाळी पुन्हा वादळाचा तडाखा तालुक्याला बसल्यामुळे पुन्हा झाडे कोसळून नुकसान झाले. काल संध्याकाळी फातोर्डा येथील नेहरू स्टेडियमवरील पत्रे उडून गेल्याची घटना घडली. रात्री उशिरापर्यंत अग्निशामक दलाचे जवान अडथळे दूर करण्याच्या कामात व्यस्त होते.
काणकोण तालुक्यातही तुफानी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. तालुक्यातील चापोली धरणाची पाण्याची पातळी काल वाढली. गेल्या काही दिवसांंपासून पडत असलेल्या पावसामुळे तळपण, गालजीबाग व साळेरी नदीच्या पाण्याची पातळी वाढलेली आहे. जोरदार पडलेल्या पावसामुळे मासेमारीसुद्धा ठप्प झाली आहे.

कोकण, महाराष्ट्रातही मुसळधार
गेले तीन दिवस ककणासह मुंबई, ठाणे तसेच महाराष्ट्राच्या अनेक भागात धो-धो पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक धरेणे तुडुंब भरून वहात असून नद्यांना पूर आलेले आहेत. शहारांमध्ये, गावांमध्ये पाणी शिरलेले आहे. अनेक ठिकाणी रस्ते बंद झाले असून जनजीवन पार विस्कळीत होऊन गेलेले आहे. पुढचे २४ तास पावसाचा जोर असाच कायम राहण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. त्यानंतर पुढच्या दोन दिवसांनी कोकणातील पाऊस कमी होईल असा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.

कोकण रेल्वेच्या काही गाड्या रद्द
दरम्यान, मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील पेणपासून काही अंतरावर दरड कोसळून कोकण रेल्वे मार्ग ठप्प झाला. दुशमी रेल्वे गेट परिसरात भूस्खलन झाल्यामुळे काही गाड्या पुन्हा मडगावकडे वळवण्यात आल्या आहेत. त्यात मत्स्यगंधा, जनशताब्दी या गाड्यांचा समावेश आहे. तर काही गाड्या टप्प्याटप्प्याने धावत आहेत. कोकण रेल्वे मार्ग आज सोमवारपर्यंत सुरू होईल. असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, कोकण रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार दादर-रत्नागिरी, पुणे एर्नाकुलम, दिवा सावंतवाडी या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रत्नागिरी स्थानकात मांडवी एक्स्प्रेस, नेत्रावती संगमेश्‍वरला, कोईमतूर चिपळूणला, खेड स्थानकात चंदिगड एक्स्प्रेस, मंगला वीर स्थानकात, जनशताब्दी कुडाळ रेल्वे स्थानकात थांबवण्यात आली. तर मुंबईकडे जाणारी कोकणकन्या रद्द करण्यात आली आहे.

जोरदार पाऊस व वार्‍यामुळे
अद्याप मासेमारी बंदच

दि. १ ऑगस्टपासून राज्यात मच्छिमारी मोसम सुरू झाला खरा पण वादळी वारा व जोरदार पाऊस यामुळे मच्छिमारीसाठी समुद्रात जाणार्‍या बोटींना मासेमारी करता आली नसल्याने सध्या बाजारात मासळीचा दुष्काळ असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

गेल्या ४-५ दिवसांपासून गोव्यात जोरदार पाऊस कोसळत असून अरबी समुद्रातही वादळसदृश्य स्थिती आहे. त्यामुळे ट्रॉलर्संना खोल समुद्रात न जाण्याचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे. गेल्या १ ऑगस्टपासून राज्यातील मच्छिमारी बंदी उठली असली तरी ह्या ट्रॉलसर्र्ंना मासेमारी काही करता आलेली नाही. खवळलेला समुद्र, ताशी ५० ते ६० कि. मी. एवढ्या वेगाने वाहणारे वारे व जोरदार पाऊस यांच्याशी मच्छिमारांना लढा द्यावा लागत असून मासेमारी करता येत नसल्याने ट्रॉलर्स एक तर समुद्रात जात नाहीत किंवा जे गेलेले आहेत ते परतून येत आहेत अशी स्थिती असल्याचे मच्छिमारी सूत्रांनी काल सांगितले.

ह्या वादळी वार्‍याचा व जोरदार पावसाचा फटका रापणकरांनाही बसलेला असून त्यांनाही रापण घालताना अत्यंत अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे ह्या लोकांनी रापणी घालणे सुरू केले नसल्याचे रापणकारांच्या सूत्रानी सांगितले.
काणकोण येथील पाळोळे व सासष्टीतील वेळसांव अशा दोनच ठिकाणी रापणी घालता येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, तेथेही रापण घातली तरी म्हणावी तशी मासळी मिळत नाही. परिणामी अजूनही मासळी बाजारात मिळत असलेली मासळी ही परराज्यातीलच असल्याचे सूत्रांनी सांगितले.