>> संसदेतील विविध नेत्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्स
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशातील विविध विरोधी पक्षांच्या नेत्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कोरोना महामारीच्या संकटप्रश्नी सुसंवाद साधला. यावेळी त्यांनी सध्या देशभरात लागू केलेले लॉकडाऊन एकाच वेळी मागे घेतले जाणार नसल्याचे संकेत दिले अशी माहिती बिजू जनता दलाचे नेते पिनाकी मिश्रा यांनी दिली. लोकसभा व राज्यसभेतील प्रमुख पक्षांच्या नेत्यांशी पंतप्रधान मोदी यांनी घेतलेली ही पहिलीच बैठक ठरली आहे.
मिश्रा म्हणाले, ‘पंतप्रधान मोदींनी लॉकडाऊन एका झटक्यात मागे घेतले जाणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच कोरोना संकट येण्याआधीचे जीवन आणि पुढील जीवन हे सारखेच नसेल हेही पंतप्रधानांनी सूचित केले.’
११ रोजी मुख्यमंत्र्यांशी
पंतप्रधानांची चर्चा
या कार्यक्रमात सहभागी झालेल्या एका नेत्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले की, पंतप्रधान या विषयावर सर्व मुख्यमंत्र्यांशीही लॉकडाऊन संदर्भात चर्चा करणार आहेत. दि. ११ एप्रिल रोजी पंतप्रधान मुख्यमंत्र्यांबरोबर व्हिडिओ बैठक घेऊन अंतिम निर्णय घेतील. देशात सध्या सामाजिक आणिबाणी सदृश स्थिती आहे याकडे मोदी यांनी नेत्यांचे लक्ष वेधले.
पंतप्रधानांबरोबरील सुसंवाद कार्यक्रमात सहभागी झालेल्यांमध्ये गुलाम नबी आझाद, शरद पवार या प्रमुख नेत्यांचा समावेश होता. या नेत्यांना प्रथम केंद्र सरकारच्या आरोग्य, गृह व ग्रामीण विकास मंत्रालयांच्या सचिवांनी या महामारीसंदर्भातील उपाययोजनांची माहिती दिली.
या चर्चेदरम्यान या नेत्यांनी विविध मुद्दे उपस्थित केले. वैयक्तिक सुरक्षा उपकरणांचा तुटवडा असल्याचे या नेत्यांनी लक्षात आणून दिले. तसेच संसद भवनाच्या नव्या प्रकल्पाचे बांधकाम हाती घेण्याचे टाळावे असेही त्या नेत्यांनी पंतप्रधानांना सुचवले.
आझाद यांच्या व्यतिरिक्त या चर्चेत सपाचे राम गोपाल यादव, बसपाचे सतीश मिश्रा, लोजपचे चिराग पास्वान, द्रमुकचे टी. आर. बालू, शिरोमणी अकाली दलाचे सुखबीर बादल, जदयूचे राजीव रंजन सिंग, बिजू जनता दलाचे पिनाक मिश्रा व शिवसेनेचे संजय राऊत, तृणमूल कॉंग्रेसचे सुदिप बंडोपाध्याय यांनीही भाग घेतला.