वडिलांकडून पोलिसांत खुनाची तक्रार

0
44

>> सिद्धी नाईक प्रकरणी वेगळे वळण

बार्देश तालुक्यातील नास्नोळा येथील सिद्धी नाईक हिच्या मृत्यूसंदर्भात तिच्या वडिलांनी कळंगुट पोलिसांत काल खुनाची तक्रार दाखल केली. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.

पोलीस अधीक्षक शोबित सक्सेना यांनी तातडीने पोलीस उपअधीक्षक एडविन कुलासो व कळंगुटचे पोलीस निरीक्षक नालास्को रापोझ यांची बैठक बोलावली आहे.

पोलिसांनी काही दिवसांपूर्वी सिद्धी नाईक हिचा शवचिकित्सा अहवाल तिच्या कुटुंबीयांकडे सोपवला. या अहवालाबद्दल संशय व्यक्त करून तिच्या वडिलांनी कळंगुट पोलिसांत सिद्धी हिने आत्महत्या केली नसून तिचा खून झाल्याचा संशय व्यक्त करून ही तक्रार दिली आहे.

यापूर्वीही पोलिसांनी सर्व बाजूने या मृत्यूचा तपास केला होता मात्र त्यात काही पुरावे सापडले नव्हते. त्यानंतर पोलिसांनी तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले आहे का या दिशेने तपास सुरू करून तिच्या कुटुंबीयांच्या तसेच तिच्याशी ओळख असलेल्या काही मित्रमंडळींची जबानीही नोंद केली होती.

तीन आठवडे उलटून गेले तरी सिद्धी नाईक हिचा मृत्यू हा आत्महत्या की हत्या याबाबत पोलीस अजूनही निष्कर्ष काढू शकलेले नाहीत. शवचिकित्सेनंतर डॉक्टरांनी व्हिसेरा न ठेवल्याने बिगर सरकारी संस्था तसेच विरोधकांनी पोलीस तसेच डॉक्टरांच्या निष्काळजीपणावर आरोप केले होते. तिचा मृतदेह अर्धनग्न स्थितीत सापडला असताना पोलिसांना किंवा डॉक्टरांना संशय का आला नाही असे प्रश्नही उपस्थित केला होता.