लशीकरणाची पूर्वतयारी करण्याचे पंतप्रधानांचे आवाहन ः मुख्यमंत्री

0
208

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री, गृहमंत्री व अर्थमंत्री यांच्याशी काल कोविडप्रश्‍नी केलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांनी लशीकरणाची तयारी करावी अशी सूचना केली. मात्र कोरोनावरील लस देशी असेल की विदेशी, तसेच ती मोफत दिली जाईल की लोकांना ती विकत घ्यावी लागेल, हे एवढ्यातच सांगणे शक्य नसल्याचे पंतप्रधानांनी सांगितल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.
या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनंतर पत्रकारांशी मुख्यमंत्री बोलत होते. मात्र, पहिल्या टप्प्यात ही लस देशातील ज्येष्ठ नागरिक, गंभीर स्वरुपाच्या आजाराने त्रस्त असलेले लोक व कोविड योद्धे यांना दण्यात येईल. त्यानंतर जसे जसे या लशीचे डोस उपलब्ध होतील त्यानुसार ती देशभरातील लोकांना देण्यात येणार असल्याचे मोदींनी सांगितल्याचे सावंत म्हणाले. या लशीकरणासाठीची सगळी पूर्वतयारी करण्याचे आदेश पंतप्रधानांनी सर्व राज्यांतील मुख्यमंत्र्यांना दिले आहेत. या लशीचे दोन डोस घ्यावे लागणार असून पहिला डोस घेतल्यानंतर चार आठवड्यानंतर दुसरा डोस घ्यावा लागणार आहे. लशीचे डोस टिकवून ठेवण्यासाठी शीतगृहांची व्यवस्थाही करावी लागणार असून त्याबाबतही पंतप्रधानांनी चर्चा केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

येणार्‍यांची थर्मल गनने तपासणी करणार
दरम्यान, परराज्यांतून येणार्‍या पर्यटकांना व लोकांना कोविड चाचणीचे वैद्यकीय प्रमाणपत्र घेऊन येणे सक्तीचे करण्यात येणार आहे काय, असे विचारले असता तसा विचार नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मात्र, राज्यात येणार्‍या लोकांची थर्मल गनने तपासणी करण्यात येईल. तसेच मास्क न घालणार्‍यांवर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले. राज्यात कोरोना मृत्यूचे प्रमाण शून्यावर आले असून ते तसेच टिकवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले.