तक्रारकर्त्यांची उत्तर गोवा जिल्हा न्यायालयात धाव
माजी मंत्री पांडुरंग मडकईकरांच्या आरोपाचे प्रकरण
फाईल मंजुरीसाठी एका मंत्र्याला 15 ते 20 लाखांची लाच द्यावी लागली, असा आरोप काही दिवसांपूर्वी माजी मंत्री पांडुरंग मडकईकर यांनी केला होता. या आरोपांप्रकरणी चौकशीच्या मागणीसाठी दाखल तक्रारींची दखल न घेतल्या प्रकरणी उत्तर गोवा जिल्हा न्यायालयाने दक्षता खात्याच्या भ्रष्टाचारविरोधी विभागाचे (एसीबी) पोलीस अधीक्षक आणि पोलीस निरीक्षकांना नोटीस काल जारी केली.
काही दिवसांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष हे गोवा दौऱ्यावर आले असता, त्यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना माजी मंत्री पांडुरंग मडकईकर यांनी सरकारमधील एका मंत्र्यावर मोठा आरोप केला होता. आपली एक फाईल मंजूर करण्यासाठी आपल्याला एका मंत्र्याला 15 ते 20 लाख रुपये द्यावे लागल्याचा आरोप मडकईकर यांनी केला होता. ह्या आरोपानंतर काशिनाथ शेट्ये आणि इतरांनी दक्षता खात्याच्या भ्रष्टाचारविरोधी विभागाच्या पोलीस निरीक्षकांकडे गेल्या 6 मार्च 2025 रोजी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर दोन दिवसांनी तक्रारीची प्रत भ्रष्टाचारविरोधी विभागाच्या पोलीस अधीक्षकांकडे सादर केली होती. या तक्रारीची दखल घेण्यात न आल्याने काशिनाथ शेट्ये व इतरांनी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेऊन यासंबंधी एक याचिका दाखल केली होती. सदर याचिकेवर जिल्हा न्यायालयात काल सुनावणी घेण्यात आली. यावेळी न्यायालयाने एसीबीचे पोलीस अधीक्षक आणि पोलीस निरीक्षकांना नोटीस बजावण्याचा निर्देश जारी केला. या प्रकरणी पुढील सुनावणी येत्या 19 एप्रिल रोजी होणार आहे.
…तर मडकईकरांवरही कारवाई व्हावी
या प्रकरणात पांडुरंग मडकईकर यांची चौकशी करून सत्य जनतेसमोर आणले पाहिजे. राज्य सरकार सुध्दा या लाच प्रकरणात काहीच कारवाई करीत नाही. एका मंत्र्याने काम करण्यासाठी 15 ते 20 लाख रुपये घेतले आहेत. मात्र मडकईकर यांनी त्या मंत्र्याचे नाव घेतलेले नाही. परिणामी राज्यातील नागरिकांच्या मनात या आरोपावरून संशयाचे वातावरण तयार झाले आहे. मडकईकर यांची चौकशी करून त्यांनी केलेला आरोप खोटा असल्यास त्यांच्याविरोधात सुद्धा कारवाई करण्याची गरज आहे. त्यामुळे अशा प्रकारचा गंभीर आरोप कुणीही करणार नाही, असेही काशिनाथ शेट्ये यांनी सांगितले.
आरोप गंभीर स्वरूपाचा : काशिनाथ शेट्ये
माजी मंत्री पांडुरंग मडकईकर यांनी लाच प्रकरणी केलेला आरोप गंभीर स्वरूपाचा आहे. या प्रकरणाची चौकशी होऊन सत्य जनतेसमोर येण्याची गरज आहे. त्यामुळे एसीबीकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. तथापि, एसीबीने या तक्रारीची दखल न घेतल्याने आम्हाला न्यायालयात धाव घ्यावी लागली, असे काशिनाथ शेट्ये यांनी सांगितले.