लोकप्रतिनिधी, एनजीओंच्या मदतीने बुस्टर डोस मोहिमेला गती देणार : राणे

0
12

राज्यात बुस्टर डोस मोहिमेला गती देण्यासाठी महिला व बालकल्याण खाते, लोकप्रतिनिधी आणि सेवाभावी संस्थांचे सहकार्य घेतले जाणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी बुस्टर डोससंबंधी आयोजित बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना काल दिली.

राज्यात बुस्टर डोसला चांगला प्रतिसाद मिळत नाही, या पार्श्‍वभूमीवर राणे यांनी बुस्टर डोस मोहिमेला गती देण्यासाठी काल एक बैठक घेतली. या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेला आरोग्य सचिव, आरोग्य खात्याचे वैद्यकीय अधिकारी, महिला व बालकल्याण खात्याच्या संचालिका व इतर अधिकार्‍यांची उपस्थिती होती.

महिला व बालकल्याण खात्यातील अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून बुस्टर डोसबाबत जनजागृती केली जाणार आहे. तसेच आमदार, अन्य लोकप्रतिनिधी आणि सेवाभावी संस्थांची मदत घेतली जाणार आहे. मुख्य सचिवांना सर्व खात्यांच्या सचिवांची बैठक घेण्याची विनंती केली जाणार आहेे, असे राणे यांनी सांगितले. राज्यात बुस्टर डोसचे लक्ष्य हे १० लाख ५० हजार एवढे आहे. आत्तापर्यंत केवळ ७९ हजार नागरिकांनी बुस्टर डोस घेतला आहे.कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी बुस्टर डोस घेण्याची नितांत गरज आहे, असेही ते म्हणाले.