लोकहितार्थ धोरणांविरोधात कोणीही येऊ नये

0
136
????????????????????????????????????

>> पणजीतील क्रांतीदिन सोहळ्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आवाहन

राज्य सरकारच्या लोकहितार्थ धोरणांच्या विरोधात कुणीही येऊ नये. सरकारी धोरणाला विरोध खपवून घेतला जाणार नाही, असा सूचक इशारा देताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्याच्या क्रांती पर्वासाठी मंत्री, आमदार यांच्याबरोबरच नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे, असे प्रतिपादन गोवा क्रांती दिन सोहळ्यात बोलताना येथे काल केले.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी येथील आझाद मैदानावरील स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून क्रांती लढ्यातील हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. यावेळी सभापती राजेश पाटणेकर, महसूल मंत्री रोहन खंवटे, महापौर उदय मडकईकर, मुख्य सचिव परिमल राय व इतर मान्यवरांची उपस्थिती होती.

सरकारच्या लोकहितार्थ धोरणाच्या विरोधात काम करण्याची काही जणांना सवय आहे. सरकारच्या धोरणांमध्ये काही चुका असल्यास दाखवून द्याव्यात. त्यात आवश्यक सुधारणा करण्यात येतील. सरकारी धोरणाला विरोध करणा़र्‍यांनी धोरणावर गंभीरपणे विचार करायला हवा. काही राजकीय व्यक्ती आंदोलन करणार्‍यांना फूस लावत आहेत, असा आरोप डॉ. सावंत यांनी केला.

मये गावातील नागरिकांना जमीन मालकी हक्क मिळवून देण्याच्या प्रक्रियेला चालना दिली जाणार आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या कार्यकाळात मालकी हक्क देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. मये गावातील नागरिकांना जमिनीची सनद देण्यासाठी लवकरच योग्य पाऊल उचलले जाणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

हरीत, नील, धवल
क्रांतीला चालना देणार
राज्यात हरीत, नील आणि धवल क्रांतीला चालना दिली जाणार आहे. गोवा विधानसभेच्या आगामी अधिवेशनामध्ये समुदाय शेतीला चालना देण्यासाठी आवश्यक पाऊल उचलण्यात येणार आहे. प्रशासनात आवश्यक सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. खाण, म्हादई, मोपा विमानतळाला प्राधान्य दिले जात आहे, असेही त्यांनी सांगितले.

राज्यात शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्यात येणार आहे. रोजगाराला प्राधान्य देणार्‍या शिक्षणावर भर दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून न देणारे अभ्यासक्रम बंद केले जाणार आहेत. कौशल्य विकासावर भर दिला जाणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

हरीत गोव्यासाठी प्राधान्य
आगामी दोन वर्षात गोवा हरीत व स्वच्छ करण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे. वैद्यकीय कचरा, औद्योगिक कचरा आणि घातक कचर्‍याच्या विल्हेवाटीची सोय उपलब्ध केली जाणार आहे. राज्यात झाडांच्या लागवडीवर भर दिला जाणार आहे. नागरिकांना औषधी झाडे लागवडीसाठी उपलब्ध केली जाणार आहेत, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

तीन नवीन पुलांचे
२० जुलैला उद्घाटन
काणकोण गालजीबाग, तळपण नदीवरील तीन नवीन पुलांचे उद्घाटन २० जुलै रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे. काणकोण ते कारवार या महामार्गावरील तीन पुलांमुळे २१ किलो मीटरचे अंतर केवळ ७ किलो मीटरवर येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

स्वातंत्र्य लढ्यावरील माहितीचे
पणजीत दालन उभारणार
स्वातंत्र्य सैनिक आणि स्वातंत्र्य लढ्याची माहिती देणारे खास दालन पणजीत उभारण्यात येणार आहे. या विशेष दालनात गोवा मुक्ती लढ्यात सहभाग घेतलेल्या स्वातंत्र्य सैनिकांची छायाचित्रे व त्यांच्या बद्दलची माहिती दिली जाणार आहे. तसेच मुक्ती लढ्याच्या चळवळीवर आधारित ङ्गिल्म शालेय मुलांना दाखविण्याची सोय केली जाणार आहे. स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना सरकारी नोकरी देण्याचा प्रश्‍न मार्गी लावला जाणार आहे. राम मनोहर लोहिया यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. ज्युलियो मिनेझीस यांच्या घराचा ताबा मिळवून तेथे स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. पर्वरी येथील सचिवालयामध्ये स्वातंत्र्य सैनिक डॉ. राम मनोहर लोहिया, पुरुषोत्तम काकोडकर, विश्‍वनाथ लवंदे, टी. बी. कुन्हा आणि बाबनी नाईक देसाई या सहा स्वातंत्र्य सैनिकांची छायाचित्रे लावण्यात येणार आहेत, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक मोहन रानडे यांना उपचारार्थ आवश्यक आर्थिक साहाय्य करण्यात आले आहे. रानडे यांच्यावरील वैद्यकीय उपचारासाठी आणखी आवश्यक आर्थिक साहाय्य दिले जाणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
गोवा मुक्ती लढ्यातील ३५ हुतात्म्यांची त्यांच्या गावात स्मारके उभारावीत. स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांचा नोकर्‍यांचा प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावावा. मये गावातील नागरिकांना जमिनीचा मालकी हक्क मिळवून देण्याची मागणी स्वातंत्र्य सैनिक चंद्रकांत पेडणेकर यांनी केली.

राम मनोहर लोहिया यांचे वास्तव्य असलेल्या घरांचे सर्वंधन करावे, अशी मागणी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक पांडुरंग कुंकळ्येकर यांनी केली.