लैंगिक शोषणप्रकरणी पुरावे उघड न करण्याबद्दल चोडणकर यांना नोटीस

0
30

राज्यातील भाजप सरकारमधील एका मंत्र्याकडून करण्यात आलेल्या महिलेच्या लैंगिक शोषण प्रकरणाची माहिती उघड करू नये म्हणून मुंबईतील एका यशस लीगल या लॉ कंपनीकडून गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांना कायदेशीर नोटीस पाठविण्यात आली आहे. मंत्र्याच्या लैंगिक प्रकरणातील महिलेची माहिती उघड करू नये, अशी सूचना नोटीसमध्ये करण्यात आली आहे.

मंत्र्याकडून करण्यात आलेल्या महिलेच्या लैंगिक शोषण प्रकरणी कुठल्याही दबाव तंत्रापुढे झुकणार नाही. माझा आवाज नोटीस पाठवून बंद करू शकत नाही. या नोटीसला उत्तर देणार नाही, असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पत्रकार परिषदेत काल सांगितले.

भाजप सरकारमधील त्या मंत्र्याविरोधात एकटी गरीब पिडीत महिला तक्रार करू शकत नाही. महिलेचे लैंगिक शोषण ही माहिती सत्य आहे. हे प्रकरण दडपून टाकण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना या प्रकरणाची पूर्ण माहिती आहे, असा दावा चोडणकर यांनी सांगितले.

महिलेवर लैंगिक अत्याचार करणार्‍या मंत्र्याचे नाव योग्य वेळी उघड केले जाणार आहे. मुख्यमंत्र्यांनी या लैंगिक अत्याचार प्रकरणी स्वेच्छा दखल घेऊन मंत्र्यावर कारवाई करावी, अशी मागणी चोडणकर यांनी केली.