लेफ्ट. नागोरी यांचा मृतदेह सापडला

0
133

डॉर्नियर विमान दुर्घटना
अरबी समुद्रात कोसळलेल्या भारतीय नौदलाच्या टेहळणी विमानातील दुसरे बेपत्ता अधिकारी लेफ्टनंट अभिनव नागोरी यांचा मृतदेह काल सकाळी नौदलाच्या आयएनएस मकर ह्या जहाजाच्या पाणबुड्यांना सापडला.मंगळवारी संध्याकाळी डॉर्नियर विमानाने दाबोळी येथील आयएनएस हंसा तळावरून उड्डाण केले होते. अचानक रात्री १०.०८ वाजण्याच्या सुमारास या विमानाचा हंसा तळाशी संपर्क सुटला. नंतर ते कारवारपासून १० सागरी मैलावर अरबी समुद्रात कोसळल्याची माहिती नौदलाला मिळाली. या विमानात मुख्य पायलट निखिल जोशी यांच्या व्यतिरीक्त सहाय्यक पायलट लेफ्टनंट अभिनव नागोरी व लेफ्टनंट किरण शेखावत ही महिला अधिकारी होती. शेखावत यांचा मृतदेह गुरूवारी सापडला होता. तर निखिल जोशी यांना त्याच रात्री मच्छिमारांनी वर काढले होते. त्यांची प्रकृती सुधारत आहे.
लेफ्टनंट किरण शेखावत ही एका निवृत्त नौदल अधिकार्‍यांची कन्या असून, तीचा भाऊही नौदलात सेलर म्हणून काम करीत आहे. ती जुलै २०१०मध्ये नौदलात दाखल झाली होती. त्यानंतर दोन वर्षानी तीचा नौदल अधिकारी लेफ्टनंट व्ही. एस. चोकर यांच्याशी विवाह झाला होता.
लेफ्टनंट अभिनव नागोरी यांचा मृतदेह विमानाच्या अवशेषात काल सापडला. लेफ्टनंट अभिनव नागोरी मुळ राजस्थानमधील उदयपूर जिल्ह्यातील चित्रकुट येथील आहेत. दोन्ही अधिकार्‍यांचे मृतदेह गोव्यात हंसा तळावर आणून त्यांना शोकाकूल अवस्थेत मानवंदना देण्यात आली.