वन्यप्राण्यांमुळे ज्या शेतकर्यांच्या शेतीचे नुकसान होत आहे अशा शेतकर्यांना कृषी खाते सर्व ती मदत देते. वन्यप्राण्यांना शेतकर्यांच्या शेतीत घुसता येऊ नये यासाठी शेतीला कुंपण घालण्यासाठी सरकार अनुदान देत असल्याची माहिती कृषिमंत्री बाबू कवळेकर यांनी काल विधानसभेत दिली.
प्रश्नोत्तराच्या तासाला अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांनी आपल्या सांगे मतदारसंघातील नुने, नेत्रावळी, कुमारी, भाटी आदी गावातील शेतकर्यांच्या शेतीची रानटी प्राण्यांनी नासाडी करून टाकलेली असून त्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी करणारी लक्षवेधी सूचना काल मांडली होती. त्यावर उत्तर देताना कवळेकर यांनी वरील माहिती दिली.
कृषी खाते शेतकर्यांना वेळोवेळी मदत देत असते. त्याशिवाय त्यांना सौर ऊर्जेवरील कुंपण घालण्यास ९० टक्के तर दगडांचे कुंपण घालण्यास ७५ टक्के एवढे अनुदान देण्यात येत असल्याची त्यांनी माहिती दिली.
वनमंत्री या नात्याने यावेळी बोलताना प्रमोद सावंत यांनी रानटी प्राणी वनक्षेत्रातून शेतीत येऊ नयेत यासाठी सरकार उपाययोजना करणार असल्याचे सांगितले. वनक्षेत्रात फळझाडे नाहीत. त्यामुळे प्राणी अन्नासाठी शेतीत घुसत असल्याचे त्यांनी सांगितले.