लोकसभेच्या दोन्ही जागाही भाजपच जिंकणार : सदानंद तानावडे

0
10

जिल्हा पंचायत निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपच्या उमेदवारांना निवडून देऊन मतदारांनी पूर्णपणे भाजपवर विश्‍वास दाखवला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीतही गोव्याबरोबरच देशभरातील मतदार भाजपवर विश्‍वास दाखवून भाजपलाच विजयी बनवतील, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी काल दिली. गोव्यातील लोकसभेच्या दोन्ही जागाही भाजपच जिंकणार असल्याचा दावाही त्यांनी केला.

तिन्ही मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांमुळे पक्षाला भरघोस पाठिंबा मिळाला. आम्ही सदोदित मतदारांच्या संपर्कात राहत असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिनानिमित्त पक्षाने सर्व मतदारसंघांत समाजोपयोगी कामे केली होती. आम्ही केवळ निवडणुकीच्या वेळीच नव्हे, तर निवडणुका नसतात, तेव्हाही तळागाळातील लोकांमध्ये जाऊन काही ना काही कामे करीतच असतो, असेे तानावडे म्हणाले. भाजप प्रत्येक निवडणूक गांभीर्याने व पूर्ण नियोजनाद्वारेच लढवत असते, असेही ते म्हणाले.