‘वंदे भारत’चे स्वागत

0
16

आधुनिक भारताचे आणि आत्मनिर्भरतेचे प्रतीक असलेल्या ‘वंदे भारत एक्स्प्रेस’चा शुभारंभ उद्या समारंभपूर्वक होणार आहे. गोव्यासाठीची ही पहिली ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ मुंबई – मडगाव दरम्यान येत्या पाच जूनपासून धावू लागेल अशी अपेक्षा आहे. ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ ही केवळ एक आधुनिक रेलगाडी नाही. ते भारताचे आत्मनिर्भरतेचे, स्वयंपूर्णतेचे एक स्वप्न आहे. ही संपूर्णतः स्वदेशी बनावटीची शानदार हायटेक रेलगाडी भारतात तयार केली जाते. चेन्नईच्या इंटेग्रल कोच फॅक्टरीत ती तयार होते. देशाच्या विविध राज्यांना ह्या आधुनिक रेलगाडीची भेट समारंभपूर्वक प्रदान केली जात असते. यापूर्वी देशाच्या वेगवेगळ्या भागांना ही भेट मिळाली आहे. आता कोकण रेलमार्गावर मुंबई – गोवा प्रवासासाठी प्रथमच ती उपलब्ध होते आहे. तिचा भरधाव वेग हे तर तिचे वैशिष्ट्य आहेच, परंतु त्यातील आधुनिक साधनसुविधा विमानप्रवासाचा आनंद प्रवाशांना देत असतात. मुंबई – गोवा हे सातशे किलोमीटरचे अंतर ही रेलगाडी केवळ सात तासांत पार करू शकते. अर्थात, कोकण रेलमार्ग हा देशातील इतर मार्गांसारखा नाही. ठिसूळ मातीवरून आणि पूल व बोगद्यांतून हा लोहमार्ग जात असल्याने येथे रेलगाड्यांचा वेग मर्यादेत ठेवावा लागतो. त्यामुळे जरी वंदे भारत रेलगाडीचा अंगभूत वेग अधिक असला, तरी या मार्गावर ती ठराविक वेगमर्यादेनेच चालवावी लागेल. त्यात भर पावसात ही रेलगाडी सुरू होते आहे. त्यामुळे सात तासांत मुंबई गाठण्याचे तिचे उद्दिष्ट काळजीपूर्वक निश्चित करावे लागेल. मुंबई – गोवा प्रवासासाठीच्या सध्याच्या सर्वांत वेगवान अशा तेजस एक्स्प्रेसपेक्षा वंदे भारतला लागणारा वेळ किमान पंचेचाळीस मिनिटे कमी असेल असे सांगितले जाते आहे. ‘तेजस’ ही आजवर या मार्गावरील सर्वांत आधुनिक व आकर्षक रेलगाडी मानली जात असे. विशेषतः तिला जोडलेले दोन विस्टाडोम हे तिचे खास आकर्षण होते. कोकणचा निसर्ग त्यातून डोळे भरून पाहता येत असतो. त्यामुळे पर्यटकांत ते विलक्षण लोकप्रिय आहेत. वंदे भारतही काचेच्या विशाल खिडक्या, आरामदायक आलिशान आसनव्यवस्था, विमानांप्रमाणे बायोव्हॅक्यूम टॉयलेट, स्वयंचलित दरवाजे, वायफाय सुविधा, शताब्दी वर्गातील रेलगाड्यांसारख्याच सर्व सुखसुविधा असणारे वर्ग, इत्यादींमुळे पर्यटक आणि प्रवाशांत लोकप्रिय होईल यात शंका नाही. सोळा डब्यांच्या या रेलगाडीच्या डब्यांत रिक्लायनिंग आसने, मोठ्या स्क्रीन्स वगैरे सुविधा असणार आहेत. दोन एक्झिक्युटिव्ह क्लास डबेही तिला आहेत. आजवर अशा अठरा वंदे भारत रेलगाड्या देशभरात दिमाखाने धावत आहेत. नुकतीच उडिशातील जगन्नाथपुरीपासून पश्चिम बंगालमधील हावडा दरम्यान आणि आसाममधील गुवाहाटीपासून पश्चिम बंगालमधील न्यू जलपायगुडीपर्यंतची वंदे भारत सुरू झालेली आहे. आता या नव्या रेलगाडीमुळे मुंबईत पहाटे बसले की दुपारपर्यंत मडगावात पोहोचायची आणि दुपारी मडगावात बसून मध्यरात्री मुंबईत पोहोचायची सोय झाली आहे. मात्र, कोकण रेल्वेवरील रेलगाड्यांचे आरक्षण मिळवणे हीच मोठी कठीण बाब असते. येत्या गणेशचतुर्थीच्या काळातील सर्व आरक्षण एका मिनिटात फुल्ल झाले. ह्यामागे कोणत्या प्रकारचा तंत्रज्ञानाधारित भ्रष्टाचार आहे हे शोधले गेले पाहिजे.
वंदे भारत संदर्भात एका गोष्टीची काळजी घ्यावी लागेल ती म्हणजे या रेलगाडीवर दगडफेक करण्याची विकृती देशभरात दिसून आलेली आहे. केरळपासून आंध्र आणि पश्चिम बंगालपर्यंत असे या वंदे भारतवर दगडफेक करून काचा फोडण्याचे प्रकार विकृत समाजकंटकांकडून घडले. ही दगडफेक का होते याचे काही ठोस असे कारण नाही. कदाचित पंतप्रधान मोदींद्वारे तिचा शुभारंभ केला जात असल्याने मोदीद्वेषापोटी ही दगडफेक होत असेल. किंवा रेलमार्गावरून धावणारी ही आधुनिक रेलगाडी समाजकंटकांच्या डोळ्यांत खुपतही असेल. कारणे काही असोत, परंतु निदान मुंबई – गोवा वंदे भारतला हे दगडफेकीचे गालबोट लागू नये याची दक्षता घ्यावी लागेल. कोकण रेलमार्गावरची ही पहिलीवहिली वंदे भारत एक्स्प्रेस आहे. खरे तर कोकण रेल्वेला यंदा पंचवीस वर्षे पूर्ण होत आहेत. परंतु राज्य सरकारच्या ते गावीही नसावे. वास्तविक गोवा व कोकणवासीयांचे स्वप्न असलेल्या कोकण रेल्वेचा हा रौप्यमहोत्सव दिमाखात साजरा व्हायला हवा होता. अजूनही ती वेळ गेलेली नाही. भारत बदलतो आहे आणि तो या अशा प्रतीकांतून प्रत्ययास येतो आहे. वंदे भारत ही एक नवी सुरुवात आहे. एका उभरत्या, आत्मनिर्भर भारताची ही सुरुवात आहे. त्यामुळे ह्या वंदे भारत एक्स्प्रेसचे आगमन उत्साहात साजरे झाले पाहिजे.