>> साबांखा अभियंते उत्तम पार्सेकर यांचा दावा
कला अकादमीतील दीनानाथ मंगेशकर थिएटरमधील वातानुकूलित यंत्रणेत बिघाड झाल्यानेच सदर थिएटरमध्ये पावसाच्या पाण्याची गळती होत असल्याचे आढळून आले, असा दावा काल सार्वजनिक बांधकाम खात्याचे प्रधान अभियंते उत्तम पार्सेकर यांनी केला. एसी यंत्रणेच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून हे दुरूस्तीकाम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल, असेही त्यांनी पुढे बोलताना स्पष्ट केले.
गेल्या गुरूवारी पणजीत पाऊस कोसळला असता कला अकादमीतील थिएटरमध्ये पाण्याची गळती झाली होती. यावेळी थिएटरमध्ये नाट्यप्रयोग सुरू असल्याने तो चर्चेचा विषय ठरला होता आणि गळतीचे व्हिडिओ समाजमाध्यमांवरून व्हायरल झाले होते.
काल रविवारी तसेच गेल्या महिन्यात पाऊस कोसळला तेव्हाही ह्या थिएटरला गळती लागली होती. त्यानंतर लोकांकडून कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. कला अकादमीने मात्र कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाचे काम केले नसल्याचे म्हटले असून केवळ वातानुकूलित यंत्रणेत बिघाड झाल्याचा हा परिणाम असल्याचा दावा केला आहे.
या प्रश्नांवरून काँग्रेसने भाजप सरकारवर जोरदार टीका केली असून आता कला अकादमीत नाटक अथवा तियात्र पाहण्यासाठी जाणाऱ्या प्रेक्षकांना सोबत ताडपत्री घेऊन जावे लागेल, असे काँग्रेस नेते सुनील कवठणकर यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे. त्याचप्रमाणे कला अकादमीच्या इमारतीला गळती लागलेली असताना मुख्यमंत्री पक्षाच्या प्रचार कार्यात मग्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
कामाचे ऑडिट करा
गोवा फॉरवर्ड पक्षाने कला अकादमीच्या कामाचे ऑडिट करण्याची आणि चार्ल्स कुरैय्या फाउंडेशनचा सल्ला घेण्याची मागणी केली आहे. पाऊस पडतो तेव्हा दरवेळी ही गळती सुरू होते असे दिसून आले असल्याचे सांगून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या कामाची पाहणी करावी, अशी मागणी गोवा फॉरवर्डचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत यांनी केली आहे.