लैंगिक अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती

0
32

जानेवारीतील प्रकार; दोघा अज्ञात युवकांचे कृत्य

दोन अज्ञात युवकांनी केलेल्या लैंगिक अत्याचारातून एक 16 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनी गर्भवती राहिल्याचा प्रकार समोर आला असून, सरकारी इस्पितळातील डॉक्टरांनी गुरुवारी रात्री उशिरा म्हार्दोळ पोलिसांना याविषयीची कल्पना दिल्यानंतर त्यांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंद केला. पीडित अल्पवयीन मुलीने दिलेल्या जबानीत जानेवारी महिन्यात दुचाकीवरून आलेल्या दोन युवकांनी बलात्कार केल्याचे नमूद केले आहे. मात्र दोन्ही युवकांना ती ओळखत नसल्याने पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.

म्हार्दोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 27 मार्चला पीडित अल्पवयीन मुलीची तब्येत बिघडल्याने ती एका सरकारी इस्पितळात तपासणीसाठी गेली होती. त्यावेळी डॉक्टरांना ती 7 आठवड्यांची गरोदर असल्याचे तपासणीत आढळून आले. त्यानंतर डॉक्टरांनी यासंबंधीची माहिती म्हार्दोळ पोलिसांना दिली. पोलिसांनी एनजीओ प्रतिनिधींच्या उपस्थितीत मुलीची जबानी घेतली. त्यानंतर गुरुवारी रात्री पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा नोंद केला.

मुलीने पोलिसांना दिलेल्या जबानीत जानेवारी महिन्यात गावातील जत्रेच्या दिवशी सदर प्रकार घडला होता. जत्रेतून जवळच असलेल्या आपल्या घरी एकटीच जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन युवकांनी तिच्या तोंडावर कपडा धरून तिला बेशुद्ध केले. त्यानंतर शुद्धीवर आल्यानंतर आपण घर गाठले. त्यावेळी आपल्यासोबत काहीतरी अनुचित घडल्याचे कल्पना आपणास आली, असे सदर मुलीने जबानीत म्हटले आहे. मात्र त्या युवकांना सदर मुलगी ओळख नसल्याचे तिने जबानीत नमूद केल्याने पोलिसांसमोर पेच निर्माण झाला आहे.

17 वर्षीय मुलीचे अपहरण
फोंडा पोलीस स्थानकाच्या हद्दीत गुरुवारी एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची तक्रार तिच्या पालकांनी फोंडा पोलीस स्थानकात नोंदवली. त्यानुसार पोलिसांनी संशयिताविरोधात गुन्हा नोंद केला आहे.